निकम, गोविंद शावजी
शिक्षणाची आस आणि शिक्षणाबाबत प्रचंड आस्था असणाऱ्या शावजी निकम यांच्या पोटी फुरूस या कोकणातल्या छोट्याशा खेडेगावात गोविंदरावांचा जन्म झाला. वडीलांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने स्थापन झालेल्या फुरूसच्या पूर्व प्राथमिक शाळेत ते शिकले व पुढे शिक्षक झाले. रत्नागिरी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर तब्बल ३३ माध्यमिक शाळा, ३ उच्च माध्यमिक, तसेच १५ तंत्रशिक्षण व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची साखळी उभारणारे गोविंदराव निकम हे कोकणातले ‘शिक्षण महर्षी’ म्हणून ओळखले जातात.
शिक्षकाची नोकरी सोडून पूर्ण वेळ शिक्षणसंस्था उभारणीत व्यतीत करायचे ठरवून गोविंदरावांनी ‘सह्याद्री शिक्षण संस्था’ स्थापन केली. १ जून १९५७ रोजी सह्याद्रीचे पहिले माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे सुरू झाले. त्यानंतर झपाट्याने त्यानी ‘सह्याद्रीची’ माध्यमिक विद्यालये कोकणात जागोजागी सुरू करून ग्रामीण भागात शिक्षणाची सोय केली.
त्याचबरोबर नोकरी धंद्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाची सोय करून त्यांनी तरुणांना रोजगार मिळवण्याचा मार्ग दाखवला. ‘सह्याद्री तंत्रनिकेतन’, ‘कॉलेज ऑफ फार्मसी’, ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट’, ‘बी.एड, तसेच डी. एड कॉलेज’, ‘कृषी तंत्र विद्यालय‘, ‘हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम कॉलेज’ अशा विविध महाविद्यालयातून आज हजारो तरुण प्रशिक्षण घेऊन नोकरीधंद्याकडे वळत आहेत. विद्यार्थ्यांसाठी अकरा वसतिगृहेही त्यांनी स्थापन केली. रत्नागिरी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेकडो तरुण-तरुणी आज सह्याद्री शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा बजावीत आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिक्षण व वित्त समितीचे सभापती म्हणून १९७२ ते १९७८ या काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना जिल्ह्यातील हजारो एस्.एस्.सी. पास तरुणांना पत्रद्वारा डी.एड्.चे शिक्षण देऊन शिक्षण सेवेत सेवारत केले.
असामान्य व्यक्तिमत्त्व लाभलेल्या गोविंदरावांनी राजकीय क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे. नवव्या लोकसभेचे संसद सदस्य म्हणून २ वर्षे व दहाव्या लोकसभेचे संसद सदस्य म्हणून ५ वर्षे त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व पुढे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचेही ते अध्यक्ष झाले. ‘सह्याद्री शिक्षण संस्थे’च्या सुवर्ण महोत्सवी समारंभाच्या दिवशी अनेक मंत्री व पाहुणे सावर्डे येथे आलेले असताना अकल्पितपणे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. सावर्डे येथे कापशी नदीकाठी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.