Skip to main content
x

मोंडल, समीर

       रल व संवेदनशील अशा जलरंग माध्यमाचा अभ्यास करून त्याच्या विविध शक्यता अत्यंत ताकदीने हाताळणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये समीर मोंडल यांचा समावेश होतो.

समीर मोंडल यांचा जन्म बंगालमधील बालटी नावाच्या लहान खेड्यात झाला. शहरी संस्कृतीपासून दूर, जंगल आणि नदीच्या सान्निध्यात त्यांचे बालपण गेले. त्यांना गाणी म्हणणे, नदीकिनारी फिरणे आणि स्वत:साठी स्वत:च खेळ तयार करणे असे साधे, पण सुंदर बालपण लाभले. या बालपणात वेगवेगळे प्रयोग करणे, गोष्टी नव्याने रचणे आणि त्यात स्वत:चा आनंद-शोध घेणे यांतून त्यांची सर्जनशीलता वाढीला लागली. सुरुवातीच्या काळात आई-वडिलांकडून कलेची ओळख झाली. आईच्या अंगाई गीतातून, वडिलांच्या सुवाच्य अक्षरांतून जगणे सुंदर कसे करावे याचा वस्तुपाठ मोंडल यांंना मिळाला. त्यांचे वडील शाळेमध्ये शिक्षक होते. घरी येणार्‍या ‘अमेरिकन रिपोर्टर’चे सुंदर छपाई असलेले कागद समीर मोंडल व त्यांचे मित्र, पतंग बनवण्यासाठी, रेखाटने करण्यासाठी वापरत. पानांचा रस, मेंदी, फाउण्टन पेनची निळी शाई, दिव्याची काजळी असे रंग ते स्वत: बनवत. ते बांबूपासून ब्रश बनवत आणि चिखलमातीची शिल्पे करीत!

मोंडल बारा वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब कलकत्तासारख्या (कोलकाता) मोठ्या शहरात स्थलांतरित झाले. इथे गावापेक्षा वेगळे वातावरण होते. शेजारपाजारची मुले चित्रकला, अभिनय, गायन-वादन, काव्यलेखन यांत जाणीवपूर्वक गुंतलेली असत. याच दरम्यान भारत-चीन युद्ध सुरू झाले. लोक वृत्तपत्रे वाचून, नभोवाणी ऐकून लहानांंना युद्धाच्या गोष्टी सांगत. वर्तमानपत्रांत जी काही थोडी छायाचित्रे येत, ती दृश्ये लहान मुलांच्या कल्पनाशक्तीद्वारे चित्र, शिल्पाकृतीत उतरत. शस्त्रे बनवणे, मातीचे सैनिक बनवणे, युद्धाची चित्रे काढणे हे या काळातले लहान मुलांचे खेळ होते. समीर मोंडल यांच्या दृश्यप्रतिमा निर्माण करण्याच्या या काळातल्या आठवणी या अशा घटनांशी निगडित आहेत.

शहरातल्या मिश्रवस्तीत त्यांना एक कलाशिक्षक भेटले. या कलाशिक्षकाच्या प्रयत्नांमुळे आणि आईने दिलेल्या पाठिंब्यामुळे समीर मोंडल यांनी कलकत्ता येथील गव्हर्न्मेन्ट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट येथे प्रवेश घेतला. या काळात कलाशिक्षणावरचा बंगाल स्कूलचा प्रभाव पुरता ओसरला नव्हता. पण नवीन कलाकार बंडखोर होऊन प्रयोगशीलतेने विचार करू लागले होते. या काळातही भेटकार्डांची डिझाइन्स, खेळणी, वॉल हँगिंग, पुस्तकांची रेखाटने, नाटकांचे नेपथ्य, अ‍ॅनिमेशन फिल्म, मूक अभिनय, नृत्य अशा कामांमधून त्यांनी पैसे मिळवले आणि कलेचा अनुभव घेतला. त्यांनी १९७५ मध्ये पदविका प्राप्त केली.

समीर मोंडल यांना बालपणापासूनच जलरंग हे माध्यम जवळचे वाटत आले होते. बंगाल स्कूलमध्येही जलरंग परंपरेचे धागे होते. त्यामुळे कलाशिक्षणाच्या काळात त्यांनी हे माध्यम अत्यंत आत्मीयतेने हाताळले. सुरुवातीच्या काळात त्यांनी इतरांप्रमाणे झाडे, फुले, निसर्गचित्रण या माध्यमांत काम केले; पण अत्यंत प्रवाही असे हे तरल माध्यम समकालीन कलेच्या मुख्य प्रवाहातील पेंटिंगकरिता भारतात वापरले जात नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी तैलरंगाचाही अभ्यास केला.

