Skip to main content
x

लचके, हरिश्चंद्र भगवंत

        रिश्चंद्र भगवंत लचके यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे झाला. त्यांचे बालपण कुर्डुवाडीला गेले. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने अतिशय कष्टाने मुलांना वाढविले व शाळेत घातले. लचके यांच्या चित्रकलेच्या आवडीला तिथे प्रोत्साहन मिळाले.

लचके यांच्या घराजवळ एक किराणा मालाचे दुकान होते. त्या काळी किराणा दुकानदारांना लागणारी रद्दी आपल्याकडे परदेशातून यायची. त्यांच्याकडच्या रद्दीत अमेरिकन मासिके खूप असायची. त्यांतल्या व्यंगचित्रांनी त्यांना भुरळ घातली. हास्यचित्रांचे धडे त्यांनी परदेशी मासिकांतून गिरवले असे ते स्वत:च सांगत. त्यांची चित्रकलेची आवड जाणून त्यांच्या थोरल्या भावाने त्यांना औंधला नेले. औंधचे राजेसाहेब मोठे कलाप्रेमी होते. चित्रकलेसाठी तिथे स्वतंत्र विद्यालय होते. तिथे त्यांना प्रवेश मिळाला.

दोन वर्षांनंतर भावाच्याच सल्ल्यानुसार लचके पुण्याला आले. त्यांनी पुरममास्तरांकडे चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घेतले आणि सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची शासकीय पदविका, जी.डी. आर्ट, पेंटिंग १९४३ मध्ये संपादन केली.  कलाशिक्षणासाठी लचके यांना थोरले बंधू काशिनाथ यांचा खूप पाठिंबा होता, तर व्यंगचित्रांच्या रेखाटनासाठी शं.वा. किर्लोस्कर यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केले.

सर्वसाधारण मराठी वाचकांना व्यंगचित्रांची गोडी लावण्याचे कार्य लचके यांनी केले. त्यांच्यापूर्वी मराठी वृत्तपत्रांतून काही व्यंगचित्रे प्रकाशित होत होती. त्यांत बरीचशी राजकीय किंवा प्रबोधनपर असायची. परंतु लचके यांनी कौटुंबिक विषयांवर सातत्याने आणि संख्येने भरपूर चित्रे काढली. त्यामुळे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचली व लोकांत व्यंगचित्रांची आवड निर्माण झाली.

हरिश्चंद्र लचके यांनी राजकीय व्यंगचित्रेही खूप काढली. ‘लोकशक्ती’ या काँग्रेसच्या मुखपत्रात त्यांनी नियमित व्यंगचित्रे काढली. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, त्यांनी फक्त सामाजिक विषयच हाताळले. तरीसुद्धा, त्यांच्या एका राजकीय व्यंगचित्राचा उल्लेख करायला हवा.‘अ‍ॅटॉमिक एग हॅज हॅच्ड’ असा त्याचा मथळा होता. अणुबाँबच्या स्फोटानंतर जपान शरण आला, या घटनेवर आधारित असे ते व्यंगचित्र होते. अणुबाँबच्या अंड्यातून जपानी पिल्लू बाहेर पडले आहे, त्याच्या चोचीत ऑलिव्हची डहाळी आहे आणि ते शांततेची विनंती करीत आहे, असे ते चित्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पहिल्या पानावर १७ ऑगस्ट १९४५ रोजी प्रसिद्ध झाले होते. त्या काळी टाइम्सवर एका हिंदी युवकाचे चित्र ही विशेष गोष्ट होती. लचके यांची काही चित्रे हिंदी आणि इंग्लिश मासिकांतून प्रकाशित झाली होती.

