Skip to main content
x

कुलकर्णी, भीमराव बळवंत

     डॉ. भीमराव कुलकर्णी (एम.ए., पीएच.डी.) या सर्वपरिचित नावाने  साहित्य वर्तुळात माहीत असणारे भीमराव हे बहुरंगी कर्तृत्ववान असणारे साहित्यिक होते. मराठी कथा, कादंबरी, समीक्षा आणि संपादन या चार विषयांत त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण लेखन आहे.

     स.प.महाविद्यालय (पुणे), मॉडर्न महाविद्यालय विभाग प्रमुख (१३ वर्षे, पुणे) आणि नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, मुंबई या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे काम केले आणि ते करता-करता १५-१६ छोटे-मोठे ग्रंथही लिहिले. डॉ. भीमराव यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे साहित्य-संस्थात्मक कार्याची त्यांना प्रचंड आवड होती. जवळ-जवळ १५-१६ वर्षे त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव या दोन साहित्य-संस्थांची मनोभावे सेवा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांनाही त्यांचे नेहमी सहकार्य असे.

     महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह (१९७०-७३), कार्याध्यक्ष (१९७३-७६) आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिका या त्रैमासिकाचे संपादक (१९८२-८५), म्हणजे पदाधिकारी या नात्याने त्यांचा विविध साहित्य संस्थांशी १५ वर्षे जिव्हाळ्याचा संबंध होता. १९८६-८७ या काळात ना.दा.ठा.विद्यापीठात (मुंबई) अध्यापकाची नोकरी धरल्यामुळे साहाजिकच ते मुंबई  मराठी संघाच्या कार्यात रस घेऊ लागले. प्रा. गंगाधर गाडगीळ (अध्यक्ष) आणि भीमराव कार्यवाह अशी उत्तम जोडी त्या काळात जमली होती. ऑक्टोबर १९८६ मध्ये मुंबईला जे साठावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (अध्यक्ष विश्राम बेडेकर) भरले होते, ते मुख्यतः गंगाधर गाडगीळ आणि भीमराव या दोघांच्याच कर्तृत्वाने! या संमेलनाच्या यशसस्वितेसाठी भीमराव खूप राबले होते. आपल्या देहात कॅन्सरने प्रवेश केला आहे, याचेसुद्धा भान त्यांना राहिले नाही. या संमेलनानंतर वर्षभरातच त्यांना मृत्यूने गाठले. त्यांचा स्वभाव महत्त्वाकांक्षी आणि विलक्षण धडपड्या होता. भीमरावांना शेवटी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष व्हायचे होते. त्याचप्रमाणे ते झालेही, पण मंडळाच्या पहिल्या सभेलाच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सावरत आणावे लागले. त्यानंतर आठवड्याने ते मृत्यू पावले, खरे तर त्यांनी मृत्यू ओढवून घेतला.

     डॉ.भीमराव यांच्या नावावर १५-१६ लहानमोठे ग्रंथ आहेत. त्यांतील बहुतेक ग्रंथ हे संपादनात्मक असून ‘मराठी फार्स (१९८७) -१९वे शतक’ हा तर संकलनात्मक आहे. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची भाषणे (खंड १ ते ३) हा ग्रंथसुद्धा संकलनात्मकच आहे. त्याला ना आवश्यक प्रस्तावना ना टीपा! ‘साहित्य पत्रिकेतील लेखनाची सूची’ हा ग्रंथ त्यांनी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या साहाय्याने सिद्ध केला. १९७०मध्ये साहित्य परिषदेच्या हीरक महोत्सवाच्या प्रसंगी त्यांनी जी स्वतंत्र सचित्र स्मरणिका संपादन केली, ती उत्तम आणि संग्राह्य आहे. डॉ. भीमराव यांना अनेक विषयांत रस होता. भाषा, व्याकरण, शुद्धलेखन या विषयांतही त्यांना गती होती. वक्तृत्वकला आणि शिकविण्याची हातोटी या दोन गुणांमुळे विद्यार्थीवर्ग त्यांच्यावर खूश असे. त्यांची एकमेव व स्वतंत्र अशी कलाकृती म्हणजे ‘हरि नारायण’ ही हरिभाऊ आपटे यांच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी होय. चरित्रात्मक  कादंबरी लिहिण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला, यात शंकाच नाही. स्वामी विवेकानंद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन चरित्रे स्वतंत्र असली, तरी ती मुख्यतः कुमार वाचकांसाठी लिहिलेली वाटतात. ‘मराठी गद्याचा पूर्वरंग’ आणि ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ हे त्यांच्या नावावरील ग्रंथ, प्रायः जुन्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण आहे. प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांनी ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’चे विस्तृत प्रस्तावनेसह पुनर्मुद्रण केले आहे. 

     डॉ. भीमराव यांचे खरे सामर्थ्य स्वतंत्र लेखनात नव्हते, संपादनात होते. या क्षेत्रात ते खरोखरी वाघ होते. अच्युत बळवंत कोल्हटकरः वाङ्मय दर्शन (१९६२), वाङ्मयीन रसास्वाद (१९६५), सं.सौभद्र, आमचे जीवन आमच्या स्मृती (१९६६), भाऊसाहेबांची बखर (१९६६), श्री शिवाजी महाराज यांचे सप्त प्रकरणात्मक चरित्र (१९६७), संपूर्ण वाग्वैजयंती (१९८५), वामन पंडितांची सुधाकाव्ये (१९८५), मराठी वाङ्मय चर्चा आणि चिकित्सा (समीक्षा) अशी त्यांची उत्तम संपादने आहेत. जुन्या-नव्या ग्रंथांच्या संपादनात ते निश्चितच यशस्वी ठरले. पण इतके सारे ग्रंथलेखन आणि संपादन करून डॉ.भीमराव यांचे मराठी साहित्यात नेमके स्थान कोणते, हे ठामपणे सांगणे कठीण आहे. त्यांचे खरे बळ संपादनात होते आणि त्या खालोखाल समीक्षेत होते. 

     डॉ. भीमराव कुलकर्णी साहित्य क्षेत्रातले मोठे कार्यकर्ते होते आणि यातच त्यांचे  मोठेपण होते. संस्थात्मक कार्य करताना त्यांनी बहुविध लेखन-संपादन केले ही कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे. पण त्यांनी मांड ठोकून गंभीरपणे अशी रचना केली नाही. संस्थात्मक कार्यातच ते अधिक रमले. भीमरावांसारखे वाहून घेणारे कार्यकर्ते असतात, म्हणून साहित्य संस्था चालत असतात. अन्यथा संस्था अकार्यक्षम तरी होतात नाहीतर बंद तरी पडतात. कार्यकर्ता  आणि साहित्यिक या दोन्ही नात्यांनी त्यांचे कार्य आदर्शवत होते.         

- म. श्री. दीक्षित

कुलकर्णी, भीमराव बळवंत