Skip to main content
x

कोलते, प्रभाकर महादेव

     १९७० नंतरच्या कालखंडावर अमूर्त शैलीतील आपल्या चित्रांचा ठसा उमटवणारे व अनेक तरुण चित्रकारांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे एक महत्वाचे चित्रकार म्हणजे प्रभाकर कोलते.अमूर्त चित्र निर्मिती बरोबरच त्या चित्रांचा तात्विक आशय ते समपर्क शब्दात मांडतात. अमूर्त चित्रांचा आस्वाद यांबाबत कोलत्यांनी वेळोवेळी लिखाण केले, त्यामुळे अमूर्त चित्रे आणि रसिक यांच्यातील दरी काही प्रमाणात कमी झाली.

प्रभाकर महादेव कोलते यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील नेरूरपार येथे झाला. त्यांच्या आईचे नाव इंदिराबाई होते. वर्दे हे त्यांचे मूळ गाव. वडील सेंच्युरी कापडगिरणीमध्ये नोकरीला असल्यामुळे कोलते कुटुंब मुंबईला आले. कोलते यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. प्राथमिक शाळेतल्या दातार मास्तरांनी त्यांना चित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले व नंतर छबिलदास शाळेत एम.एस.जोशी चित्रकला शिक्षक म्हणून आले, त्यांनी कोलते यांना अकरावीनंतर जे.जे.मध्ये जायचा सल्ला दिला. कोलते यांचे मामा चित्रे काढीत असत. त्यांचेही संस्कार होतेच. याशिवाय दलाल, मुळगावकर यांची दिवाळी अंकांमधली, पुस्तकांवरची चित्रे पाहत कोलते यांची अभिरुची घडत गेली.

कोलते यांनी १९६३ मध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. चित्रकार म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडण्यामध्ये जे.जे.मधले तत्कालीन वातावरण आणि शंकर पळशीकरांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. कोलते वरळीच्या बावन चाळीच्या परिसरात सेंच्युरी कापडगिरणीच्या कर्मचारी वसाहतीमध्ये लहानाचे मोठे झाले. त्या परिसरातील कोलाहल, चांगल्या-वाईटाची सरमिसळ, मध्यमवर्गीय संस्कारांचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव, वरळीचे त्या काळातले दंगे, मारामाऱ्यांचे सामाजिक वातावरण यांमुळे खरे तर कोलते सामाजिक आशयाच्या मनुष्याकृतिप्रधान चित्रांकडे वळायचे; पण पळशीकर, मोहन सामंत, अंबादास, गायतोंडे यांच्या सहवासात आल्यामुळे आणि पॉल क्लीच्या अभ्यासातून जाणिवा विकसित होत गेल्यामुळे कोलते बाह्य वास्तवापेक्षा अंतरंगातल्या अबोध वास्तवाच्या शोधात रमले आणि विशुद्ध संवेदनांचे अमूर्त विश्‍व त्यांच्यासाठी खुले झाले. कविता करणे, क्रिकेट खेळणे व गाणे-बजावणे-नाटक हे सगळे कोलत्यांच्या अंगातच होते. जे.जे.त विद्यार्थी असताना नाटकात जाण्याची संधी आणि प्रलोभनही होते. पण पळशीकरांच्या इशाऱ्यामुळे कोलते इतर कलांच्या फंदांत फारसे पडले नाहीत, आपली सारी सर्जकशक्ती त्यांनी चित्रकलेवरच केंद्रित केली.

कोलते जे.जे.मध्ये शेवटच्या वर्षाला असताना वार्षिक प्रदर्शनात लागलेले कोलत्यांचे चित्र केकू गांधी यांनी विकत घेतले आणि त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्याची तयारी दर्शवली. यावर ‘आधी तुझी ओळख (आयडेंटिटी) शोध आणि मगच प्रदर्शने कर’ असा पळशीकरांनी सल्ला दिला आणि कोलत्यांनी तो मानला.

