Skip to main content
x

कोपरकर, गंगाधर नारायण

     गंगाधर नारायण कोपरकर यांचा जन्म भिवंडी येथे झाला. नारायण आणि सरस्वती यांचा हा जेष्ठ पुत्र. वडील भिवंडी येथील दत्तमंदिराचे पुजारी. आत्यंतिक गरिबी. पण पुढे शिकण्याची जबरदस्त इच्छा होती. ७ वी झाल्यानंतर ते पुण्यात आले. ते एक नामवंत गायक होण्यासाठी. पुण्याच्या पत्र्यामारूतीच्या मंदिरात राहून १० घरी माधुकरी मागून त्यांनी गांधर्व महाविद्यालयात प्रवेश मिळविला. पण त्यांच्याकडे फीचेही पैसे  नव्हते म्हणून शेण आणून महाविद्यालयातील जमीन दर आठ दिवसाला सारवून फी चे ३ रु. महिना त्यांनी भरून दिले. संगीत विशारदपर्यंत संगीताचे शिक्षण घेऊन ख्याल गायकीपर्यंत संगीतविद्या आत्मसात केली. नंतर प्रसिद्ध कीर्तनकार भिलवडीकर शास्त्री यांच्या घरी राहून कीर्तन, संस्कृत व वेदांत तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. तसेच हरि कीर्तनोत्तेजक पाठशाळा येथेही कीर्तनाचे शिक्षण घेऊन कीर्तनाचा सखोल अभ्यास करून कीर्तनशलाकाही पदवी प्राप्त करून ते प्रसिद्ध कीर्तनकार बनले. आजपर्यंतच्या क्षणापर्यंत कीर्तनशलाकाही पदवी मिळविणारे ते एकमेक कीर्तनकार आहेत.

याच कालावधीत त्यांनी एक वर्षात ३ इंग्रजी इयत्ता करुन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करुन बी.ए. ऑनर्सपर्यंत महाविद्यालयाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. प्रपंच चालविण्यासाठी गुजराथी हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यासाठी त्यांनी संस्कृतची काव्यतीर्थही परीक्षा दिली. या गुजराथी हायस्कूलमध्ये नोकरी करतानाच गुजराथी भाषा आत्मसात केली. नोकरी सोडताना त्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत व गुजराथी भाषा बोलता येत होत्या. 

त्यानंतर त्यांनी कीर्तनक्षेत्रात पदार्पण केले. हिंदू धर्माचे जनजागरण करण्यासाठी प.पू. करपात्रीजी महाराजांनी स्थापन केलेल्या रामराज्य परिषदेमध्ये सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रांतिकचे प्रमुख पद स्वीकारुन महाराष्ट्रात त्यांनी धडाक्याने प्रचार कार्य केले. त्यांनी सुद्धा मुंबईमधून निवडणूक लढविली. याचकाळात जगद्गुरू शंकराचार्यांचे प्रतिनिधी म्हणून पुढे येऊन भारताच्या १३२ कलमी घटनेवर योग्य तेथे आक्षेप घेऊन काही कलमात बदल घडवून आणला. या कामी त्यांची अभ्यासू वृत्ती कामास आली.

कीर्तनकार हे समाजाचे प्रबोधन करणारे शिक्षक आहेत. त्या दृष्टिने त्यांनी प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करुन आज आपण श्रोत्यांना काय देणार आहोत? कोणते विचार त्यांच्या गळी उतरविणार आहोत? याची तयारी आपल्याजवळ पक्की हवी, असा त्यांचा आग्रह होता. पूर्वरंग बांधलेला व पक्का हवा, त्यामध्ये विषयांतर नसावे अशी त्यांची कीर्तनाविषयी आग्रही भूमिका होती. असे कीर्तनकार तयार करण्यासाठी सर्वप्रथम दै. सकाळचे संस्थापक संपादक कै. नानासाहेब परुळेकर यांनी हरि कीर्तनोत्तेजक सभा पुणेया संस्थेच्या माध्यमातून मे महिन्यात वासंतिक वर्ग सुरु केले. तेव्हा पाठ्यपुस्तकाशिवाय शिकविणे योग्य नाही. म्हणून भक्तितत्त्वनिरुपण हे ग. ना. कोपरकरांनी पूर्वरंगाचे व काही टाचणासहीत पुस्तक लिहिले. ते हरिकीर्तनोत्तेजक सभेने प्रकाशित केले आहे. त्यामध्ये कीर्तनाचा आत्मा असणारा भक्ति हा विषय परिपूर्ण दिलेला आहे.

कीर्तनाद्वारा प्रचारकार्य चालू असतानाच त्यांनी कीर्तनकारांची संघटना करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी पहिले कीर्तनसंमेलन गोवा राज्यात १९७६ मध्ये झाले. तिथेच कीर्तन महाविद्यालयाची घोषणा झाली व १९७७ पुण्यात कीर्तन महाविद्यालय सुरु झाले.