तैलरंगासारखे इतर माध्यमांतील रंग कॅनव्हासवर ठेवून पसरावे लागतात. जलरंगाचा मुख्य गुण म्हणजे ते जिवंत व प्रवाही माध्यम आहे. हा त्याचा सकारात्मक गुण आहे. परंतु जलरंगामध्ये वस्तूचे घनत्व, जडत्व दाखवणे हे इतर माध्यमांएवढे सहज शक्य नसते. त्यामुळे जपानी व चिनी चित्रकार हे माध्यम वापरतात तेव्हा त्यांच्या प्रतिमा वजनविरहित, सपाट, हलक्या, तरंगणाऱ्या अशा दिसतात.

मोंडल यांच्यासमोर उलगडत गेलेला हा अभ्यासच त्यांना आव्हान देत होता. चित्रविचार जलरंगातूनच अभिव्यक्त करता आला पाहिजे. त्यासाठी दृश्यप्रतिमेशी तडजोड करायची नाही असे ठरवून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी भारतीय समृद्ध जलरंग परंपरेचा अभ्यास केला. त्यात त्यांनी अजंठा चित्रकला, दरबारी लघुचित्रकला, पोथ्यांची हस्तलिखिते अभ्यासली, त्याचबरोबर आधुनिक कलेतील मातिस, सेझाँ यांच्या चित्रांचाही अभ्यास केला. या पाश्‍चात्त्य चित्रकारांकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी तैलरंगाचे तंत्र जलरंगात आणण्याचा प्रयत्न  केलेला दिसतो. जलरंग माध्यम मोठ्या अवकाशात वापरताना त्यांनी तजेलदार रंग, आकारांचे वजन इत्यादी विविध प्रयोग करून पाहिले.

एकदा त्यांनी एका मोराला कचराकुंडीत अन्न चिवडताना पाहिले. या दृश्याचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. प्राण्यांना जगण्यासाठी कशा प्रकारची तडजोड करावी लागते याचा मन विषण्ण करणारा हा अनुभव होता. त्यामधून त्यांनी ‘बर्ड ऑफ पॅराडाइज’ ही चित्रमालिका केली. त्यानंतरच्याही ‘वुमन इन नेचर’, ‘वॉर अ‍ॅण्ड बटरफ्लाइज’ अशा त्यांच्या चित्रमालिका, चित्रविचार आणि जलरंगमाध्यमातील हाताळणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या.

समीर मोंडल यांच्या चित्रकृती भारतात व परदेशात अनेक ठिकाणी प्रदर्शित झाल्या आहेत. अकॅडमी ऑफ फाइन आटर्स, वेस्ट बंगाल स्टेट अकॅडमी, ऑल इंडिया फाइन आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट्स सोसायटी, ए.पी. काउन्सिल ऑफ आर्टिस्ट्स, हैद्राबाद इत्यादी संस्थांनी त्यांंना पारितोषिके व सन्मान प्रदान केले आहेत.

प्रितीश नंदी यांच्यासारख्या कवी व माध्यमाभिमुख व्यक्तीबरोबर समीर मोंडल यांनी अनेक कलाउपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. ‘मुल्ला नसरुद्दीन’ ही मालिका त्यांनी ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’साठी चित्रस्वरूपात आणली. पूर्ण मालिका एक स्वतंत्र चित्र म्हणून पाहावी अशा योग्यतेची चित्रनिर्मिती त्यांनी याकरिता केली. ‘संडे ऑब्झर्व्हर’मध्ये काही काळ त्यांनी केलेली सिने अभिनेते व प्रसिद्ध व्यक्तींची संपूर्ण पान आकारमानाची व्यक्तिचित्रणे प्रसिद्ध होत असत. ही चित्रमालिकाही उत्कृष्ट व्यक्तिचित्रणाची दाद मिळवून गेली.

पाण्यात विरघळणाऱ्या जलरंगांमधून चित्रनिर्मिती करत चित्रात विरघळणारे समीर मोंडल हे समकालीन कलेतील जलरंग या माध्यमावर प्रभुत्व असणारे प्रयोगशील चित्रकार म्हणून महत्त्वाचे ठरतात.

- माणिक वालावलकर

मोंडल, समीर