कोलते यांनी १९६८ मध्ये जी.डी. आर्ट (पेंटिंग) पदविका प्राप्त केली. दोन वर्षे फ्री-लान्स आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर १९७०-७१ मध्ये त्यांनी अर्थार्जनासाठी ‘बॉम्बे डाइंग’मध्ये टेक्स्टाइल आर्टिस्ट म्हणून काम केले. टेक्स्टाइल डिझाइनर म्हणून जम बसत असतानाच चित्रकार म्हणून आपली घुसमट होईल या भावनेने त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी १९७२ ते १९९४ ही बावीस वर्षे जे.जे.मध्ये अध्यापन केले. या दरम्यान १९७९ मध्ये त्यांचा विवाह ज्योती देढिया यांच्याशी झाला. त्या देखील चित्रकार असून चित्रप्रदर्शनात त्यांचा सहभाग असतो. या काळात कोलते यांचा चित्रकार म्हणून विकास झाला आणि एक शिक्षक या नात्याने त्यांनी अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे घडवण्यासाठी प्रोत्साहन दिले. विद्यापीठ हे शिक्षक-विद्यार्थी यांनी एकत्रितपणे चालवायची प्रयोगशाळा व्हायला हवी असे कोलते यांचे मत आहे. अंतर्गत राजकारण, परीक्षा पद्धती आणि चाकोरीबद्ध व्यवस्थापन यंत्रणा याला कंटाळून कोलते यांनी १९९४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली.

निसर्गचित्रांवर कोलते यांचे पहिले प्रेम होते. विद्यार्थिदशेत निसर्गचित्रांच्या बाबतीत एम.एस.जोशी आणि व्यक्तिचित्रणात कोलते यांना संभाजी कदम यांचे अनुकरण करायला आवडे. पुढील काळात, जे.जे.त शिकवत असताना त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांची काही तैलचित्रे रंगवून त्यांचे प्रदर्शन केले होते. जलरंग माध्यमाची आवड कोलते यांना एम.एस. जोशींमुळे निर्माण झाली. व्यक्तिचित्र असो की निसर्गचित्र, कोलतेंना पाश्‍चात्त्य चित्रकारांच्या अभ्यासातून हे उमगले की, रंगांचे फटकारे एक स्वतंत्र मूळ घटक बनून विविध आकार बांधण्याची क्षमता बाळगून असतात. ब्रिटिश अकॅडमिक शैलीतून आलेली निसर्गचित्रांची परंपरा सोडून कोलते रंग आणि आकार यांमध्ये रमले त्याला पॉल क्लीचा प्रभाव कारणीभूत झाला. कोलते यांच्या आधीच्या रझा, गायतोंडे, रामकुमार अशा चित्रकारांचा अमूर्त कलेकडे प्रवास निसर्गचित्रापासूनच झाला होता. पॉल क्लीचा प्रभाव पळशीकर, गायतोंडे यांच्यावरही होता. पण कोलते यांनी स्वतंत्रपणे हा मार्ग चोखाळला.

वयाच्या पंचविशीपर्यंत मुंबईत ते राहत असलेल्या परिसरातील चाळींच्या इमारती, तेथील जिने, भिंतींवरच्या अस्पष्ट प्रतिमा, रंगांचे ओघळ, बंद दरवाजे, टेकू लावून उभ्या केलेल्या बाल्कन्या, मधूनच दिसणारे अवकाशाचे तुकडे यांच्यामध्ये कोलते यांना त्यांचे नवे चित्र दिसायला लागले. या चित्रांचे पॉल क्लीच्या चित्रांशी साधर्म्य असल्याचे सहकाऱ्यांनी सांगताच कोलते यांनी पॉल क्लीच्या चित्रांचा, त्याच्या कलाविषयक भूमिकेचा अभ्यास केला. पॉल क्ली हा चित्रकार आणि कलाशिक्षक या दोन्ही भूमिका तितक्याच समर्थपणे निभावणारा प्रतिभावंत होता. ‘बा हाउस’ मध्ये शिक्षक झाल्यानंतर पॉल क्लीने ‘पेडॅगॉजिकल नोटबुक’ लिहिले; त्याचा कोलते यांनी अभ्यास केला. कोलते यांनी क्लीच्या प्रभावाखाली सहा-सात वर्षे काम केले. साधारणपणे १९८० च्या दशकातील त्यांच्या चित्रांमध्ये नुसत्या खुणा, चिन्हे, सुलेखनाचे वाटावेत असे फटकारे, कॅलिग्रफिक स्ट्रोक्स येऊ लागले. साधारणपणे १९९४-९५ पासून त्यांची सध्याची शैली प्रस्थापित झालेली दिसते. तैलरंगातील जाड रंगलेपनाबरोबरच अ‍ॅक्रिलिक आणि जलरंगात त्यांनी कामे केलेली आहेत. अलीकडे जलरंगाचे माध्यम त्यांनी अमूर्त शैलीतील त्यांच्या चित्रांसाठी मुख्यत: हाताळलेले आहे. या त्यांच्या चित्रांमध्ये राखाडी, करड्या अशा अलिप्ततेकडे झुकणाऱ्या रंगांनी व्यापलेले अवकाश दिसते. कोपऱ्यांमध्ये किंवा एका बाजूला एकाआड एक दडलेले दृश्यजाणिवांचे विविध स्तर, त्यांतून मुक्त होऊ पाहणारे प्रकाशाचे रंग हे रंगांची जडता आणि प्रकाशाची ऊर्जा यांची बदलती नाती सूचित करतात.