व्यंगचित्रांप्रमाणे व्यंगचित्रपटाचे माध्यमही लचके यांना खुणावीत होते. काही मित्रांच्या मदतीने त्यांनी तीन व्यंगपट (अ‍ॅनिमेशन फिल्म्स) तयारही केले; परंतु एकूणच तो सारा आतबट्ट्याचा व्यवहार झाला. तरीही त्यांनी त्या विषयाचा पाठपुरावा सोडला नाही. त्यांनी त्या वेळच्या परकीय सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमधील एक निर्माते एझरा मीर यांच्याशी संपर्क साधून व्यंगचित्रपटाची योजना मांडली. ती १९४४ मध्ये मंजूरही झाली. नंतर स्वतंत्र भारताच्या फिल्म्स डिव्हिजननेही व्यंगचित्रपटांचा (अ‍ॅनिमेशन फिल्म) विभाग चालू केला. जगातल्या इतर राष्ट्रांप्रमाणे आपल्या देशातही व्यंगचित्रपटाला (कार्टून फिल्म) खूप महत्त्व मिळाले आहे.

आपल्या दीर्घ कारकिर्दीत लचके यांनी असंख्य व्यंगचित्रे, मानधनाचा फारसा विचार न करता काढली. त्यांनी चरितार्थासाठी ब्लॉकमेकिंगचा व्यवसाय यशस्वीपणे केला. ते उत्तम छायाचित्रे काढीत. त्यांना बागकामाचा आणि तबलावादनाचा छंद होता. त्यांचा कामाचा झपाटा विलक्षण होता. त्यांचा ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ हा संग्रह १९४९ साली प्रकाशित झाला. तो त्यांनी शं.वा. किर्लोस्कर यांना अर्पण केला होता. या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. याशिवाय ‘गुदगुल्या’, ‘हसा आणि हसवा’, ‘हसा मुलांनो हसा’, इ. अन्य संग्रह आहेत. आपली चित्रे छापणार्‍या सर्व प्रकाशकांबद्दल त्यांना आदर होता.

लचके यांच्या चित्रांतील विनोद साधा असे. चित्रशैलीही साधी होती. मात्र चित्रातील विनोद निर्मळ, निर्विष असे. बीभत्स, अश्लील किंवा दुसर्‍यांना दुखावणारा नसे. तो संकेत त्यांनी कटाक्षाने पाळला. कौटुंबिक किंवा सामाजिक विषयांप्रमाणे त्यांनी गंभीर विषयही हाताळले. युद्धकाळात रेशनिंग, ब्लॅकआउट, विविध वस्तूंची टंचाई यांवरही त्यांनी व्यंगचित्रे काढली. त्यांतील एक चित्र अक्षरश: भेदक आणि विदारक होते. प्रेताच्या दहनाकरिता रॉकेल हवे; ते मिळवण्यासाठी प्रत्यक्ष प्रेत घेऊनच माणसांनी रॉकेल दुकानापुढे रांग लावली आहे असे ते चित्र होते.

लचके यांची बरीच चित्रे संवाद किंवा चुटक्यांवर आधारित होती. अगदी थोडे शब्द किंवा शब्दविरहित अशीही काही चित्रे होती. मात्र, त्यांच्या चित्रशैलीत फारसा फरक जाणवत नाही. रद्दीतून येणारी परदेशी मासिके त्या वेळी अनेक जण बघत होते. महाराष्ट्रात    त्या वेळी अनेक चित्रकारही होते. परंतु, व्यंगचित्रे काढावीत असे कोणालाही इतक्या तीव्रतेने वाटले नाही. महाराष्ट्रात त्या वेळी व्यंगचित्रांचे वातावरणच नव्हते. मात्र, तरीही लचके यांनी मराठी वाचकांची व्यंगचित्रविषयक मनोभूमिका तयार केली, हे त्यांचे वेगळेपण नोंद करण्याजोगे आहे.

लचके प्रपंचात समाधानी आणि तृप्त होते. शेवटी मात्र पत्नी, कन्या आणि डॉक्टर मुलगा या तिघांच्या पाठोपाठ झालेल्या निधनामुळे ते मनाने खूप खचले होते. त्या पाठोपाठच हरिश्चंद्र लचके यांचे निधन झाले.

- शकुन्तला फडणीस

लचके, हरिश्चंद्र भगवंत