किनले, काथोरीना आंद्रिया
मूळची जर्मन, शिक्षण आणि जन्म दक्षिण जर्मनीतील स्टुटगार्ड येथील, मात्र आवड आणि ओढा भारतीय आणि प्राच्यविद्यांचा; वेदाध्ययनाची गोडी, संतसाहित्याचा साक्षेपी अभ्यास आणि पुणेकर होण्याची आवड ही कॅथॉरिनाची वैशिष्ट्ये अगदी प्रथमदर्शनी सांगता येतील. १९७८ मध्ये स्टुटगार्डची ही विदुषी कॅथॉरिना आंद्रिया किनले, जर्मन स्टूडंट फाउण्डेशनची शिष्यवृत्ती स्वीकारून, पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी पुण्यात आली. कॅथॉरिना ट्युबिनजेन विद्यापीठातून ‘संस्कृत भाषा आणि चायनीज भाषा : तौलनिक अभ्यास’ हा विषय घेऊन एम.ए. झाली. प्रसिद्ध जर्मन प्राच्यविद्यापंडित प्रा. पॉलथिमे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पीएच.डी. केली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी ती वेदाध्ययन करण्यासाठी पुण्यात आली.
तिचे वडील एका खासगी नाट्यगृहाचे स्टेज डायरेक्टर होते, तर आई ‘सिनरी-ड्रेपरी’ तज्ज्ञ होती. घरात संस्कृतचा गंध नसताना ती या विषयाकडे वळली याचेच आश्चर्य म्हणावे लागेल. वास्तविक, कर्मठ पिढीच्या मतानुसार स्त्रीला वेदाध्ययनाचा अधिकार नाही. तरीपण संस्कृत वैय्याकरणी डॉ. शि.द. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभ्यास चालू ठेवला. सुरुवातीला संस्कृत व्याकरण डॉ. जोशी यांनी, तर वेदवाङ्मयाचा इतिहास डॉ. विद्याधर भिडे यांनी शिकवला. वेदमंत्र शिकवणारे पुरोगामी पुरोहित म्हणून ख्यात असलेले कै. दाजीशास्त्री सहस्रबुद्धे यांनी तिला संथा दिली. ऋग्वेद-यजुर्वेदाच्या निवडक ऋचा सस्वर म्हणण्याचा, मुखोद्गत करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.
एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, संस्कृतसाठी बनारस की पुणे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असता, कै. डॉ. शांताराम जोशी यांनी जर्मनीत असताना पुण्याचे आमंत्रण दिले. पुण्याच्या वास्तव्यात त्या मराठी भाषा शिकल्या. कुटुंबात राहून शाकाहारी पाककला शिकल्या, संतसाहित्याच्या ओढीने एकदा पंढरपूरची वारीही करून आल्या. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, ‘येथील महिला पाश्चात्त्य वेशभूषेत वावरत असूनही देवपूजा, उपवास, धार्मिक ग्रंथांचे वाचन ह्या परंपरा आवडीने पाळतात आणि त्यामुळेच पुण्यात छोट्या वास्तव्यासाठी आल्यावर त्या हॉटेलऐवजी ओळखीच्या कुटुंबात राहणे पसंत करतात.
१९९७ मध्ये त्यांनी लायप्झिकमधून प्रकाशक फ्रँक स्टेइनर (स्टुटगार्ड) मार्फत ; ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांचे ‘साँग्स ऑफ योगी’ या नावे चिकित्सक अभ्यास करून दोन खंडांमधून प्रकाशन केले. तिसऱ्या खंडातून नाथसंप्रदायावर माहिती देणारा ग्रंथ प्रकाशित केला. १९८४ ते १९८९ या काळात त्यांना जर्मन रिसर्च काउन्सिलने फेलोशिप दिली होती. हे काम त्यांनी कै. डॉ. शं.गो. तुळपुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
मराठी भक्तिसंगीताची त्यांना खूप आवड होती. त्यामुळे अभंग गायक कै. मनोहरपंत सबनीस यांचे शिष्यत्व स्वीकारून त्या सुश्राव्य अभंग-गवळणी शिकल्या. १९९७ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठामार्फत भरलेल्या महाराष्ट्र कल्चर अँड सोसायटीमध्ये त्यांनी भाग घेऊन प्रबंध वाचला होता. तत्पूर्वी जर्मन प्राच्यविद्या पंडित डॉ. गुंथर सोन्थायमार यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय भक्ती परिषदेच्या त्या एक आयोजक म्हणून लोकांसमोर आल्या. त्यानंतरच्या काळात त्यांचा आणि मराठी विदुषी दुर्गा भागवत यांचा खूप स्नेह जमला. त्यामधूनच त्यांनी दुर्गा भागवतांचे ‘लहानी’ हे लेखन जर्मनमधून प्रसिद्ध केले. आचार्य अत्रे यांच्या ‘बुवा तिथे बाया’ या नाटकाचेही त्यांनी जर्मन भाषेत रूपांतर केले.
डॉ. गुंथर सोन्थायमार यांच्या प्रेरणेने त्यांनी खेड्यातील धार्मिक जीवनाचा अभ्यास सुरू केला. विविध जत्रा, लोकदेवतांच्या परंपरा यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. अलीकडेच त्या महाराष्ट्र परिषदेच्या आयोजनात डॉ. अॅन फेल्डहौस (अमेरिका) आणि डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा (रशिया) यांच्या बरोबरीने भाग घेत आहेत. सध्या त्या जर्मनीत आहेत.