Skip to main content
x

केदार, बाबासाहेब आनंद

     बाबासाहेब आनंद केदार यांचा जन्म सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव बुलका पाटलीण होते. त्यांचे वडील आनंद थोर स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्य चळवळीत 1942 व 1946 मध्ये त्यांना तुरुंगात जावे लागले आणि 1946 मध्ये 18 वर्षांचेे बाबासाहेब त्यांच्यासोबत तुरुंगात गेले.

     आनंद यांना 1947 मध्ये देवाज्ञा झाली आणि बाबासाहेब यांच्यावर 8 भावंडांची जबाबदारी पडली. त्यांना कर्जफेड करण्यासाठी घरच्या शेती व्यवसायात लक्ष घालावे लागले. घरची शेती असली तरी खटल्यांमध्ये वारेमाप खर्च होत असल्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय-उद्योगाची जोड असावी हे लक्षात आल्यावर बाबासाहेबांनी गावामध्ये पिठाची चक्की चालू केली व स्वत: ते या चक्कीवर धान्य दळणाचे काम करू लागले. त्यामुळे त्यांना कुटुंबाच्या भरणपोषणाची समस्या सोडविण्यासाठी हातभार लागण्यास मदत झाली.

     बाबासाहेब केदार यांनी 1960 मध्ये राजकारणात प्रवेश केला. बॅरिस्टर शेषराव वानखेडे त्यांचे राजकीय गुरू होते. केदार यांची राजकीय व सामाजिक जडणघडण करण्यात त्याच कुटुंबातील संतोष वानखेडे यांचाही मोलाचा वाटा होता. ते 1960 मध्ये जनपतचे सचिव झाले.

      महाराष्ट्रात 1962 मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाल्या आणि नागपूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान केदार यांना मिळाला. मधला दीड वर्षांचा काळ सोडला तर केदार 1962 ते 1977 पर्यंत दीर्घकाळ या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी ग्रामीण भागात नळ योजना, कुटुंब नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रस्ते व प्राथमिक शिक्षण यांवर अधिक जोर दिला. ते या प्रत्येक कार्यात स्वत: जातीने लक्ष घालायचे. त्यांनी पाटनसावंगी, खापरखेडा, सिलेवाडा, धापेवाडा, व्याहाड येथे लोकवर्गणीतून शिक्षण संस्था उभ्या केल्या.

     केदार यांनी सहकारातील पहिला प्रयोग 1970-1972 मध्ये सुरू केला. श्रीमंत शामराव देशमुख यांची सावनेर येथील खाजगी जिनिंग प्रिसिंग प्रेस उधारीवर विकत घेतली. तथापि ती प्रेस स्वत:च्या खाजगी उपयोगासाठी न घेता त्यांनी ती सहकारी तत्त्वावर चालविण्यासाठी घेतली.

     केदार 1979 मध्ये महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे अध्यक्ष झाले. त्यांच्या काळात 1981 मध्ये शेषराव मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या आधारावर कापूस समितीला महाराष्ट्र राज्य सहकारी बाजार समितीपासून विभक्त केले. विदर्भ व मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सहकारी बाजार समितीचे केदार पहिले नामनियुक्त अध्यक्ष होते.

      इंदिरा गांधी यांनी कापूस उत्पादकाच्या प्रत्येक जिल्ह्यात दोन सहकारी सूतगिरण्या स्थापन करण्याचे धोरण स्वीकारले. या धोरणाला अनुसरून केदार यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारोदारी फिरून भागभांडवल जमा केले. भांडवल लवकर व पर्याप्त गोळा व्हावे यासाठी त्यांनी ज्या तालुक्यातून सर्वात जास्त भागभांडवल जमा होईल त्या तालुक्यात सूतगिरणी स्थापन केली जाईल अशी योजना राबविली. हिंगणा तालुक्यातून जास्त भागभांडवल जमा झाल्यामुळे त्यांनी हिंगण्याजवळील वाना डोंगरी येथे सूतगिरणी उभारली. त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या सूतगिरणीत केला. सूतगिरणीचे स्वभांडवल 18 कोटीचे आहे. गेल्या 30 वर्षांच्या काळात एकही वर्ष या सूतगिरणीने तोटा पाहिलेला नाही. एकूण 27 हंगामांपैकी 15 हंगामात राष्ट्रीय स्वरूपाचा उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार या सूतगिरणीला प्राप्त झाला.

     आशिया खंडात सर्वात मोठे व सर्व सुखसोईंनी युक्त असलेली बाजारपेठ नागपूर कळमना येथे उभे करण्याचे श्रेय केदार यांनाच जाते. रस्ते, शेतकरी निवास, पाण्याच्या सोई उत्कृष्ट स्वरूपात त्यांनी येथे उपलब्ध करून दिल्या.

     ग्रामीण क्षेत्राबाबतचा केदार यांचा अभ्यास लक्षात घेता त्यांच्याकडे 1991 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार सोपविण्यात आला.

- प्रा. जगदीश किल्लोळ

केदार, बाबासाहेब आनंद