Skip to main content
x

कदम, संभाजी सोमाजी

            ष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले, प्रतिभावंत व्यक्तिचित्रणकार, आदर्श शिक्षक, कवी, समीक्षक, सौंदर्यमीमांसक व संगीताचे अभ्यासक म्हणून मान्यता पावलेले संभाजी सोमाजी कदम यांचा जन्म कोकणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड (जामसंडे) या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी होते. कदमांचे शालेय शिक्षण देवगड येथेच झाले. शेठ म.ग. हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर टेंगशे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, तसेच रा.स्व. संघाच्या संस्कारांचाही त्यांच्यावर सुरुवातीच्या काळात प्रभाव होता.
           अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन कदमांनी १९५२ साली मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळविला. त्यांनी विद्यार्थिदशेत व्यावसायिक कलावंतांसाठी असलेले पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळविली. जी.डी. आर्ट पेंटिंगचा डिप्लोमा यशस्विरीत्या पूर्ण केला व नंतर १९५७ साली जे.जे.मध्येच त्यांची कलाशिक्षक म्हणून निवड झाली. कलाशिक्षकाचा पेशा स्वीकारल्यावर कदमांनी केवळ विद्यार्थ्यांना शिकविले नाही, तर स्वतःचा सर्जनशील विकास चालू ठेवला. चित्रकलेबरोबरच साहित्य, संगीत आणि कलासमीक्षा यांतही त्यांना रस होता. म्हणून या सगळ्यांचा ते सखोल अभ्यास करत राहिले. त्यांची १९७३ साली प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नंतर त्यांची १९७६ साली ‘अधिष्ठाता’ या सर्वोच्च पदावर नेमणूक झाली. या पदाची जबाबदारी त्यांनी अतिशय निष्ठेने सांभाळली. पण अंतर्गत राजकारण, मतभेद याला कंटाळून व कलेला आणि ज्ञानाला पूर्णवेळ वाहून घेण्यासाठी १९८० साली त्यांनी स्वेच्छेने, अकरा वर्षे आधीच सेवानिवृत्ती घेतली. १९८२ मध्ये त्यांचा विवाह ज्योत्स्ना जोशी यांच्याबरोबर झाला.
            महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तसेच महाराष्ट्राबाहेरही कदमांनी व्यक्तिचित्रणाची असंख्य प्रात्यक्षिके दिली. संभाजी कदम यांचे प्रात्यक्षिक म्हणजे विद्यार्थी व रसिकांना एक पर्वणी वाटत असे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, गोवा, म्हैसूर, खैरागड, जयपूर, उदयपूर, नागपूर अशा अनेक ठिकाणी असलेल्या कलासंस्थांत त्यांची व्यक्तिचित्रे संग्रहित केलेली आहेत. कदमांची अनेक चांगली व्यक्तिचित्रे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांत, महाराष्ट्र राज्य प्रदर्शनांत, दिल्लीच्या ललित कला अकादमीच्या प्रदर्शनांत वेळोवेळी प्रदर्शित झालेली आहेत. त्यांतील उत्कृष्ट चित्रांना महत्त्वाची पारितोषिकेही मिळालेली आहेत.
