काळे, शीला सुधाकर
शीला सुधाकर काळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव पुष्पलता रामचंद्र नेऊरगावकर होते. त्यांचे वडील रामचंद्र शंकर नेऊरगावकर हे साखर कारखान्यात उच्चपदावर कार्यरत होते. आई इंदिरा ही गृहिणी होती. पुष्पलता 1956 मध्ये पंढरपूर येथील कवठेकर विद्यालयातून एस.एस.सी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुष्पलता यांचा 1961 मध्ये सुधाकर काळे यांच्याशी विवाह झाला. ते रिझर्व्ह बँकेत व्यवस्थापक म्हणून काम पाहात होते. घरची सधनता असल्यामुळे नोकरी न करता शीला काळे यांनी सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्र निवडले. तेव्हा त्यांचा भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या संस्थापक मिनाक्षी दाढे यांच्याशी संपर्क आला.
त्यावेळी त्यांनी बँकेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. बँकेच्या स्थापनेपूर्वी सहा-सात महिने त्यांनी बँकेचे समभाग विकण्याचे काम केले. त्यातून बँकेसाठी लागणारे भाग-भांडवल जमविण्यास मदत झाली. त्यांच्या या कार्यनिपुणतेमुळे बँकेची स्थापना झाल्यावर त्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. बँकेची वाढ होण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवीदारांना बँकेकडे आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. बँकेच्या हितसंवर्धनासाठी केलेल्या कामामुळे पुढे त्यांची संचालक मंडळात नेमणूक करण्यात आली.
शीला काळे यांनी संचालक या नात्याने दिल्ली, नागपूर, बेंगलोर, पुणे, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी सहकारविषयक प्रशिक्षणासाठी दौरे केले व त्यातून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा बँकेसाठी उपयोग करून घेतला. तसेच दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, हैद्राबाद, भोपाळ, उदयपूर, बडोदा, सुरत, हुबळी, धारवाड, चंदिगढ, अमरावती, मुर्तिजापूर या ठिकाणी झालेल्या सहकार परिषदांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच सहकार खात्याने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रम व परिषदांनाही त्या उपस्थित राहिल्या होत्या.
शीला काळे यांनी भगिनी निवेदिता सहकारी बँकेत 8 वेळा अध्यक्ष व 2 वेळा उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. तसेच त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँक असोसिएशनमध्ये संचालक म्हणून काम पाहिले आणि सदर बँकेत 2 वेळा अध्यक्षस्थान व 2 वेळा उपाध्यक्षस्थान भूषविले. त्याचबरोबरीने महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या महिला विभागाच्या संचालक होण्याचा मानही शीला काळे यांना प्राप्त झाला. त्यांनी सहकार भारतीच्या कार्यकारी मंडळावर संचालक आणि उपाध्यक्ष या नात्यानेही काम केले.
- संपादित