नायक, कांचन प्रभाकर
भावनात्मक कथा हाताळणारा दिग्दर्शक अशी ओळख असणारे एक दिग्दर्शक म्हणजे कांचन नायक. त्यांचा जन्म पुणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रभाकर नायक हे दिग्दर्शक असले तरी त्या काळात मराठी चित्रपटसृष्टी हलाखीच्या अवस्थेत होती. या काळात चित्रपट कमी निघत असल्यामुळे प्रभाकर नायक यांच्याकडे काम नसे. त्याचा परिणाम अर्थातच घरच्या सांपत्तिक स्थितीवर झाला.
कांचन नायक यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. वाढत्या वयानुसार ती वाढतच गेली. त्या वयात वाचनातून मिळालेल्या ज्ञानामुळे ते तरुण वयातच समजूतदार व गंभीर प्रवृत्तीचे झाले. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींकडे ते अधिक डोळसपणे पाहू लागले व त्याचा फायदा त्यांना दिग्दर्शन करताना होऊ लागला.
कांचन नायक यांच्या वडिलांनी त्यांना या व्यवसायात येण्यास नकार दिला असला तरीही त्यांनी १९७२ साली आपले वडील प्रभाकर नायक यांच्या समवेत ‘थापाड्या’, ‘पटलं तर व्हय म्हणा’ या चित्रपटांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. पण यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न तुटपुंजे असल्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा विचार केला. त्या वेळेस त्यांनी लेथ मशीनवरही काम केले. पण यात मन न रमल्यामुळे त्यांनी कलाक्षेत्रातच काम करण्याचा निश्चिय केला. या निश्चियामागे अर्थातच आपण चांगले काम करू शकू हा आत्मविश्वास होता.
हा निर्णय घेतल्यावर त्यांनी वडिलांच्या तालमीत तयार होण्यापेक्षा इतर दिग्दर्शकांकडे काम करण्याचे ठरवले आणि ‘राजदत्त’ यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. राजदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अरे संसार संसार’, ‘भानू’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. याच दरम्यान त्यांची ‘सिंहासन’ चित्रपटाच्या निमित्ताने जब्बार पटेल यांच्याबरोबर ओळख झाली आणि राजदत्त यांच्या सल्ल्यानुसार ते जब्बार पटेल यांच्याकडे गेले. कांचन नायक यांनी ‘सिंहासन’पासून ‘उंबरठा’पर्यंत ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या इंग्लिश चित्रपटापर्यंत जब्बार पटेल यांचे सहकारी म्हणून काम केले. ‘राजदत्त’ व ‘जब्बार पटेल’ या प्रतिभावंत दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची मोलाची संधी कांचन नायक यांना लाभली व या संधीचे त्यांनी सोने केले.
दरम्यान १९८९ मध्ये स्मिता तळवळकर यांनी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आणि दिग्दर्शनाची सर्व सूत्रे कांचन नायक यांच्या हाती सोपवली. त्यातून ‘कळत नकळत’ हा चित्रपट आकाराला आला. कौटुंबिक जीवनातले भावनात्मक ताणतणाव व त्यांची हळुवार पद्धतीने केलेली उकल असा आशय असलेला हा चित्रपट त्यातल्या एकूणच बांधणीमुळे रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. या स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार राष्ट्रीय पारितोषिके व सर्वोत्कृष्ट चित्रपटासह नऊ राज्य पारितोषिके मिळाली. दरम्यान १९९९ साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ निर्मित व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित इंग्रजी चित्रपटासाठी सहदिग्दर्शक या नात्याने त्यांचा सहभाग होता. त्यानंतर २००७ साली सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वि.वा. शिरवाडकर लिखित ‘विश्वनाथ-एक शिंपी’ या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला. याचे श्रेय दिग्दर्शक या नात्याने कांचन नायक यांनाच जाते. याच वर्षी त्यांनी ‘घर दोघांचे’ या त्रिकोणी प्रेमकथा असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाचेही दिग्दर्शन केले.
कांचन नायक यांनी २००१ साली ‘राजू’ या सिनेमास्कोप संगीतमय चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने रौप्यमहोत्सवाबरोबर राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या तिसऱ्या पारितोषिकासह एकूण सात पारितोषिके पटकावली.
भावनाप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कांचन नायक यांनी भोजपुरी भाषेतला ‘पिंजडेवाली मुनिया’ व ‘डंक्यावर डंका’ असे विनोदी विषयही चित्रपटाचे दिग्दर्शन करताना लीलया हाताळले. शं.ना. नवरे यांच्या कथेवर केलेली टेलिफिल्म ‘त्या तिथे पलीकडे’ हा नर्मविनोदाचा एक उत्तम नमुना आहे. २००८ साली प्रसिद्ध दाक्षिणात्य निर्माते डी. रामनायडू यांच्या ‘माझी आई’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. २०१३ मध्ये त्यांनी ‘दणक्यावर दणका’ या विनोदी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले.
कांचन नायक यांनी मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावरही आपल्या दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. जयवंत दळवींच्या ‘पर्याय’ या हुंडाबळीवरील प्रसिद्ध नाटकावर आधारित ‘आव्हान’ या दूरदर्शन मालिकेचे पटकथा व संवादलेखन (१९८६) त्यांनीच केले. कांचन नायक यांनी झी मराठी वाहिनीसाठी ‘इंद्रधनुष्य’, तसेच ‘बंधन’ या दैनिक मालिकांचेही दिग्दर्शन केले. त्याचप्रमाणे दिल्ली दूरदर्शनसाठी ‘प्रारंभ’ या हिंदी मालिकेचेही दिग्दर्शन केले. ई-टीव्ही या वाहिनीसाठी त्यांनी २०११ मध्ये ‘क्राईम डायरी’ या मालिकेच्या १५०हून अधिक भागांचे दिग्दर्शन केले आहे. कांचन नायक यांनी दूरदर्शनसाठी काही मालिका, ‘यशवंतराव चव्हाण’ व ‘शोभना समर्थ’ यांच्या जीवनावर आधारित लघुपटांचे दिग्दर्शन केले. शासकीय पातळीवर त्यांनी अनेक माहितीपटांची निर्मिती व दिग्दर्शन केेले. बालमजुरी या विषयावरील त्यांनी केलेल्या ‘वसा शिक्षणाचा’ या माहितीपटाची सर्वांनीच वाखाणणी केली.
झी अॅवार्ड, म.टा. सन्मान, राष्ट्रीय चित्रपट पारितोषिके यांवर परीक्षक म्हणून कांचन नायक यांनी वेळोवेळी केलेली कामगिरीही महत्त्वपूर्ण आहे. भावनात्मकता व सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारा एक कलात्मक दिग्दर्शक म्हणून आपल्याला नायक यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.
- संपादित