Skip to main content
x

कवीश्‍वर, गजानन वासुदेव

       जानन वासुदेव कवीश्वर यांचा जन्म मंडलेश्वर , जिल्हा खारगाव, मध्य प्रदेश येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मंडलेश्वर व इंदूर येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी एम.ए. व एल.एल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर इंदूरच्या होळकर महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले आणि पुढे तेथूनच प्राचार्यपदावरून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर त्यांनी मुक्तलेखनास वाहून घेतले.

      कवीश्वर हे नीतीचे पुरस्कर्ते, महाभारताचे संशोधक व श्रीमद्भगवद्गीतेचे विशेषज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘नीती आणि कलोपासना’ (१९३४) व ‘पावित्र्यविडंबनाचा वाद’ (१९४८) हे साहित्य विचारातील तात्त्विक विवेचन करणारे त्यांचे ग्रंथ महत्त्वपूर्ण मानले जातात. पहिल्या ग्रंथात कला व नीती यांचा परस्पर संबंध स्पष्ट करताना नीतीवर येणाऱ्या सर्व आक्षेपांना समर्पक उत्तरे देत कलेचा नीतीशी असलेला निकटचा संबंध दाखवून त्यांनी कलावादी भूमिकेचे खंडन केले आहे. या ग्रंथास अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही लाभले.

      ‘पावित्र्यविडंबनाचा वाद’ या त्यांच्या दुसऱ्या ग्रंथात अनिष्ट प्रभाव दाखवू लागलेल्या व साहित्य क्षेत्रातील पावित्र्याची हेटाळणी करू पाहणाऱ्या विडंबनकारांच्या प्रवृत्तीमुळे निर्माण झालेल्या वादाचा तात्त्विक परामर्श घेतला आहे. विषयाचे उत्तम आकलन, मुद्देसूद मांडणी, तर्कशुद्ध विवेचन व तात्त्विक भूमिकेचा आग्रह इत्यादी वैशिष्ट्यांमुळे वरील ग्रंथ दर्जेदार समीक्षाग्रंथ ठरले आहेत.

      त्यांनी वैचारिक व ललित अशा दोन्ही प्रकारचे लेखन मराठीबरोबरच इंग्लिश व हिंदी या भाषांतून केले. त्यांचे अन्य लेखन असे - मराठी : ‘वर्तमान काळ’ (१९४४, पत्रात्मक सामाजिक कादंबरी), ‘इंदूपासून हिंदू’ (१९८९, व्युत्पत्तिशास्त्र), ‘ज्ञानेश्वरी विरुद्ध गीता’ (१९८०, वैचारिक), ‘महाभारताची गूढ रहस्ये’ (१९९०, वैचारिक); इंग्लिश : ‘मेटाफिजिक्स ऑफ बर्क्ले’ (१९३३), ‘एथिक्स ऑफ गीता’ (१९७१), ‘क्रॉनोलॉजिकल सिक्रेट्स ऑफ महाभारत वॉर’ (१९७१)- सर्व समीक्षात्मक; हिंदी; ‘महाभारत के तेरह वर्ष’ (१९७७, समीक्षा).

     कवीश्वर यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले असून त्यात रावराजे साहित्य पुरस्कार (गोवा) व इचलकरंजी एज्युकेशनल ट्रस्टचा पुरस्कार आदींचा समावेश आहे.

- संपादित

कवीश्‍वर, गजानन वासुदेव