Skip to main content
x

कुलकर्णी, रेखा जयंत

चित्रपटसृष्टीत अनुपमा या नावाने परिचित असणाऱ्या मूळच्या रेखा कुलकर्णी यांचा जन्म मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील जयंत कुलकर्णी हे रेल्वेत नोकरीला होते, तर आई अलका कुलकर्णी या एल.आय.सी.मध्ये कामाला होत्या. रेखा कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण मांटुग्याच्या लोकमान्य विद्यामंदिर येथे झाले, तर पुढील शिक्षण त्यांनी रुपारेल महाविद्यालयातून घेतले. याच दरम्यान रेखा यांना मधुसूदन कालेलकर यांच्या ‘आसावरी’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. याच नाटकादरम्यान मधुसूदन कालेलकर यांनी रेखा यांचे नाव ‘अनुपमा’ असे ठेवले.

अभिनयाचा कोणताही वारसा नसणाऱ्या, तसेच  अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण न घेतलेल्या रेखा कुलकर्णी यांच्या घरच्यांकडे ग.दि. माडगूळकर यांनी चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली. परंतु घरतल्या जुन्या वळणामुळे त्यांना अनेक दिवस परवानगी मिळाली नाही, पण कालांतराने ग.दि. माडगूळकरांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे रेखा यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी काम केलेला आणि प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट म्हणजे ‘घरची राणी’ (१९६८). या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयामुळे त्यांना ‘धर्मकन्या’ (१९६८) या चित्रपटात भूमिका मिळाली. त्यातील दारिद्य्रात होणारी तरुण मुलीची भावाकुल अवस्था अनुपमा यांच्या अभिनयातून व्यक्त झालेली आहे. त्यानंतर अनुपमा यांनी ‘एक माती अनेक नाती’ (१९६८), ‘आधार’ (१९६९), ‘तांबडी माती’ (१९६९), ‘देवमाणूस’ (१९७०), ‘नाते जडले दोन जिवांचे’ (१९७१), ‘पाठराखीण’ (१९७२), ‘राजा शिवछत्रपती’ (१९७४), ‘सापळा’ (१९७६) ‘परिवर्तन’ (१९७९) या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या.

मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका केलेल्या अनुपमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केल्यावर ‘संसार’, ‘दुनिया क्या जाने’, ‘सांस भी कभी बहू थी’, ‘दो बच्चे दस हाथ’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘पाप और पुण्य’ या चित्रपटांमधून भूमिका केल्या. अनुपमा यांनी मराठी व हिंदी पाठोपाठ गुजराती चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा ठसा उमटवला. ‘धरती ना लोलू’ या गुजराती चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना गुजरात सरकारने पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला. तसेच ‘जेसल तोरल’ (१९७१), ‘जेहर तो विखा जानी’ (१९७७) या दोन्ही चित्रपटांतील भूमिकांसाठी अनुपमा यांना गुजरात सरकारतर्फे गौरवण्यात आले आहे.

चित्रपटात काम करत असतानाही अनुपमा यांनी नाटकांमधूनही कामे केली. ‘अपराध मीच केला’, ‘सुखाचा शोध’ या नाटकात त्यांनी साकारलेल्या भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण होत्या.

नाट्य, चित्रपट कारकिर्द बहरत असतानाच बडोद्याचे डॉ. दिलीप धारकर यांच्याशी अनुपमा यांनी प्रेमविवाह केला. विवाहानंतर अनुपमा शिकागोला स्थायिक झाल्या. तेथेही अनुपमा या आकाशवाणीवर, दूरदर्शनवर कार्यरत असून नाटके बसवण्यातही व्यग्र आहेत. 

- महेश टिळेकर
 

 

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].