Skip to main content
x

पीठावाला, मंचरशा फकीरजी

चित्रकार

लंडनमध्ये प्रदर्शन भरवणारे पहिले चित्रकार व पाश्‍चिमात्य पद्धतीने भारतीयांची व्यक्तिचित्रे रंगवून प्रसिद्धीस आलेले ‘स्वदेशी प्रॉडक्ट’ म्हणून पीठावाला प्रसिद्ध होते.

मंचरशा फकीरजी पीठावाला यांचा जन्म सुरतजवळ असलेल्या पीठा या खेड्यात, अन्य पारशी घराण्यांच्या तुलनेने साधारण आर्थिक  परिस्थिती असलेल्या कुटुंबात झाला. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती. वयाच्या सोळाव्या वर्षी ते मुंबईला आले. त्यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये, १८८८ मध्ये प्रवेश घेतला.

तत्कालीन प्राचार्य ग्रिफिथ्स यांचे अल्पावधीतच ते आवडते विद्यार्थीझाले. धुरंधर हे  पीठावाला यांचे सहाध्यायी होते. परंतु पीठावाला इतर कुणामध्येही न मिसळता आपल्या कामात मग्न असत. त्यांचे शिक्षक चिजनीलाल यांची या अबोल व कष्टाळू विद्यार्थ्यावर मर्जी होती व ते त्यांना सतत स्केचिंगला घेऊन जात असत. पीठावाला यांनी १८९४ मध्ये शिक्षण संपवून स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. याच वर्षी भरलेल्या बॉम्बे फाइन आर्ट एक्झिबिशनमध्ये त्यांना रौप्यपदक व ७० रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.

त्यांच्या ‘पारसी गर्ल’ या चित्राला १९०२ मध्ये सिमला फाइन आर्ट एक्झिबिशनमध्ये पारितोषिक मिळाले. त्यांच्यापूर्वी या साहेब लोकांच्या (ब्रिटिशांच्या) मानल्या गेलेल्या प्रदर्शनांत केवळ राजा रविवर्मा व जे.पी. गांगुली या दोघा भारतीयांना पारितोषिके मिळाली होती. त्यामुळे पीठावाला यांचे हे चित्र गाजले. त्यानंतर १९०७, १९०८ व १९०९ अशी लागोपाठ तीन वर्षे बॉम्बे आर्ट सोसायटीचे

सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम करणारे ते एकमेव चित्रकार होते. पीठावालांना १८९४ ते १९११ या काळात एकूण २४ सुवर्ण व रौप्यपदके आणि ४५ रोख रकमेची पारितोषिके मिळाली व ते एक यशस्वी चित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले.

तत्पूर्वी १९०५ मध्ये क्वीन मेरी यांच्या भारत दौर्‍याच्या वेळी त्यांना ‘भारतीय नारीचे रूप’ दाखविणारा अल्बम भारतातील स्त्रियांच्या वतीने भेट देण्याचे ठरले. त्यासाठी पीठावाला यांची निवड करण्यात आली. त्या काळी हा एक मोठाच बहुमान होता. त्यांनी १९११ मध्ये इटली, पॅरिस व लंडन येथील कलासंग्रहांचा अभ्यास केला. त्यांच्या या यशावर कळस चढला तो त्यांच्या ११ ऑक्टोबर १९११ मध्ये लंडनमधील डोरे गॅलरीत झालेल्या एकल प्रदर्शनाने. त्यांनी लंडनमधील अल्प मुक्कामात रंगविलेली २५ चित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित केली होती. हे भारतीय चित्रकाराने लंडनमध्ये भरविलेले पहिलेच प्रदर्शन होते.

