Skip to main content
x

कुलकर्णी, रमेश विष्णू

      मेश विष्णू कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणीजवळच्या शिरगुप्पी या खेडेगावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण बेळगावातील बेनन्स स्मिथ विद्यालयात, तर उच्चशिक्षण मुंबईमधील सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. नेहमीच्या सरधोपट मार्गावरून न जाता काहीतरी वेगळे करायचे या अंत:प्रेरणेतून त्यांनी संरक्षण दलाचे कार्यक्षेत्र निवडले.

     १९५६च्या जून महिन्यात पायदळ भूसेनेत प्रथम गढवाल रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. १९७१ ते १९७३ या काळात अरुणाचल प्रदेशातील (पूर्वीचे नेफा) उंच डोंगराळ भागात एका तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले. त्यानंतर १९८१ ते १९८३ या काळात नागालँडमध्ये बंडखोर आणि प्रतिकूल वातावरणात त्यांनी अतिशय जबाबदारीचे काम पार पाडले.

     एप्रिल १९८७ ते फेब्रुवारी १९८९ या काळात उत्तरेकडील सीमारेषेवर म्हणजे कारगिलपासून काडगोदम भागात मुख्यत्वे सियाचीनच्या सीमासंरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले. याच कालावधीत दोन महत्त्वाच्या लढायांचे त्यांनी यशस्वीरीत्या नियोजन केले. वीस हजार फूट उंचीवर शून्याखालील तापमानात हे युद्ध लढले गेले. या युद्धात शौर्य गाजवलेल्या जवानांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना सन्मान पदके देऊन गौरवण्यात आले. १९८७मध्ये पाकिस्तानकडून आपल्यावर जो हल्ला झाला, त्या हल्ल्याची सर्व आखणी परवेझ मुशर्रफ यांची होती. त्यावेळी मुशर्रफ पाकिस्तानचे ब्रिगेड कमांडर होते.

     १९९० ते १९९१ या काळात ते आसाम रायफल्सचे महासंचालक होते. त्या वेळी संपूर्ण पूर्वांचलातल्या आठ राज्यांची त्यांच्यावर जबाबदारी होती. आठही राज्यांच्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे ते सुरक्षा सल्लागार होते. उंच पर्वतशिखरांवरील, तसेच भूप्रदेशावरील अनेक सैनिकी कारवायांचे नियोजन आणि प्रत्यक्ष कारवाईत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. १९८८ ते १९९३ या काळात त्यांनी आसाम रायफल्समध्ये कर्नलपदी काम केले. १९९३ सालच्या एप्रिल महिन्यात ते ‘अ‍ॅडज्युटंट जनरल’ म्हणून भूसेनेतून निवृत्त झाले.

     त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्निंग बॉडी ऑफ सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटचे (औरंगाबाद) ते अध्यक्ष होते. ज्या तरुण मुलांना एन.डी.ए., आय.एम.ए. इत्यादी ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांची या संस्थेत सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाते. १९९४ ते २००५ या काळात त्यांनी या विद्यार्थ्यांच्या निवडप्रक्रियेचे काम केले.

     निवृत्तीनंतर भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांना भारत सरकार आणि नागा फुटीरतावादी यांच्यातील ‘युद्धबंदी करारा’च्या अंमलबजावणीची देखरेख करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. दोन्ही बाजूंकडून कराराचे पालन योग्य रीतीने होते आहे का नाही ते पाहणे आणि नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते एकमेव असे सेनाधिकारी होते, की जे युद्धबंदी करारावर सह्या  करणाऱ्यादोन्ही गटांना मान्य होते.

     यापूर्वी  नागालँडमध्ये ब्रिगेड कमांडर म्हणून आणि आसाम रायफल्समध्ये महासंचालक म्हणून काम करताना नागा फुटीरतावाद्यांकडेे बघण्याच्या त्यांच्या मानवी दृष्टिकोनाचा सर्वांना चांगलाच अनुभव होता; त्यामुळे त्यांनी कुलकर्णी यांच्यावर विश्वास दाखवला. या कामाची धुरा सांभाळत असताना भारत सरकारची संरक्षण दले म्हणजे भूसेना, आसाम रायफल्स, केंद्रिय राखीव पोलीस दल, सीमासुरक्षा दल आणि राज्य पोलीस अशा ईशान्य प्रदेशातील सर्व शासकीय संरक्षण संस्था आणि नागा फुटीरतावादी यांच्यामधील दूत म्हणून त्यांनी काम केले. या दोन्ही गटांतील एकमेकांच्या तक्रारी तटस्थपणे कोणालाही झुकते माप न देता सोडवणे,  घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहणे आणि ठरलेले नियम दोघांनाही पाळायला लावणे ह्या सर्व गोष्टी तोलामोलाने सांभाळणे ही तारेवरची कसरत त्यांनी लीलया पार पडली. अर्थात हे त्यांच्यासाठी फार मोठे आव्हान होते.

     त्यांनी आपल्या पदाची बांधीलकी कायमच अधिक महत्त्वाची मानली. दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची वेळोवेळी बैठक घेणे, नागा फुटीरतावाद्यांशी अनौपचारिक संवाद साधणे, एखाद्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे अशा ठिकाणी जातीने भेट देणे आणि समस्येवर तोडगा काढणे ही कामे त्यांना करावी लागत. अनेकदा त्यांना नागा फुटीरतावाद्यांच्या छावण्यांनाही भेट द्यावी लागत असे. अशा वेळी कधी त्यांच्याबरोबर पोलीस संरक्षण असे, तर कधी ते संरक्षणाशिवाय भेटी देत.

     नागालँडमधल्या सर्व स्तरांतल्या लोकांना त्यांच्याविषयी विश्वास वाटावा म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या सर्व भागांतून त्यांनी प्रत्यक्ष प्रवास केला. अध्यक्षपदी जबाबदारी सुरुवातीला एक वर्षासाठी ठरलेली होती, पण प्रत्येक वर्षी ती वाढत जाऊन साडेसात वर्षे म्हणजे २००८पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. ते वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षापर्यंत हे काम करत होते.

     त्यांनी अनेक जबाबदार्‍या समर्थपणे आणि प्रभावीपणे सांभाळल्या. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेची ‘आर्मी कमांडर’ ही पदवी मिळाली. संरक्षण दलातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक सन्मान देऊन गौरवण्यात आले.

     १९८१ ते १९८३ या काळात नागालँडमधल्या फुटीरतावाद्यांना नियंत्रणात ठेवल्याबद्दल १९८४मध्ये त्यांना ‘अतीविशिष्ट सेवा पदक’ मिळाले. १९८७च्या सियाचीन युद्धाच्या उत्तम नियोजन आणि कामगिरीबद्दल १९८८मध्ये त्यांना ‘उत्तम युद्ध सेवा पदक’ मिळाले आहे. सैन्यदलातल्या ३७ वर्षांच्या संपूर्ण कामगिरीबद्दल १९९३मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.        

     - मानसी आपटे

कुलकर्णी, रमेश विष्णू