Skip to main content
x

खेर, भालचंद्र दत्तात्रेय

     भालचंद्र खेर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या गावी झाला. बालपण, शालेय शिक्षण कर्जत, नगर येथे झाले.  मॅट्रिक आणि बी. ए. मात्र पुण्यातील स. प. महाविद्यालयातून झाले.

     वकिली घराणे म्हणून एलएल. बी. केले. परंतु व्यवसायासाठी आवश्यक असलेली स. प. महाविद्यालयाची परीक्षा मात्र दिली नाही. मूळ पिंड साहित्यिकाचाच! स. प. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना श्री.म. माटे यांच्यासारखे गुरू लाभले. त्यांची भेट सलग १७ वर्षे रोज होत असे. साहित्य प्रवाह, साहित्य विषयक चर्चा, वाचन हे सारे नित्यनेमाने होत असे.

     २२ वर्षे ‘केसरी’चे सहसंपादक म्हणून काम केले. १० वर्षे सह्याद्रीचे संपादक म्हणून काम पाहिले. त्यांच्या पत्नी संजीवनीबाई या मुंबई आकाशवाणीवर गायिका म्हणून काम करीत. वैवाहिक जीवनात त्यांची एकमेकांना सुरेल साथ लाभली.

     मूळ लेखनाचा गाभा क्रांतिकारी विषय हाताळण्याचा असला, तरी खेर यांनी सर्व साहित्य आकृतिबंध हाताळले. ‘नादलहरी’ कथासंग्रह (३ सप्टेंबर १८३९), पानशेत पुरावरची ‘नंदादीप’ (१९६२), ‘आनंद जन्मला’ (१९६५) ही पुस्तके व समाजातील त्या-त्या वेळच्या महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करणारे लेखन त्यांनी केले आहे.

     वि. स. खांडेकर हे त्यांचे मामेभाऊ होत. त्यांच्याबरोबर अनेकदा त्यांच्या साहित्यविषयक चर्चा व्हायच्या. काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी घेऊन १९६८ साली ‘यज्ञ’ ही सावरकरांवरची त्यांची कादंबरी प्रथम प्रकाशित झाली. त्या काळात ‘यज्ञ’च्या अकरा हजार प्रतींची प्रकाशनपूर्व नोंदणी झाली. इथूनच चरित्रात्मक कादंबरीकार म्हणून त्यांना सूर गवसला.

     ‘चाणक्य’, ‘हसरे दुःख’, ‘आनंदभुवन’(क्रांतिवीर चाफेकर), ‘समर सौदामिनी’ (राणी लक्ष्मीबाई), ‘अमृतपुत्र’ (लाल बहादूर शास्त्री) असे विविध विषयांवरचे चरित्रग्रंथ प्रकाशित झाले आणि त्यांना रसिकमान्यता मिळाली.

     १९८४ साली युनेस्को वर्ल्डपीस सेंटरच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेली ‘हिरोशिमा’ ही क्रांतिकारी ठरली. ह्या कादंबरीच्या आवृत्त्या अनेक भाषांमध्ये निघाल्या. हिरोशिमाच्या मेयरने जगातील ग्रंथसंग्रहासाठी सन्मानपूर्वक जतन केलेली ही कादंबरी होय. बालगंधर्वांवरच्या ‘गंधर्वगाथा’चे लेखन भा.द.खेर यांच्या कलासक्त मनाची साक्ष देते.

     सर्वस्पर्शी लेखन करणार्‍या खेर ह्यांची ११७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘आनंदभुवन’ आणि ‘हिरोशिमा’ यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची पारितोषिके मिळालेली आहेत. त्यांच्या ‘हसरे दुःख’ला न.चिं.केळकर पुरस्कार मिळाला, ‘हिरोशिमा’ला महाराष्ट्र राज्य पुरस्कारसुद्धा मिळाला.न. चिं. केळकर पुरस्कार, ह. ना. आपटे पुरस्कार असे सन्मानही त्यांना लाभले आहेत. 

     ‘लोकमान्य टिळक दर्शन ‘ हे त्यांचे पुस्तक २०१७ साली प्रसिद्ध झाले. 

     - विनया देसाई

खेर, भालचंद्र दत्तात्रेय