पाणसरे, नारायण गणेश
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील वास्तुकलेशी संबंधित ‘उत्थित वास्तुशिल्प’ या विषयात विशेष प्रावीण्य मिळवणारे व आधुनिक दृष्टिकोन ठेवत अत्यंत दर्जेदार निर्मिती करणारे शिल्पकार म्हणून पाणसरे यांचे नाव घ्यावे लागेल. ‘फिल्मफेअर’ सारख्या प्रतिष्ठेच्या पारितोषिकांसाठी त्यांनी त्यामागची भावना व्यक्त करणारी ट्रॉफींची शिल्पे बनवून या क्षेत्रातही एक मापदंड निर्माण केला.
नारायण गणेश पाणसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथे झाला. आईचे नाव सरस्वती होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण यथावकाश पार पडल्यानंतर त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकला विभागात प्रवेश घेतला. त्या काळी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी क्वचितच ललितकलाशिक्षणाकडे वळत. पाणसरे यांना शिल्पकलेची ओढ होती आणि शालेय जीवनात त्यांनी आपल्या प्रतिभेने त्या कलेमध्ये नैपुण्य मिळवले होते.
त्यांच्या वास्तववादी शैलीतील शिल्पकामाचा दर्जा पाहून त्यांना शिल्पकला पदविका अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात थेट प्रवेश दिला होता. हा निर्णय यथायोग्य होता हे त्यांनी पुढील तीन वर्षांत दाखवूनही दिले. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या वार्षिक परीक्षेत ते सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विद्यार्थिदशेत त्यांनी शासकीय शिष्यवृत्ती, ‘गणपत केदारी’ शिष्यवृत्ती, तसेच ‘लॉर्ड मेयो’ पदक, ‘गव्हर्नर्स स्पेशल प्राइझ’ आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक असे सन्मान मिळविले.
शिल्पकलेतील पदविका दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी शिल्पांची कामे केली. यातील मुंबईच्या फ्लोरा फाउण्टनजवळच्या बॉम्बे म्युच्युअल बिल्डिंग (सध्याची न्यू इंडिया अॅश्युअरन्स बिल्डिंग) वरील प्रवेशद्वाराच्या दोन बाजूंस असणारी शेतकरी स्त्री-पुरुषांची दगडात कोरलेली उत्थित शिल्पे कमालीची गाजली. या शिल्पात त्यांनी दाखविलेला आधुनिक दृष्टिकोन व तपशील टाळून व्यक्त केलेल्या अत्यंत साध्या व सौष्ठवपूर्ण मानवाकृती हे या कामाचे वैशिष्ट्य ठरले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लॉकवूड किप्लिंग यांनी क्रॉफर्ड मार्केटसाठी केलेली वास्तुसजावटीची शिल्पे, तसेच विसाव्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटनमधील जेकब एप्स्टीन व अमेरिकेतील काही वास्तुशिल्पकारांची आधुनिक परंपरा भारतीय वैशिष्ट्ये जपत पाणसरे यांनी मुंबईत साकारली. आर्थिक जमवाजमव करून रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी १९३८ मध्ये त्यांनी लंडन गाठले. प्रयाण करण्यापूर्वी त्यांना ‘राव ऑफ कच्छ’ शिष्यवृत्ती आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचे रोख पारितोषिक मिळाले होते.
लंडन येथील वास्तव्यात आपल्या कलासक्त स्वभावानुसार त्यांनी प्रचंड ऊर्जेने कलासाधना केली. त्यांनी काष्ठ कोरीव कला, पाषाण कोरीव कला, धातूचे ओतकाम, मृत्तिकापात्र कला, वास्तुशिल्प कला, स्मारक-शिल्प कला अशा अनेक शिल्पकला विषयांचे अध्ययन केले. त्याशिवाय प्राणी आणि मानवी शरीराचा रेखाचित्रांद्वारे अभ्यास केला. या प्रखर साधनेमुळे त्यांना रॉयल कॉलेज ऑफ आर्टची ‘असोशिएटशिप’ मिळाली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने पाणसरे मायदेशी परतले. १९४६ मध्ये ते चित्रा (लीला म्हात्रे) यांच्याशी विवाहबद्ध झाले.
