Skip to main content
x

खारकर, नारायण चिंतामण

          शेतकरी व ग्राहक यांच्या हिताची काळजी करणाऱ्या नारायण चिंतामण खारकर यांचा जन्म नाशिक येथे झाला. बेळगाव, रत्नागिरी, सुरत, सातारा व खानदेश अशा विविध ठिकाणी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी १९३३मध्ये ‘डेअरी व अ‍ॅनिमल हजबंडरी’ हे विशेष विषय घेऊन बी.एजी. ही पदवी प्रथम वर्गात संपादन केली. त्या वेळेस वनस्पति-विकृतिशास्त्र व कृषि-अभियांत्रिकी या विषयांत त्यांनी सर्वात अधिक गुण मिळवले होते.

          बेलापूर साखर कारखान्यात सबओव्हारसियर म्हणून १९३३मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून १९७०मध्ये महाव्यवस्थापक या पदावरून ते निवृत्त झाले. या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ऊस पिकाचे संशोधन व उत्पादन, मृदा संधारण, पडीक जमीन विकास व कारखान्याच्या कायदेशीर बाबी इ. अनेक गोष्टींवर आपल्या कामाचा ठसा उमटवला.

          त्यांनी विविध परिषदांमध्ये ऊस संशोधनासंबंधीचे अनेक निबंध प्रसिद्ध केले. ‘CO 475 and Rust disease’ त्यांच्या या निबंधाला १९५३ सालचा उत्कृष्ट निबंध म्हणून डे.शु.टे.अ. या संस्थेने पारितोषिक दिले होते. साखर उद्योगातील चुकीच्या शासकीय धोरणावर प्रकाश टाकल्यामुळे त्यांना सी.बी.आय.च्या चौकशीला सामोरे जाण्याचा प्रसंग आला. या निबंधाची टाइम्स ऑफ इंडिया व इकॉनॉमिक्स टाइम्स या प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी दखल घेऊन प्रसिद्धी दिली. तांत्रिक सल्लागार डॉ. अरेकरी व डॉ. गुंडुराव व रिझर्व्ह बँकेनेदेखील अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून याची नोंद घेतली. यावर वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्रुटी निवारण केल्या. ‘ट्विस्टेड टॉप’ या उसावरील नवीन रोगाच्या खारकर यांनी केलेल्या संशोधनाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय विकृतिशास्त्रज्ञांनी त्यास मान्यता दिली व जागतिक संशोधनपर नियतकालिकात त्याचा उल्लेख केला.

          कारखान्याच्या क्षेत्रातील जमिनीचे सर्वेक्षण करून पडीक जमीन लागवडीयोग्य करणे, पाणथळ व क्षारयुक्त जमिनी लागवडीखाली आणणे, ऊस उत्पादनासाठी मजुरी व पाणी बचत इ. साखर उत्पादनवाढीसाठीचे उपाय इ. कार्यक्रम त्यांनी राबवले. दुष्काळाच्या काळात चाऱ्यात बगॅस व मळी यांचा वापर करून जनावरे वाचवली, तसेच त्यामुळे चाऱ्यातही बचत झाली.

          फलटण शुगर वर्क्सच्या कृषी विभागाचे कामकाज कार्यक्षमतेने व्हावे; म्हणून खारकर यांना निमंत्रित केले होते. त्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणीही केली.

          पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या खताच्या मात्रा कारखान्याच्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे बसवून त्याची अंमलबजावणी, नवीन शिफारस केलेल्या वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड व चाचणी, पाणी वाचवण्यासाठी सिंचनाच्या विविध पद्धती (दोन सर्‍यांचा तनपुरी वाफा), लागवडीची एक डोळा पद्धत, पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी सऱ्यामध्ये पाचरांचे आवरण, स्पेंट वॉश व निचऱ्याच्या पाण्याचा पुनर्वापर इत्यादी गोष्टींचा वापर करून त्यांनी मजूर, पाणी व बी यांवरील खर्च कमी केला. कमी मजुरात खताचे समान वाटप व्हावे; म्हणून त्यांनी बैलावर चालणारे अवजार तयार केले. पोत्याला मळीचे आवरण देऊन ते त्यांनी उसाच्या ओलीतून फिरवल्यामुळे ग्रासहॉपर व पायरीला या किडी कमी खर्चात नियंत्रणात आल्या. त्यांच्या या प्रयत्नामुळे २० वर्षांच्या कालावधीत त्यांचे उसाचे उत्पादन ४० टनांवरून ६० टनांपर्यंत पोहोचले.

          या कामाव्यतिरिक्त कारखान्याच्या कोर्ट केसेस व इतर प्रशासकीय जबाबदारीही त्यांनी सांभाळली. त्यांचे ऊस सल्लागाराचे काम सेवानिवृत्तीनंतरही सुरू होते.

          त्यांच्या या योगदानाबद्दल विविध संस्थांनी मानपत्रे देऊन त्यांचा सन्मान केला होता. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन स्थापनेपासून (१९४५) सभासद, मौलिक संशोधनाबद्दल सन्मान व मानचिन्ह, पुणे विद्यापीठ व रावबहादूर शेंबेकर ट्रस्टचा १९९५ सालचा कृषिविज्ञान पुरस्कार, बळीराजातर्फे सन्मान व मानपत्र (१९९७), शारदा ज्ञानपीठम्तर्फे पूजनीय तपस्वी म्हणून पुणे महापालिकेतर्फे सत्कार (२००२) असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.

- संपादित

खारकर, नारायण चिंतामण