कोलते यांनी त्यांच्या कलानिर्मितीमागची भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे. त्यांच्या मते, ‘आपल्या दृष्टीला जो दिसतो तो निसर्ग म्हणजे खऱ्या निसर्गाची सर्जनचिन्हे!’ त्या चिन्हांपलीकडच्या गूढ निसर्गाचे आकर्षण कोलत्यांना वाटत आले आहे. निसर्गाची सर्जनव्यवस्था त्यांना कलाजगताच्या दृष्टीने आदर्श वाटते. कोणत्याही संदर्भाविना त्या निसर्गाने आधी घडवले, मग पाहिले; तसेच चित्रांचे असावे असे त्यांना वाटते. म्हणून कोलते आधी ठरवून विशिष्ट विषय घेऊन चित्र काढत नाहीत. त्यांची चित्रे घडत जातात, तो प्रवासच त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे कोलतेंचे प्रत्येक चित्र हे अनेक स्थित्यंतरातून जात जात झालेल्या प्रवासाचे एक - एक पाऊल आहे.

त्यांची चित्रे शून्यातून वास्तवात येतात, ती वास्तवाची प्रतिकृती नाहीत. टिंब, रेषा, आकार, पोत, रंग या चित्रघटकांच्या आधाराने कलाकृतीची अंगभूत क्षमता आणि तिची अंत:स्थ रचना समजली की मग बाह्यविश्‍व जिथून उदयाला आले, त्या उगमस्थानाच्या आत या चित्रघटकांच्या साहाय्याने डोकावता यायला हवे. कोलते म्हणूनच बाह्य जगातल्या अर्थांच्या कुबड्या न घेता, ते जग नाकारून आतल्या जगात प्रवेश करतात. चित्रकला ही एक भाषा आहे; पण तिचे स्वरूप आणि व्याकरण इतर कुठल्याही भाषेवर बेतलेले किंवा अवलंबून नाही. कोलते यांनी अभ्यास आणि अभिव्यक्ती यांच्यातला आणि कलानिर्मिती आणि कलाशिक्षण यांच्यातला समतोल यशस्वीपणे राखला आणि त्यामुळे या भिन्न, पण परस्परपूरक घटकांचा त्यांच्या कलानिर्मितीवर विपरीत परिणाम कधी झाला नाही. अमूर्त चित्रकलेचा बऱ्याच वेळा आध्यात्मिक, गूढवादी तत्त्वज्ञानाशी संबंध लावला जातो. कोलते यांना असे अर्थ लादणे योग्य वाटत नाही. म्हणूनच ते म्हणतात, ‘‘माझी चित्रे कृती आहेत, प्रतिकृती नव्हेत. त्यांना फक्त वर्तमानच आहे. ती अवकाशतत्त्वाने अधिक भारलेली असतात. स्वत:च्याच रंग-धर्माने ओथंबलेली असतात. निर्विकल्प असतात, निराकाराला भिडलेल्या आकारासारखी.’’

कोलते यांनी केलेले कलाविषयक लेखन हा त्यांच्यातल्या कलाशिक्षकाचाच एक वेगळा पैलू आहे. कोलते मुळात कविवृत्तीचे आणि कविता लिहिणारे. ही त्यांची काव्यात्म वृत्ती त्यांच्या कलाविषयक लेखनातही आढळते. त्यांनी १९६८-६९ मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये  कलाप्रदर्शनाबद्दल लेखन केले. यात त्यांनी हुसेन यांच्या प्रदर्शनावर केलेल्या टीकेमुळे हुसेन यांनी तक्रार केली व हे समीक्षात्मक सदर बंद करण्यात आले. पुढे हुसेन यांनी आपल्यावर कोलते यांनीच पुस्तक लिहावे अशी इच्छा २०१० च्या दरम्यान व्यक्त केली.