त्या काळात मुंबईचे कलाविश्व झपाट्याने बदलत होते. पाणसरे यांनी वास्तववादी व बारीकसारीक तपशील दाखवणारा दृष्टिकोन बाजूला सारून सहजसुंदर व नितांत साधेपणा जपत भौमितिक आकार वापरत आधुनिक पद्धतीची शिल्पे घडविण्यास सुरुवात केली. त्यातून मुंबईच्या व पर्यायाने भारताच्या शिल्पकला क्षेत्राला नवीन दिशा प्राप्त होण्यास मदत झाली. पाश्चात्त्य शिल्पकलेतील आकारांच्या सघनतेचा भारतीय शिल्पपरंपरेतील लयपूर्णतेशी संगम झाल्याचे त्यांच्या शिल्पात आढळते. शिल्पमाध्यमाचे वैशिष्ट्य राखत ते शिल्प घडवीत. आपल्या लाकडी शिल्पात लाकडाच्या नैसर्गिक आकारांचा व त्यावरील रेषांचा ते आविष्काराला पोषक उपयोग करून घेत. त्यांच्या काष्ठशिल्पाला १९५७ साली पहिल्या मुंबई राज्य कला प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाले.
पाणसऱ्यांच्या शिल्पकलेतील नैपुण्यामुळे त्यांना अनेक कामे मिळाली. या कामांमध्ये व्यक्तिशिल्पे, उत्थित वास्तुशिल्पे, ट्रॉफीज, स्मारकशिल्पे, आधुनिक पद्धतीची काष्ठ व धातुशिल्पे अशी विविधता होती. ते चतुरस्र कलाकार होते. त्यामुळे ते कामाच्या उद्दिष्टाप्रमाणे शिल्पांचे स्वरूप योजित. व्यक्तिशिल्पे वास्तवदर्शी, तर वास्तुशिल्पे अलंकारिक व घनतापूर्ण; पण सोप्या पद्धतीने साकारलेली असत. ते विविध संस्थांसाठी विषयाला अनुसरून, अनावश्यक बारकावे टाळून कलात्मक रितीने ट्रॉफीज तयार करीत.
त्यांच्या विविध कामात मुंबई, केनिया व नैरोबी येथील एल.आय.सी.च्या इमारतींवरील उत्थित शिल्पे, नवी दिल्लीतील अशोका हॉटेलवरील भव्य उत्थित शिल्प, कर्नाटकमधील धारवाड कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर व टोपीवाला मेडिकल कॉलेजच्या भित्तिशिल्पांचा समावेश आहे. त्यांनी अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या पारितोषिकांसाठी ट्रॉफी बनविल्या. त्यांतील ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ ट्रॉफी, ‘महाराष्ट्र फिल्म अवॉर्ड’ ट्रॉफी, ‘एंजल फेस’ ट्रॉफी, ‘म्यूझिक कंपोझर क्लब अवॉर्ड’ ट्रॉफी या अत्यंत लोकप्रिय झाल्या. वास्तववादी शिल्पात लिपझिग (जर्मनी) मधील औद्योगिक प्रदर्शनातील भव्य पुतळा, शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अशा त्यांच्या शिल्पांचा उल्लेख उचित ठरेल.
पाणसऱ्यांची कलासाधना शिल्पकलेपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी प्रसिद्ध चित्रकार सा.ल.हळदणकर यांच्याकडेही चित्रकलेचे धडे घेतले. तत्कालीन ‘चित्रा’ या साप्ताहिकात त्यांची व्यंगचित्रे नियमितपणे प्रसिद्ध होत. रेखाचित्रातील नैपुण्यामुळे ते शिल्प घडविण्यापूर्वी अनेक रेखांकने करून मनामध्ये शिल्प- प्रतिमा योजित आणि नंतरच प्रत्यक्ष शिल्प घडवीत. याचे प्रत्यंतर त्यांच्या उत्थित भित्तिशिल्पांतील रेषात्मक आविष्कारातून सिद्ध होते.
पाणसरे यांची कारकीर्द शैक्षणिक क्षेत्राशीही निगडित होती. मुंबई राज्यासाठी कार्य करणाऱ्या श्रीमती हंसाबेन मेहता यांनी ललितकलेचा पदवी अभ्यासक्रम बनविण्यासाठी जी समिती नेमली, त्यावर पाणसऱ्यांचीही नियुक्ती केली होती. या समितीने तयार केलेला पदवी अभ्यासक्रम नंतर १९४९ मध्ये बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात सुरू झाला आणि त्या विद्यापीठाला भारतात प्रथमच असा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा बहुमान मिळाला. पाणसरे नंतर त्याच विद्यापीठातील ललित कला अभ्यासक्रम समितीवर काम करीत होते. इंडियन स्कल्प्टर्स असोसिएशनशी ते संबंधित होते.