            व्यक्तिचित्रणकार म्हणून काम करताना कदमांची स्वतःची अशी एक भूमिका होती. त्यातून त्यांची वेगळी शैली घडत गेली. त्यांच्या मते, व्यक्तिचित्र म्हणजे केवळ त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्रण नव्हे, किंवा फोटोग्रफिक सादृश्यही नव्हे, तर व्यक्तीच्या अंतरंगासह बनलेला व्यक्तिमत्त्वाचा आशय समजून घेऊन तो रंग, रेषा आणि अवकाशाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता यायला हवा, तेव्हाच ते चित्रण कलाकृतीच्या पातळीवर जाऊ शकते. म्हणूनच व्यक्तीच्या सादृशापेक्षाही चित्रभाव आणि संपूर्ण लयीचे भान यांकडे कदमांचे अधिक लक्ष असे. ते व्यक्तीचे डोळे, नाक, ओठ वगैरे अवयव जसेच्या तसे आखून न घेता त्यांचे लयपूर्ण रेखांकन करून घेत. दमदार, जोरकस रंगलेपनातून संपूर्ण चित्र पूर्ण करीत. त्यांच्या शब्दांत ते ‘लोण्यासारखे मुलायम रंग’  लावत. कदमांचे हे कौशल्य वैशिष्ट्यपूर्ण होते. नाइफ व ब्रश यांचा कमी-अधिक दाब देत केलेल्या वापरातून जाड रंगलेपनाचा (इम्पॅस्टो) परिणाम विलक्षण रितीने साधलेला असे.
            कदमांच्या व्यक्तिचित्रात एखादा आकर्षण बिंदू असे. उदा. पाणीदार डोळे, उत्कट ओठ वगैरे. साऱ्या चित्राची रचना त्याभोवती असे. व्यावसायिक व्यक्तिचित्रणाची महाराष्ट्रात जी परंपरा आहे, त्यापेक्षा कदमांची व्यक्तिचित्रणाची शैली वेगळी आहे. विशेषत: त्यांच्या स्त्री-व्यक्तिचित्रातून त्याचा उत्कट आविष्कार दिसून येतो. शंकर पळशीकरांच्या त्यांनी केलेल्या व्यक्तिचित्रात वैचारिक वेगळेपण प्रखरपणे जाणवते. डॉ. एम.डी. देशमुख, जयंती, ललिता, कविवर्य मंगेश पाडगावकर अशा अनेक व्यक्तिचित्रांमध्येही कदमांच्या शैलीची वैशिष्ट्ये आलेली आहेत.
              कदमांचे कलाविषयक लेखन, सौंदर्यशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन हा त्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग होता. ‘मौज’ साप्ताहिकातून १९५८ ते १९६० पर्यंत ‘विरूपाक्ष’ या टोपणनावाने कदमांनी कलाप्रदर्शनांविषयी समीक्षणे लिहिली. त्यांनी १९६१ ते १९७३ या काळात ‘सत्यकथा’ मासिकामधून कलाप्रदर्शनांमधील विविध प्रवृत्तींची चर्चा आणि मूल्यमापन करणारे समीक्षालेखन केले. त्यांच्या या समीक्षणातून ते लिहीत असलेल्या कलावंताबद्दलचे आकलन, समीक्षा व रसग्रहण तत्कालीन मराठी कलासमीक्षेपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे होते.  ‘रूपभेद’ या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या वार्षिक अंकातही त्यांनी वेळोवेळी लिहिले. त्यांनी काही काळ १९६५ पासून मराठी विश्‍वकोशाचे लेखन व कला विभागाचे संपादनाचे काम पाहिले. कलेतील सैद्धान्तिक समस्यांची चर्चा करणाऱ्या किंवा रागमाला चित्रांसारख्या अभ्यासपूर्ण नोंदीही लिहिल्या.
            हेन्री मूर, पॉल क्लीपासून ते रघुनाथ धोंडो धोपेश्‍वरकर, शंकर पळशीकर यांच्यापर्यंत अनेकांवर त्यांनी लिहिले. जागतिक मराठी परिषदेतर्फे भरलेल्या ‘तपस्वी’ या प्रदर्शनासाठी त्यांनी आबालाल रहिमान आणि विनायक मसोजी यांच्या कलेचेही यथायोग्य मूल्यमापन केले. कदमांच्या या लेखनामागे कलेच्या मूलभूत प्रेरणांबाबत जिज्ञासा होती आणि साहित्य, संगीतासारख्या कलांचा, तत्त्वज्ञानाचा व्यासंग होता. त्यातून विकसित झालेली एक व्यापक कलाजाणीव आणि मूल्यदृष्टी होती. त्यामुळे कदमांचे लेखन त्यातल्या पारिभाषिक शब्दांमुळे, संकल्पना आणि संदर्भांमुळे समजून घेताना जड पडे; पण कलासमीक्षेला त्यांनी एक तौलनिक अशी वैचारिक बैठक दिली.
