Skip to main content
x

लवांडे, किसन एकनाथ

           कांदा हे पीक साठवणूक करण्याचे दृष्टीने आतापर्यंत ज्या संशोधकांनी कार्य केले; त्यामध्ये डॉ. किसन एकनाथ लवांडे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी बी.एस्सी. आणि एम.एस्सी. या पदव्या म.फु.कृ.वि., राहुरी येथून प्राप्त केलेल्या आहेत. त्यांनी भा.कृ.अ.सं., नवी दिल्ली व म.फु.कृ.वि. यांच्या संयुक्त शैक्षणिक कार्यक्रमांर्तगत पीएच.डी.ची पदवी संपादन केली. डॉ. लवांडे हे १९७३-८१ या काळात पुण्यातील कृषी महाविद्यालयात उद्यानविद्या साहाय्यक प्राध्यापक, १९८१-८५मध्ये गणेशखिंड फळ संशोधन केंद्र, पुणे येथे साहाय्यक प्राध्यापक, १९८५-९७ या काळात म.फु.कृ.वि. येथे उद्यानविद्या प्राध्यापक, वरिष्ठ भाजीपाला-पैदासकार इ. महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. पुढे ते १९९७ पासून कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगर पुणे येथे संचालक या पदावर कार्यरत झाले.

           लवांडे यांनी कांदा या पिकामध्ये विशेष संशोधन करून ‘भीमा सुपर’, ‘भीमा रेड’ व ‘भीमा राज’ हे वाण विकसित केले. या नवीन वाणांच्या वापरामुळे आज असंख्य शेतकर्‍यांचे आर्थिक सबलीकरण झाले आहे. त्यांनी कांदा साठवणगृहाचे नवीन तंत्रज्ञान मान्यताप्राप्त करून घेतले व यामुळेच आज राज्यभरात आठ लाख टन कांद्यांची साठवण करणे सहज शक्य झाले. त्यांनी म.फु.कृ.वि. येथे कार्यरत असताना काकडी (हिमांगी), कारली (हिरकणी व ग्रीन गोल्ड), मिरची (फुलेज्योती व अग्निरेखा), वांगी (संकरित कृष्णा), दुधीभोपळा (सम्राट) या पिकांचे नवीन वाण निर्माण केले.

           डॉ. लवांडे यांच्या संशोधन कार्यासाठी १९९६मध्ये म.फु.कृ.वि.ने . सुवर्णपदक आणि मानपत्र दिले आहे. त्यांना २०००मध्ये वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा कृषी पत्रकारिता पुरस्कार मिळाला होता. तसेच महाराष्ट्र सरकारने २००४मध्ये आदर्श कृषिरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवले होते. डॉ. लवांदे हे सध्या बा.सा.को.कृ.वि.चे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.

- मिलिंद कृष्णाजी देवल

लवांडे, किसन एकनाथ