त्यानंतर हिवरे (बुलढाणा), नाशिक, जळगाव, मुंबई, डोंबिवली येथे संमेलने झाली. याच काळात दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फेही  कीर्तन संमेलन भरविण्याचा प्रघात त्यांनी सुरु केला. कीर्तन महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाची रुपरेषा ठरल्यानंतर बी.ए. च्या डिग्रीनंतर ३ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी धर्मतत्त्व निरुपण, नामतत्त्व, खिशातील कीर्तनशिक्षक, कीर्तन अध्यापन, कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया अशी उपयुक्त पुस्तके लिहून ती अभ्यासक्रमात लावली. या महाविद्यालयात ३/३ वर्षाच्या २ बॅचेस शिकून, बाहेर पडल्या. त्या परिपूर्णतेने उत्तीर्ण झाल्यानंतर कीर्तनाचार्यही पदवी मिळाली. आज महाराष्ट्रात जे प्रथितयश कीर्तनकार नाव मिळवून आहेत त्यामध्ये त्यांच्याकडे शिकलेले व महाविद्यालयात शिकलेल्या कीर्तनकारांची नावे अग्रक्रमाने घेता येतील ती अशी- सु. ग. शेवडे, न. चिं. अपामार्जने, उद्धवबुवा जावडेकर, आप्पा कुलकर्णी, भरतबुवा रामदासीमनोहरबुवा दीक्षित, सुधाताई धामणकर.

याच उपक्रमाबरोबर परदेशात कीर्तनकार पाठविण्याची योजना आखून १२ कीर्तनकार परदेशी पाठवून अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका देशात कीर्तनाद्वारा धर्मपताका फडकाविली. हा एक नवीन विक्रम करताना कीर्तनकारांना हिंदी, इंग्रजी, गुजराथीमधून कीर्तने तयार करुन कीर्तने त्यांनी बसवून घेतली. कीर्तनकार कसा असावा याविषयी त्यांची काही मते होती. कीर्तनकार पदवीधर असावा, त्याला कमीत कमी संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषा यायलाच पाहिजेत व या भाषेतील वचनांचा त्यांनी मराठी बरोबर उपयोग करावा. पाश्चात्यांचे दाखले दिल्याने, आपले बोलणे वजनदार होते. आपल्या धर्मतत्त्वज्ञानाचा सिद्धांत मांडताना तो आजच्या विज्ञानाशी घासूनपुसून मांडला पाहिजे हे सांगताना ते स्वतः त्यांच्या कीर्तनात असे सिद्धांत मांडत असत. कीर्तनात आपली भाषा शुद्ध व स्पष्ट हवी. पूर्वरंग वजनदार हवा व तो मांडताना धर्मतत्त्वज्ञानाची कास सोडता कामा नये तर उत्तररंग रसपरिपूर्ण हवा. तो श्रोत्यांच्या हृदयाला जाऊन भिडला पाहिजे. कीर्तनकाराला कोणताही विषय वर्ज्य नाही. त्यामुळे कीर्तनात समाजकारण, राजकारण, धर्मकारण असावे. त्या विषयांवर सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी अखंड वाचन व्यासंग जोपासला पाहिजे. कीर्तन हे एकपात्री प्रयोग आहे. कीर्तनात संगीत, ताला सुराचे ज्ञान, निवेदनशैली, प्रसंगोपात्र विनोद असावेत. पण ते उच्चप्रतिचे व दर्जेदार असावेत. ही सर्व तयारी त्यांनी विद्यार्थ्यांची करून घेतली होती. कारण या सर्व विषयामध्ये ते पारंगत होते. समाज प्रबोधनाचे कार्य करीत असताना त्यांनी नवनवीन प्रयोगही केले.

१००० चटई कीर्तनाचा संकल्प सोडून तो पुरा केला. प्रत्येक घरात जाऊन आपलीच चटई पसरून १० मिनिटे कीर्तन लोकांना ऐकवून ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. कीर्तन महोत्सव साजरे करुन कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. आजही ती परंपरा चालू आहे.

कीर्तनकलेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी सरकार दरबारी मानसन्मान मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यशासनाचा पुरस्कार पहिला पुरस्कार धर्मभास्कर कोपरकरांनाच मिळाला. कीर्तनकारांना स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून कीर्तनकला व तिचे महत्त्व शासनाला पटवून देऊन आज वृद्ध कीर्तनकारांना कलाकार पेन्शन मिळू लागले आहे. त्या उपक्रमासाठी ९९ पुस्तके लिहिली व काही वर्षे भारतीय वाङ्मयमालाही मासिक वार्तापत्रिका चालविली व त्याद्वारा घरी बसून हजारो घरात जनजागरण व ज्ञानदानाने समाज प्रबोधन केले. याच वार्तापत्रिकेतून वनौषधी, गोवंश महत्त्व, तुलसीमहत्त्व, ऋषीतत्त्व राजकारण विषय हाताळले व ते लोकांपर्यंत पोचविले.

वेदवाङ्मय स्मृति मनुस्मृति याज्ञवल्क्य मराठीत आणून एक अभिनव प्रयोग केला. अत्यंत अल्प किंमतीत हा संच विक्रीस उपलब्ध करुन दिला. त्यांच्या अगदी शेवटच्या काळात १९८९ मध्ये तपोधामहे धर्मप्रचार केंद्र त्यांनी सुरु केले. या केंद्रातर्फे कीर्तनोपयोगी, धर्मवाङ्मय छापणे तसेच सदाचार आणि संस्कृतीहे मासिक चालविले जाते. कीर्तनकार व प्रवचनकार शिबिरे भरविले जातात. तसेच ८ ते १२ वयोगटाच्या मुलामुलींसाठी १५ दिवसांची निवासी शिबीरे ही घेतली जातात. कीर्तन महोत्सव हेही तपोधामचे एक वैशिष्ट्य आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी साधकाश्रम ही चालविला जातो. कोपरकरांचे वास्तव्य अखेरपर्यंत येथेच होते.

 - सुधा धामणकर

कोपरकर, गंगाधर नारायण