Skip to main content
x

कितकुले, प्रकाश दिगंबर

       प्रकाश दिगंबर कितकुले यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाला.  शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. ३० जून १९६३ रोजी ते तोफगोळा विभागात दाखल झाले. लष्करी सेवेत दाखल होताच केवळ आठच वर्षात त्यांच्यावर पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात कामगिरी बजावण्याची मोलाची संधी प्राप्त झाली. त्यांनी या संधीचे अक्षरशः सोने केले असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. त्या वेळी ते मेजर पदावर कार्यरत होते.
       युद्धात त्यांची रेजिमेंट पूर्व सीमेवर तैनात करण्यात आली होती. एका क्षणी त्यांना शत्रूचे सैन्य हल्ला करण्यासाठी सज्ज होत असल्याचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करत कितकुले यांनी तोफगोळ्यांचा अचूक मारा करीत शत्रूला गुंतवून ठेवले.त्यांनी तोफगोळ्यांचा तुफान मारा करीत शत्रूचे मोठे नुकसान केले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य सैरभैर झाले.
      याचा अचूक फायदा उठवीत भारतीय सैन्याने शत्रूवर जोरदार हल्ला चढविला. या अचानक झालेल्या हल्ल्याने शत्रूचे सैन्य पुरते गांगरून गेले. आणि त्यांनी घाईघाईने या भागातून चक्क माघार घेतली. या मोलाच्या कामगिरीमध्ये कितकुले यांनी अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन घडविले. त्यांच्या या कामगिरीमुळे मेजर प्रकाश कितकुले यांना ‘वीरचक्र’ सन्मान देऊन गौरविण्यात आले.

-संपादित

कितकुले, प्रकाश दिगंबर