Skip to main content
x

माडगुळकर, गजानन दिगंबर

    ‘ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे’ - अशी भूमिका असणारीच व्यक्ती ‘गीत रामायणा’सारखी रचना करू शकते आणि ‘महाराष्ट्राचा आधुनिक वाल्मिकी’ असा किताबही सामान्यजनांकडून मिळवू शकते. ‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी’ असणार्‍या गदिमांनी अर्थात गजानन दिगंबर माडगूळकर यांनी आपल्या प्रासादिक लेखणीने चित्रपट जगतालाही मोहवून टाकले.

            घरच्या जबाबदारीमुळे चित्रपटसृष्टीत पडलेले त्यांचे पाऊल खोलवर रुजले आणि त्याची मुळे अधिकच घट्ट झाली, हे त्यांची कारकिर्द पाहिली की चटकन लक्षात येते. १५७ मराठी चित्रपट आणि २३ हिंदी चित्रपट नावावर आढळणार्‍या गदिमांनी केवळ गीतलेखन केले नाही, तर कथा, पटकथा, संवादलेखन यांतले कौशल्यही रसिकांना दाखवून दिले. पण तरी ते नावारूपाला आले ते ‘गीतकार’ म्हणूनच.

            मा. विनायक यांच्या ‘बह्मचारी’ (१९३८) या चित्रपटात त्यांनी पोटापाण्याचा विचार करत पहिलीवहिली भूमिका केली. परंतु रक्तातच लिखाणाचा गुण असणार्‍या गदिमांनी वि.स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम केले, याच काळात त्यांना मोहिनी घातली ती दिग्दर्शन क्षेत्राने. म्हणूनच काही काळ त्यांनी के. नारायण काळे यांच्या हाताखाली दिग्दर्शनाचे धडेही घेतले. लेखक-दिग्दर्शक म्हणून जडणघडण होत असतानाही त्यांनी उत्स्फूर्तपणे केले ते गीतलेखन. ‘पहिला पाळणा’ आणि ‘भक्त दामाजी’ (१९४२) या चित्रपटांसाठी गीते लिहिण्याची संधी त्यांना मिळाली आणि गीतलेखनातले त्यांचे वर्चस्व सिद्ध होण्याच्या तयारीला लागले. १९४७ च्या राजकमल पिक्चर्सच्या ‘लोकशाहीर राम जोशी’ या चित्रपटाचे सर्वेसर्वा ठरले ते गदिमाच. कथा-संवाद-गीते लिहिण्याबरोबरीनेच त्यांनी या चित्रपटात छोटी भूमिकाही केली. या चित्रपटाने लोकप्रियता लाभलेल्या गदिमांनी पुढे एकाहून एक सरस चित्रपट तर दिलेच, पण त्याच जोडीने गीतेही दिली. म्हणून गीतप्रकारातला कोणताही प्रकार त्यांच्या लेखणीतून सुटला नाही. कथा-पटकथा-संवाद लिहिणार्‍या गदिमांनी भावनांचा यथोचित संगम साधत सुगम संगीत, भावगीते, भक्तिगीते, लावण्याही त्याच ताकदीने लिहिल्या. म्हणूनच त्यांची ‘एक धागा सुखाचा’ (जगाच्या पाठीवर), ‘त्या तिथे पलीकडे’ (लाखाची गोष्ट), ‘दैव जाणिले कुणी’ (मोलकरीण), ‘आज कुणीतरी यावे’ (मुंबईचा जावई), ‘विकत घेतला शाम’ (जगाच्या पाठीवर), ‘प्रथम तुज पाहता’ (मुंबईचा जावई) ही गाणी नुसतीच लोकप्रिय झाली नाहीत; तर त्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. त्यांच्या या रचनांचा आस्वाद घेणार्‍या रसिकांमध्ये आजची तरुण पिढीही आहे, याचा उच्चार आवर्जून केला पाहिजे. आजच्या तरुण पिढीशी संवाद साधणारी, रिमिक्स व फ्युजन यांच्या जगात वावरतानाही अर्थगर्भतेचे व भावपूर्णतेचे महत्त्व टिकवून ठेवणारी ही कालातीत गाणी जुन्या-नव्या पिढीतला एक अज्ञात पूल आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

             उत्तम प्रासादिकता, यथोचित रसपरिपोष, गेयता, भावपूर्ण शब्दरचना, साध्या-सोप्या शब्दरचनेतून जीवनाविषयी मांडलेले तत्त्वज्ञान यांची लय साधलेल्या गदिमांच्या गीतांना संगीत मिळाले तेही, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, सी. रामचंद्र, वसंत देसाई, वसंत पवार, स्नेहल भाटकर, पु.ल. देशपांडे, मा. कृष्णराव आदी दिग्गजांकडून आणि स्वर मिळाले ते लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा, फय्याज, सूमन कल्याणपूर, मा. कृष्णराव, सुधीर फडके या सर्वोत्कृष्ट गायकांचे. गीतलेखन, संगीत आणि गायन यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या या गीतांना अर्थातच मराठी चित्रपटसृष्टीत अमरत्व मिळाल्याचे     सर्वपरिचित आहे.

              गीतलेखनातून प्रेम, आराधना, भक्ती, प्रगल्भता, दु:ख, विरह, प्रणयी भावना व्यक्त करणार्‍या गदिमांनी लिहिलेली बालगीतेही तेवढीच गाजली. ‘एका तळ्यात होती’, ‘झुकझुक झुकझुक अगीनगाडी’, ‘नाच रे मोरा’, ‘गोरी गोरी पान’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ ही व यासारखी बालवयातला निरागस भाव व्यक्त करणारी गाणी आजही तितक्याच तन्मयतेने ऐकली जातात. किंबहुना मोठ्यांनाही आपले वय विसरायला लावून ही गाणी गुणगुणण्याची आणि त्याच्या तालावर डोलायला लावण्याची किमया या गाण्यातील बोलांमध्ये आहे. गीतकार, पटकथाकार, संवादलेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि एक संवेदनशील हरहुन्नरी व्यक्ती म्हणून गदिमांचे चित्रपटसृष्टीतील नाव निश्‍चितच महत्त्वपूर्ण आहे.

- डॉ. अर्चना कुडतरकर

माडगुळकर, गजानन दिगंबर