Skip to main content
x

लाहोटी, पूरणमल सूरजमल

     पूरणमल सूरजमल लाहोटी यांनी तत्कालीन हैदराबाद (निजामशाही) आणि आताचा मराठवाडा या विभागात शिक्षणक्षेत्रासाठी दिलेले योगदान लक्षणीय आहे. व्यवसायात स्वकष्टाने कमावलेल्या संपत्तीचा उपयोग त्यांनी मागासलेल्या मराठवाड्यात शिक्षणप्रसारासाठी केला. सुरुवातीला या विभागाचे तत्कालीन नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत दिली.

     नंतर १९४० ला त्यांनी लातूरला श्री मारवाडी राजस्थान शिक्षणसंस्था स्थापन करुन श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाची उभारणी केली. या दोन्ही संस्थांना आवश्यक ते सर्व आर्थिक पाठबळ पूरणमल यांनीच दिले. आज अनेक दशकानंतरही लातूरचे हे विद्यालय राज्यातले दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळखले जाते.

     सुमारे ५०/५५ वर्षापूर्वी मुलींच्या शिक्षणाबाबत मराठवाड्यातील समाजाची मानसिकता तशी निरुत्साहीच होती. राजा पूरणमल यांनी मात्र द्रष्टेपणाने स्त्रीशिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. राजस्थान विद्यालय स्थापनेच्या सुमारासच त्यांना समजले की, त्यांच्या एका स्नेह्याच्या पत्नी सुशीला दिवाण या आपल्या घरीच काही मुलींना शिकवतात. पूरणमल यांनी दिवाण यांच्याशी चर्चा केली आणि मुलींसाठी वेगळी शाळा उभारण्याचा निश्‍चय केला. त्यांच्या अथक प्रयत्नांनी १९४६ ला लातूरमध्ये श्रीमती गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय सुरू झाले. सुरुवातीची काही वर्षे या विद्यालयाचा आर्थिक भार पूरणमल यांनी स्वतः उचलला. पूरणमल यांनी शिक्षणाविषयीची आस्था त्यांचे स्नेही आणि मराठवाड्याचे अग्रणी नेते बाबुरावजी परांजपे आणि चंद्रशेेखर बाजपेयी यांना माहिती होती. पूरणमल यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक म्हणून या दोन स्नेह्यांनी १९५६ ला पूरणमल लाहोटी तंत्र निकेतनची स्थापना केली. त्यानंतर ते तंत्रनिकेतन १९६२ ला राज्यशासनाकडे सोपवण्यात आले. 

     राजा पूरणमल यांनी उभारलेल्या शिक्षणाचा हा वटवृक्ष आता बराच विस्तारला आहे. या संस्था लातूरच्या श्री मारवाडी राजस्थान शिक्षणसंस्थेशी संलग्न आहेत. श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, श्रीमती गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, श्री पूरणमल लाहोटी पाठशाला, श्रीमती गोदावरीदेवी लाहोटी प्राथमिक विद्यालय, सौ. केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालय, श्री बंकटलाल लाहोटी इंग्लीश प्रायमरी स्कूल, श्री पूरणमल लाहोटी बालक मंदीर, श्रीमती गोदावरीदेवी लाहोटी बालक मंदीर, श्री मारवाडी राजस्थान बालक मंदीर, श्री मारवाडी राजस्थान तरण तलाव, श्री मारवाडी राजस्थान हेल्थ क्लब.

     हैद्राबाद मुक्ती लढा हा भारतीय स्वातंत्रलढ्याचा एक वेगळा पैलू आहे. राजा पूरणमल लाहोटींना हैदराबाद भारतात सामील व्हावे असेच वाटत होते. व्यावसायिक मर्यादांमुळे ते मुक्तिलढ्यात थेट सहभागी होऊ शकले नाहीत पण त्यांनी अप्रत्यक्षपणे मदत भरपूर दिली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने १९५२ ला पूरणमल यांची राज्यसभेवर नियुक्ती केली.  आपल्या व्यवसायात कामगारांना समाधानी ठेवण्यावर त्यांचा मोठा भर होता. प्रत्येक स्तरावरच्या कामगारांच्या कुटुंबियांची ते आवर्जून काळजी घेत. मालकीच्या दोन्ही गिरण्यांमध्ये पूरणमल यांनी कामगारांसाठी निवृत्तीवेतनाची प्रथा सुरू केली. इतकेच नाही तर शक्य तेवढ्या कामगारांना गिरणी परिसरातच निवासस्थाने बांधून दिली. बऱ्याच वेळी ते कारखान्यातल्या सामान्य उपहारगृहात कामगारांबरोबरच जेवत असत.

    - सुधाकर कुलकर्णी

लाहोटी, पूरणमल सूरजमल