           कदमांनी आणखी एक महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे ‘रापण’ या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रल्हाद अनंत धोंड यांच्या आठवणींचे लेखन. धोंडांनी सांगितलेला आणि कदमांनी लिहून घेतलेला हा एक प्रकारे जे.जे.च्या कलाप्रवासाचा अत्यंत मनोरंजक, पण तेवढाच उद्बोधक असा मौखिक इतिहासच आहे. चित्रकलेला पूरक असा त्यांचा संगीताचा, गायन आणि वादनाचा अभ्यास होता. संगीतशास्त्रातील संशोधनात्मक लेखनाबरोबरच शैलीदार सोलो हार्मोनिअम वादक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. संभाजी कदम कवीही होते. ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रतिष्ठान’, ‘समुचित’ अशा दर्जेदार नियतकालिकांतून त्यांच्या पन्नासेक कविता प्रकाशित झाल्या.
          त्यांचा ‘पळसबन’ हा कवितासंग्रह २००२ साली ‘मौज’ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. या कविता आत्मकेंद्रित आहेत; पण स्वतःच्या दुःखवेदनांच्या कक्षा ओलांडून, थेट प्रज्ञा भेदून नितळ स्वच्छ आकाश बघण्याची उमेद त्या बाळगून आहेत. कदमांच्या कवितेत स्त्रीत्वाचे आकर्षण आणि त्यातून निर्माण झालेले चित्रण, तसेच त्यांची स्त्रियांची व्यक्तिचित्रे यांतील सौंदर्यदृष्टी एकच आहे. कदमांचा सौंदर्यशास्त्राचा विशेष अभ्यास होता. महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या, विशेषतः ‘सौंदर्यशास्त्र’ या विषयाच्या मांडणीत आणि आखणीत व शिकवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुंबई विद्यापीठाच्या एम.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी, कदम १९६८ ते १९७५ या काळात ‘तुलनात्मक सौंदर्यशास्त्र’ या विषयावर व्याख्याने देत.
        कदमांचे कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचे होते. अत्यंत अभावात्मक परिस्थितीतून येऊनही त्यांनी व्युत्पन्न रसिकता आणि कलावंतांची मूल्यनिष्ठा  जोपासली. स्वतःला व्यावसायिकतेपासून दूर ठेवले. चित्र हे स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी करायचे, त्याचा व्यवसाय करायचा नाही या भूमिकेमुळे कदमांनी सुरुवातीला चित्रांची प्रदर्शने भरवली नाहीत. वयाच्या पन्नाशीनंतर पत्नी ज्योत्स्ना समवेत त्यांनी चार ते पाच प्रदर्शने भरवली. दिल्लीच्या ‘आयफॅक्स’ कला संस्थेने १९९७ मध्ये ज्येष्ठ चित्रकार म्हणून त्यांना ‘व्हेटरन आर्टिस्ट’ हा पुरस्कार देऊन गौरविले. पस्तिसाव्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे (विद्यार्थी विभाग) प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित केले होते. कलावंताची मनस्वी उत्कटता आणि अभ्यासकाची वैचारिक शिस्त व अलिप्तता दोन्हींचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. हृदयविकाराच्या आजाराने कदमांचे अकाली निधन झाले. त्यांची चित्रकार पत्नी ज्योत्स्ना व पुत्र शार्दूल आपल्या स्वतंत्र कलाविष्काराने कदमांची परंपरा जोपासताना दिसतात.

- ज्योत्स्ना कदम

 

कदम, संभाजी सोमाजी