Skip to main content
x

पाठक, सूर्यकांत श्रीराम

सूर्यकांत श्रीराम पाठक यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव शालिनी होते. त्यांचे वडील महानगरपालिकेत मुकादम होते. सूर्यकांत यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढील शालेय शिक्षण रमणबाग शाळेत झाले व महाविद्यालयीन शिक्षण बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे झाले. विद्यार्थीदशेत असतानाच ते विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. त्यांनी 1974 मध्ये शिकत असतानाच ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ येथे नोकरी करण्यास सुरुवात केली. सूर्यकांत पाठक लहान असल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.  त्यांनी आणीबाणीविरोधी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. पुढे त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमधील  नोकरी सोडली व ग्राहक पेठेच्या उभारणीत प्रमुख सहभाग घेण्याचे ठरविले. तेथे त्यांनी स्थापनेपासूनच कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी सांभाळली. ग्राहक पंचायतीच्या कार्यविस्तारात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी 1974 ते 1998 काळात महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री या नात्याने जबाबदारी सांभाळली तर 1998 पासून महाराष्ट्र व विदर्भ प्रांताचे समन्वयक म्हणून काम करत आहेत.

ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून पाठक यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलने उभी केली. पुण्यात 1995 मध्ये रिक्षाचालकांनी बेमुदत संप केला तेव्हा सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून ‘लिफ्ट पंचायतीचे’ आवाहन केले. या आवाहनास पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न असो, व्यापार्‍यांच्या जकातीचा प्रश्न असो किंवा सर्वसामान्य ग्राहकांच्यावर आयोडिनयुक्त मीठाच्या व हेल्मेट सक्तीचा मुद्दा असो प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करून केंद्र व राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून शासनदरबारी ते अनेक प्रश्न धसास लावतात. राजकीय पक्षाशी बांधिलकी नसलेली संघटना कशी बांधावी याचा वस्तूपाठ सूर्यकांत पाठक यांनी घालून दिलेला आहे. ग्राहकपेठेच्या माध्यमातून गेली 25 वर्षे ग्राहकांना रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. तांदूळ महोत्सव, गहू महोत्सव, रविवारची खास सवलत या संकल्पना त्यांनी नव्याने राबवल्या. सहकारी तत्त्वावर 1977 मध्ये सुरू झालेले ग्राहक भांडार उत्पादक आणि ग्राहकांशी थेट संवाद साधून ग्राहकांना रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देते. त्याचबरोबर बिल्डर, वीज, दूरध्वनी, गॅस, दिशाभूल करणार्‍या जाहिराती अशा प्रकारच्या ग्राहकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठीचे हे एक ग्राहक चळवळीचे केंद्र आहे. ग्राहक पेठेच्या व्यवहाराबद्दल राष्ट्रीय पातळीवरील जमनालाल बजाज उचित व्यवहार पुरस्कार मिळवणारे पहिले ग्राहक भांडार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट काढण्यात सूर्यकांत पाठक यांचा क्रियाशील सहभाग होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 125 वी जयंती, 1857 च्या स्वातंत्र्य समराचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि 1957 चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा शतकोत्सव असा त्रिवेणी योग जुळून आला. प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभावना जागृत करणारा हा ग्रंथ, संस्कारासाठी जशी घरोघरी भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी असावी वाटते तशीच स्वातंत्र्यप्रेम जागवणारा हा महान ग्रंथ घरोघरी असायलाच हवा या उद्देशाने किमान 1 लाख घरांपर्यंत हा ग्रंथ पोहचविण्याचा संकल्प त्यांनी केला होता.

‘ग्राहकहित’ या ग्राहकप्रबोधनाच्या मुख्य उद्देशाने चालू केलेल्या मासिकाचे संपादक म्हणून गेली 20 वर्षे जबाबदारी सूर्यकांत पाठक यांच्याकडे आहे. ‘ग्राहकहित’ दिवाळी अंकाला आत्तापर्यंत सोमाणी प्रतिष्ठान, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, सांगली नगर वाचन मंदिर, पत्रकार संघ अशा नामांकित संस्थांचे सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत.

ग्राहक चळवळीप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही पाठक यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. पुण्यातील प्रख्यात डेक्कन शिक्षण संस्थेच्या संचालकपदी 25 वर्षांहून अधिक काळ ते काम पाहत होते. संस्थेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग; नवीन मराठी शाळा; अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल इ. डेक्कन शिक्षण संस्थेत प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिकविण्याची अभिनव योजना त्यांनी चालू केली. ते ग्राहक विभाग, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत. तसेच राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद, नवी दिल्ली व राज्य ग्राहक संरक्षण परिषद, मुंबईचे ते सदस्यही आहेत. जनता सहकारी बँकेत ते सल्लागार म्हणून काम पाहतात. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक सेवा विभाग, एल. आय. सी. पॉलिसी धारक कौन्सिल, ग्राहक न्यायमंच विज विभाग या ठिकाणी ते सदस्य आहे.

सूर्यकांत पाठक यांना आजपर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. 1994 मध्ये केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण क्षेत्रातील कार्यातील त्यांना सर्वोत्कृष्ट युवा कार्यकर्त्यांसाठीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. 1996 व 2003 मध्ये जमनालाल बजाज उचित व्यापार या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. मा. शरद पवार यांच्या हस्ते 2000 मध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गौरवशाली कार्याबद्दल कॉसमॉस बँकेतर्फे दिला जाणारा ‘कॉसमॉस पुरस्कार’ प्राप्त झाला. मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 2006 मध्ये ग्राहक चळवळीच्या योगदानाबद्दल ‘राजा मंत्री पुरस्कार’ मिळाला.

- संपादित

पाठक, सूर्यकांत श्रीराम