Skip to main content
x

कलावती, देवी

 

हुबळीच्या सिद्धारूढ स्वामींच्या परमशिष्या आई कलावतीदेवी यांनी महाराष्ट्रात शेकडो उपासना केंद्रे चालवून धर्मजागरणाचे महान कार्य केलेले आहे. त्यांच्या निर्वाणानंतरही त्यांच्या शिष्यवर्गातर्फे अनेक धार्मिक कार्ये सुरू आहेत.

कलावतीदेवी यांचा जन्म ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर धर्मपरायण अशा कल्याणपूरकर घराण्यात, गोकर्ण, महाबळेश्वर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाबूराव व आईचे नाव सीताबाई होते. बाबूराव हे वनौषधी तज्ज्ञ होते व त्यांची कारवार व गोकर्ण येथे औषधांची दुकाने होती. कल्याणपूरकर घराण्यात परमहंस शिवरामस्वामी हे बालसंन्यासी होऊन गेलेले होते.

कलावतीच्या जन्मापूर्वी बाबूराव व सीताबाई यांनी अपत्यप्राप्तीसाठी गोकर्णाला लिंगार्चन पूजा केली आणि गोकर्णाचा प्रसाद म्हणून पुढील वर्षी कलावतीदेवीचा जन्म झाला. कलावती हे त्यांचे आध्यात्मिक साधक नाम आहे. ते त्यांचे गुरू सिद्धारूढ स्वामी यांनी ठेवले. लहानपणी आई-वडिलांनी आपल्या मुलीचे नाव रक्माठेवले व लाडाने बाळअसेच नाव रूढ होते.

लहानपणीच त्यांच्या ठायी अलौकिकत्वाची लक्षणे दिसून येत होती. लहानपणी मुले प्रथम आई-बाबाम्हणत बोलू लागतात, तशी रक्मा (कलावतीदेवी) लवकरच बोलू लागली व पहिला शब्द मुखातून बाहेर पडला तो हरी’! इतर मुले जेव्हा पालथी पडू लागली, तेव्हा रक्मा चक्क चालू लागली! इतर मुले-मुली ज्या वयात भातुकलीचा, बाहुला-बाहुलीचा खेळ खेळत असत, त्या वयात रक्मा निरनिराळ्या देवांच्या मूर्ती घेऊन खेळत असे, भगवान श्रीकृष्ण व राधेचे रक्माला विलक्षण वेड असे. गोकर्णाच्या समुद्रकिनारी फिरावयास, खेळण्यास गेलेली मुले शंखशिंपले गोळा करीत, तर रक्मा वाळूची शंकराची पिंडी करून समुद्राच्या पाण्याने त्याला अर्घ्य देई. रक्माचे वडील बाबूराव हे श्रवणीय बासरीवादन करीत, त्या वेळी छोटी रक्मा त्या सुरावर भगवान श्रीकृष्णाचा कालियामर्दननाच करीत असे. भगवान श्रीकृष्णाची छोटीशी मूर्ती ती सदैव जवळ घेऊनच वावरत असे. झोपतानाही उशीजवळ कृष्णाची मूर्ती पाहिजे, उठताना प्रथम श्रीकृष्णाची मूर्ती दिसली पाहिजे, असा तिचा बालहट्ट असे.

वयाच्या पाचव्या वर्षी ती उत्तम भजने म्हणू लागली. मराठी मातृभाषेबरोबरच कानडी ही परिसर भाषा आणि एवढेच नव्हे, तर गुजराती-हिंदी या भाषांतील अनेक उत्तमोत्तम भजने ती म्हणत असे. एकदा दारावर आलेल्या बैराग्याकडून तिने चा नाद ऐकला व पुढे सतत ओम्-ओम्असा उच्चार करण्याचा तिला नाद लागला. श्रीगुरू सिद्धारूढ स्वामी यांनी अनुग्रह देईपर्यंत तिचा हा ओंकार चालू राहिला. तिला धार्मिक व्रत-वैकल्यांची विशेष आवड होती. मोठ्या महिलांसमवेत कार्तिक महिन्यातील स्नानासाठी भल्या पहाटे उठून ती समुद्रस्नानास जाई. इतर महिलांना समुद्रस्नानानंतर थंडी वाजत असे; पण रक्माला प्रसन्न वाटत असे. ती ओल्या अंगानेच गोकर्णाला पाणी घालण्यास जाई.

वयाच्या पंधराव्या वर्षी आई-वडिलांनी योग्य स्थळ पाहून रक्माचे लग्न लावले. तिरकोईनूर या गावातील इन्स्पेक्टर असलेल्या एम. राजगोपाल यांच्याशी रक्माचे लग्न झाले. सासरचे सर्व वातावरणही धर्मपरायण होते. त्यामुळे धार्मिक वृत्तीच्या रक्माबाईस मोठी अनुकूलता लाभली. आनंदात संसार सुरू झाला. दोन वर्षांनी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, त्याचे नाव श्रीकृष्णाची आवड असणाऱ्या रक्माबाई यांनी बाळकृष्णअसे ठेवले. पुढे दोन वर्षांनी त्यांना आणखी एक मुलगा झाला, तो कमलाकर’.रक्मादेवीच्या नशिबात संसारसुख एवढेच होते. पुढे वर्षभरात पती एम. राजगोपाल यांचे अकाली निधन झाले. पुढे वडील व सासऱ्यांचेही निधन झाले. रक्मादेवी हा आघात सहन करू शकल्या नाहीत. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या प्रसंगी एका साधूने त्यांना परावृत्त केले व ‘‘हुबळीला सिद्धारूढ स्वामींकडे जा, ते तुझी वाट पाहत आहेत,’’ असा उपदेश केला.

त्यानंतर दोन मुलांना घरी ठेवून रक्मादेवी गोकर्णहून चालत हुबळी येथे गेल्या. सिद्धारूढ स्वामींच्या मठात प्रवेश करताच, त्यांना पाहताच स्वामी म्हणाले, ‘‘आलीस! ये, मी तुझीच वाट पाहत होतो !’’ १९२८ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर सिद्धारूढस्वामींनी रक्मादेवीला अनुग्रह दिला. तिचे नाव कलावतीदेवीअसे ठेवले व त्यांना प्रवचन करण्यास सांगितले.

कलावतीचा साधनाकाळ पूर्ण होताच स्वामींनी कलावतीदेवींच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या आठ तास समाधिवस्थेतच राहिल्या. यानंतर त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. गुरु आज्ञेने व मदतीने बेळगावजवळ अनगोळयेथे परमार्थ निकेतन हा त्यांचा आश्रम तयार झाला. तेथून त्यांचे कार्य सुरू झाले. गावोगावी उपासना केंद्रांची सुरुवात झाली. त्यांचा भक्तवर्ग वाढत गेला. आज हजारो उपासना केंद्रांद्वारे लाखो भक्तांच्या हृदयात त्या निवास करीत आहेत, मार्गदर्शन करीत आहेत. अशा कलावतीदेवींचे वयाच्या सत्तराव्या वर्षी वृद्धापकाळाने आजारी पडून, जसलोक हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच देहावसान झाले.

- विद्याधर ताठे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].