स्वत:च्या चित्रप्रक्रियेबरोबरच इतर समकालीन चित्रकारांच्या चित्रांविषयी त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. त्यांनी १९०२ पासून ‘मौज’ दिवाळी अंकासाठी अनेक पाश्‍चात्त्य आणि भारतीय चित्रकारांविषयी लेखन केले आहे. ‘कलेपासून कलेकडे’ या चित्रप्रवास दर्शविणाऱ्या त्यांच्या पुस्तकाला २०१० मध्ये ‘श्रीमती दुर्गा भागवत’ पुरस्कार प्राप्त झाला. एम.एफ. हुसेन यांच्यापासून ते व्ही.एस.गायतोंडे आणि एफ.एन.सूझांपासून मनजीत बावा यांच्यापर्यंत विविध प्रकारच्या चित्रकारांचे काम स्वागतशील, पण अभ्यासू वृत्तीने समजून घेण्याची आणि ते इतरांना सांगण्याची वृत्ती त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे चित्रकार स्वत:च्या कलाप्रक्रियेबद्दल कमी बोलतात आणि इतरांबद्दल त्याहून कमी लिहितात. कोलते यांच्यासारख्या सर्जक कलावंताच्या मतांना त्यामुळे एक वेगळे महत्त्व लाभते. परंतु कोलते यांची स्वत:ची अशी एक कलाविषयक आग्रही भूमिका असून त्याद्वारे ते कलेतील नावीन्य, आधुनिकता व अमूर्तता यांचा आत्यंतिक पुरस्कार करतात. प्रसंगी ते अन्य प्रकारच्या कलानिर्मितीवर कठोर टीकाही करतात. 

कोलते यांना १९७० मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक, तर १९७१-७२ मध्ये राज्य कला पुरस्कार प्राप्त झाले. त्यांना १९७८ मध्ये इंडो-जर्मन कल्चरल सोसायटीचा ‘डॉ. लँगहॅमर’ पुरस्कार प्राप्त झाला. दृक्कलेतील विशेष योगदानासाठी त्यांना २०१० मध्ये ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा ‘जनस्थान’ पुरस्कार मिळाला. त्यांनी काही संस्थांसाठी व्यावसायिक भित्तिचित्रे (म्यूरल्स) तयार केली आहेत.

गॅलरी केमोल्ड (१९८३, १९८७, १९९०, १९९३), साक्षी गॅलरी (१९९१,२०००), आर्ट हेरिटेज, नवी दिल्ली (१९९२), वाढेरा गॅलरी, नवी दिल्ली (१९९७), गॅलरी फाउण्डेशन फॉर इंडियन आर्टिस्ट, अ‍ॅमस्टरडॅम (१९९६), अ‍ॅडमिट वन गॅलरी, न्यूयॉर्क (१९९९), गॅलरी मुलर अ‍ॅण्ड प्लेट, म्युनिक, जर्मनी (२००१) अशा अनेक नामवंत आयोजकांनी त्यांची एकल प्रदर्शने केली आहेत. ट्वेंटिफाइव्ह इयर्स ऑफ इण्डिपेण्डन्स, ललितकला अकादमी, नवी दिल्ली; बिनाले ऑफ रूपंकर, भारत भवन, भोपाळ; सिक्स इंडियन पेंटर्स प्रेझेंटेड बाय आयसीसीआर, युगोस्लाविया, इस्तंबूल, अंकारा; फेस्टिव्हल ऑफ पर्थ, ऑस्ट्रेलिया; थ्री आर्टिस्ट्स, माया गॅलरी, हाँगकाँग, ख्रिस्तीज यासारख्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आयोजनांमध्ये व चित्रलिलावांत त्यांच्या चित्रांचा समावेश झाला आहे.

कलानिर्मितीइतकेच रसिक आणि विद्यार्थ्यांची अभिरुची जोपासण्याला महत्त्व देणारे प्रभाकर कोलते यांची प्रतिमा चिंतनशील चित्रकार अशी राहिलेली आहे.

- नीलिमा कढे, दीपक घारे

कोलते, प्रभाकर महादेव