Skip to main content
x

कोल्हे, शंकर गेनुजी

     शंकर गेनुजी कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगावमध्ये शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोपरगाव येथील एस. जी. विद्यालयात झाले; तर माध्यमिक शिक्षण पुण्यामधील मॉडर्न विद्यालयामध्ये झाले. त्यांनी 1951 मध्ये कृषी विषयातील बी. एस्सी. ची पदवी ‘कृषी महाविद्यालय, पुणे’ येथून मिळवली. त्यांनी नोकरी न करता वडिलोपार्जित शेतीचा व्यवसायाचा पर्याय निवडला आणि शेती करण्यास सुरुवात केली.

     शंकरराव कोल्हे हे 1951 मध्ये काकासाहेब वाघ यांची तृतीय कन्या, सिंधू हिच्याशी विवाहबद्ध झाले. त्याचवर्षी त्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळविण्यासाठी भारत सरकारच्या फोर्ड फाऊंडेशनच्या वतीने अमेरिकेला जाण्याची सुवर्णसंधी मिळाली. तसेच त्यांना कोपरगाव येथील तालुका विकास मंडळ या संस्थेचे अध्यक्ष होण्याचा मानही मिळाला. तेव्हा त्यांनी आधुनिक बी-बियाणे, खते, शेती प्रदर्शन भरविले व शेतकर्‍यांना पत्रे, लोखंडी, अवजारे यांचे वाजवी दरात वाटप केले.

     कोल्हे यांनी 1960 मध्ये संजीवनी सहकारी कारखान्याची नोंदणी करण्यासाठी अथक परिश्रम केले. सहजानंद भारती, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने व त्यांचे मित्र मुरलीधर लोणारी व यशवंतराव गिरमे यांच्या सहकार्याने हा साखर कारखाना स्थापन झाला व या साखर कारखान्याचे कोल्हे हेच पहिले अध्यक्ष झाले.

     कोल्हे यांनी पुण्याच्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी; प्रिमियर को-ऑपरेटिव्ह प्रिन्टर्स (लि.) पुणे, संजीवनी शिक्षण संस्था (कोपरगाव), संजीवनी शैक्षणिक शेती आणि ग्रामविकास सेवाभावी संस्था, यशवंत सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्था मर्या., सहजानंदनगर या संस्थांच्या स्थापनेतही महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. त्यांनी दिल्लीच्या इंडियन एक्सपोर्ट कॉर्पोरेशन या संस्थेचे संचालक व अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांनी नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेचेही संचालकपद सांभाळले. त्यांनी 1970 ते 1973 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ या फेडरल संस्थेचे अध्यक्षस्थान भूषविले. महाराष्ट्राच्या ऊससंवर्धन व विकासाचे काम करणार्‍या डेक्कन साखर संस्थेमध्ये ते संचालक म्हणून कार्यरत होते. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदीही त्यांची निवड झाली.

     शेतीला पूरक म्हणून दूध व्यवसाय शेतकर्‍यांना करता यावा म्हणून कोल्हे यांनी गोदावरी खोरे दूध उत्पादक संघाची स्थापना केली. साखर कारखान्याचे आधुनिकीकरण तसेच साखर उत्पादनातील तोटा कमी करणे, त्यासाठी बॉयलरचे नूतनीकरण करण्याचा व त्या आनुषंगाने उत्पादनामध्ये वाढ करण्याचा पहिला प्रयत्न कोल्हे यांनी संजीवनी साखर कारखान्यात करून दाखविला. साखर व्यवसायात बरोबरीनेच उपपदार्थांची निर्मिती करणे आवश्यक असते व त्यातून मिळणार्‍या पैशांतून ऊस उत्पादकांना रास्त दर मिळेल या हेतूने प्रेरित होऊन  कोल्हे यांनी संजीवनी साखर कारखान्यात रासायनिक पदार्थ तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या कारखान्याबरोबरीनेच त्यांनी तालुक्यातील दुसर्‍या सहकारी संस्था, पंचायत समिती, बाजार समिती यांसारख्या संस्थांना यथोचित मार्गदर्शन केले.

     कोल्हे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यही महत्त्वपूर्ण आहे. ते भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. कोपरगाव तालुक्याच्या आर्थिक प्रगतीबरोबरच शैक्षणिक प्रगती व्हावी या उद्देशाने त्यांनी कोपरगाव येथ एस. एस. जी. एम. महाविद्यालय, गौतम कला व संजीवनी वाणिज्य महाविद्यालयांची स्थापना केली. संजीवनी साखर कारखान्याच्या साहाय्याने त्यांनी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थापना करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. राजकारणात प्रवेश करण्यासाठी कोल्हे यांनी काँग्रेस पक्षाची निवड केली. ते 1972, 1978 व 1984 या तिन्ही वेळेस कोपरगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले गेले. कोल्हे यांना नितीन, मिलीन, बिपीन असे तीन पुत्र असून निलिमा नावाची मुलगी आहे.

     - संपादित

कोल्हे, शंकर गेनुजी