Skip to main content
x

नवले, प्रकाश धुळाप्पा

     प्रकाश धुळाप्पा नवले यांच्याकडे २० सप्टेंबर १९८० रोजी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती म्हणजे एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला ओरिसातील पूरसदृश परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी घेऊन जाणे व त्यांना परत आणणे. जेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर ओरिसातल्या गुनपूर  येथे उतरले,  तेव्हा सदर नेत्याने तेथील आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधला व तेथील परिस्थितीबाबत  ते माहिती घेऊ लागले. त्याच वेळी, अचानकच तेथील एका जमावाने या नेत्याच्या विरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली. हे आंदोलन हळूहळू वाढत गेले व त्या नेत्याभोवती गर्दी वाढायला लागली.

     या वेळी काही दगाफटका होण्याची शक्यता होती. यावेळी संभाव्य धोका लक्षात घेऊन व त्वरित हालचाल करून नवले यांनी या जमावाच्या दिशेने कूच केले. एका बाजूला भडकलेला जमाव व दुसर्‍या बाजूला तो नेता आणि हेलिकॉप्टर यांच्यामध्ये एखाद्या भिंतीसारखे ते उभे राहिले. जमाव त्यांच्यावरती हल्ला करण्याची दाट शक्यता होती; पण या वेळी त्यांनी स्वत:च्या जिवाची अजिबात पर्वा केली नाही. जमावाने अचानक त्या नेत्याला आणि नवलेंना धक्काबुक्की सुरू केली. हेलिकॉप्टरचेही नुकसान करण्यात आले. अखेर नवले त्या नेत्याला हेलिकॉप्टरकडे घेऊन गेले. जेव्हा जमावातील क्रोध निवळला, तेव्हा नवले यांनी या परिस्थितीचा फायदा घेत त्या नेत्याला हेलिकॉप्टरमध्ये घेत उड्डाण केले व त्यांना सुखरूपपणे गोपाळपूर या ठिकाणी उतरवले.

     अशावेळेस प्रकाश नवले यांनी तणावपूर्ण वातावरणात त्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला सुखरूप तर आणलेच; परंतु परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली असताना ती परिस्थितीदेखील  नियंत्रणात आणली.

      फ्लाइट लेफ्टनंट प्रकाश नवले यांनी जे प्रसंगावधान दाखवले आणि परिस्थितीला शौर्याने जे तोंड दिले, त्यासाठी त्यांना ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले.

- पल्लवी गाडगीळ

नवले, प्रकाश धुळाप्पा