पाणसरे स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ होते. उंच शरीरयष्टी, भव्य कपाळ, विशाल डोळे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. तपकिरी रंगाचा सूट आणि त्यावर बो अशा वेशात ते असत. डोळे किलकिले करून, मान वाकडी करून कलाकृतीचा आस्वाद घेण्याची त्यांची एक विशिष्ट लकब होती. एखादी कलाकृती आवडली की ते जवळच्या माणसाकडे आवर्जून उल्लेख करीत; आवडली नाही तर नापसंती व्यक्त करण्यासाठी दोन्ही खांदे उडवून शहारल्यासारखे करीत. त्यांना आपल्या कलाकौशल्याचा वृथा अभिमान नव्हता. आपल्या कलाकृतीबद्दल इतरांचीही मते विचारायला ते तयार असत. सर्व कलाकारांसोबत ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असत.
सुप्रसिद्ध आधुनिक शिल्पकार अदि दाविएरवाला व श्रीमती पिलू पोेचखानवाला हे पाणसऱ्यांचे विद्यार्थी होते. दोघांचाही पूर्वायुष्यात शिल्पकलेशी संबंध नव्हता; परंतु पाणसरे यांचे मार्गदर्शन व आधुनिक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला व पुढील काळात भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घातली. वांद्य्राला कलावंतांसाठी ‘कलानगर’ ही वसाहत निर्माण झाली, त्याचे बरेच श्रेय पाणसरे यांच्याकडे जाते.
कलेवरील त्यांचे प्रेम आणि भक्ती असीम होती. मात्र त्यांनी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला नाही. यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा वारंवार होई. मुंबईत १९६६ मध्ये दादरच्या शिवाजी पार्कमधील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करायचे काम पाणसरे यांना मिळाले. पुतळा वीस फूटांचा करायचा असे ठरले. ठरलेल्या मुदतीत नेहमीच्या पद्धतीने तो शाडूच्या मातीत करून ब्रॉन्झमधील पुतळ्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया करणे कठीण होते. म्हणून पाणसऱ्यांनी पुतळा थेट प्लॅस्टरमध्ये करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी मुंबईच्या लालबाग भागात मोठे गणपती करतात त्या पद्धतीने व दीनानाथ वेलिंग या मूर्तिकाराच्या मदतीने प्लास्टरमधील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार झाला. यातील घोडा थेट पुढचे दोन पाय उंचावून पुढे झेप घेणारा होता, तर शिवाजी महाराजांच्या हातात पूर्वसुरींप्रमाणे तलवार न देता त्यांचा उजवा हात मार्गदर्शक व दिशा देणाऱ्या मुद्रेत होता.
समितीस मॉडेल पसंत पडल्यावर पुढची प्रक्रिया सुरू झाली. पण अचानक कोणातरी राजकारणी नेत्याच्या डोक्यातून कल्पना निघाली की शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण परिसरात हा पुतळा लहान दिसेल. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्लास्टरमधील मॉडेलची उंची वाढवून पुतळा मोठा करा असे सांगितले. तांत्रिकदृष्ट्या व कलात्मक दृष्टिकोनातूनही हे अशक्यच होते. पण कोणीही शिल्पकाराचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या. पाणसरे यांची कुचंबणा होऊ लागली.
व्ही.शांताराम व जनरल थोरातांसारख्या प्रतिष्ठित मंडळींच्या मध्यस्थीचाही उपयोग झाला नाही. एवढ्यात पुतळ्याच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाली. पुतळा तयार नसल्यामुळे वृत्तपत्रांतून जाहीर टीका होऊ लागली. पाणसरे अक्षरश: भांबावून गेले. मन घट्ट करून त्यांनी पुतळ्याचा आकार वाढविण्याचा निर्णय घेतला. या उद्योगात मूळ शिल्पाची प्रमाणबद्धता व सौंदर्यही नष्ट झाले. आर्थिक गणित कोसळले. त्यांना आयुष्यभराची कमाई त्यात ओतावी लागली व बँकेचे कर्जही काढावे लागले.
पुतळा कसाबसा तयार झाला व ६ नोव्हेंबर १९६६ रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पण या सर्वांचा परिणाम होऊन पाणसऱ्यांची तब्येत ढासळली. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या घराण्याला ‘पाणसरे’ हा किताब मिळाला होता व महाराजांचाच पुतळा तयार करण्याच्या कामात या शिल्पकाराच्या वाट्याला मनस्ताप व अवहेलना आली. त्यांचे १९६८ मध्ये हृदयविकाराने निधन झाले.
२. श्री. आजगावकर यांची मुलाखत.
३. परब, वसंत; पाणसरे यांच्यावरील लेख; ‘सत्यकथा’; ऑगस्ट १९६८.
४. बहुळकर, सुहास; ‘कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या’; ‘दीपावली’; २०१०.