या प्रदर्शनाबद्दल ‘द इव्हिनिंग स्टॅण्डर्ड’ या वृत्तपत्राने कौतुक करताना, पीठावाला यांच्या चित्रांत निश्‍चितच काही कलागुण असल्याचे सांगत त्यांच्या निरीक्षणात सहजता आणि चित्रनिर्मितीत नैसर्गिक सौंदर्य असल्याचे मत व्यक्त केले. कलाअभ्यासक व समीक्षक सर जॉर्ज बर्डवुड यांनी पीठावाला यांच्या व्यक्तिचित्रणकलेचे कौतुक करून काही बाबतींत हा चित्रकार इंग्रज चित्रकारांपेक्षा सरस असल्याचे आपल्या लेखात नमूद केले. ब्रिटिश वॉटर कलरिस्ट सोसायटीच्या अध्यक्षांनी पीठावाला ज्या जलद गतीने समोर बसलेल्या व्यक्तीचे साधर्म्य व व्यक्तिमत्त्व व्यक्त करीत त्याचे कौतुक करून ते इंग्रज चित्रकारांचे प्रतिस्पर्धीहोऊ शकतील असे मत व्यक्त केले. याच दरम्यान त्यांची चित्रे न्यू बर्लिंग्टन गॅलरी, लंडन व रॉयल सोसायटी ऑफ पोर्ट्रेट पेंटिंग, लंडन येथे प्रदर्शित झाली. ते १९१२ मध्ये भारतात परतले व एल्फिन्स्टन शाळेच्या सभागृहात त्यांचे चित्रप्रदर्शन भरले. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन  हर एक्सलन्सी लेडी क्लार्क यांनी केले होते.

पीठावालांनी त्यांच्या शिक्षणाच्या काळात त्या वेळी मुंबईतील व इंग्रजी राजवटीतील विद्यार्थ्यांना व कलारसिकांना आदर्श वाटणार्‍या व्यक्तिचित्रणकलेत चांगलेच प्रावीण्य मिळविले होते. जलरंग व तैलरंग माध्यमांत अचूक आरेखन, छायाप्रकाशाचा सुयोग्य वापर करीत ते समोरच्या व्यक्तीचे साधर्म्य आणण्यात निष्णात झाले होते. याशिवाय त्यांनी परदेशी चित्रकारांच्या चित्रांवरून प्रतिकृती करून आपला व्यासंग वाढविला व व्यक्तिचित्रणकलेत प्रभुत्व मिळविले. त्यामुळेच तत्कालीन कलारसिकच नव्हे, तर आश्रयदाते व कलासमीक्षकांनाही त्यांची व्यक्तिचित्रे दर्जेदार वाटू लागली. पेस्तनजी बोमनजी यांच्यानंतरचे ते दुसरे यशस्वी व्यक्तिचित्रणकार ठरले.

त्यांच्या व्यक्तिचित्रातील कलागुण युरोपीय व ब्रिटिश अकॅडमिक कसोट्यांवर उतरल्यामुळे तत्कालीन प्रतिष्ठित पारशी समाजातून व संस्थांकडून त्यांना व्यावसायिक व्यक्तिचित्रणाची अनेक कामे मिळू लागली होती. त्यातूनच ‘जामे जमशेद’ वृत्तपत्राने या यशस्वी व विलायतवारी करून आलेल्या या चित्रकाराचा ‘स्वदेशी प्रॉडक्ट’ म्हणून गौरव केला. पीठावाला यांनी चर्चगेट स्ट्रीटवर आपला स्टूडिओ सुरू केला व आघाडीचे औद्योगिक शहर म्हणून विकसित होणार्‍या मुंबईत त्यांचा अल्पावधीतच व्यावसायिकदृष्ट्या जम बसला. साहजिकच त्यांना इतर चित्रकारांप्रमाणे संस्थानांमधून आश्रयासाठी फिरावे लागले नाही.

पीठावालांच्या व्यक्तिचित्रात साधर्म्यासोबतच त्या व्यक्तीची वैशिष्ट्ये ते आदर्शरूपात व्यक्त करीत. पारशी धर्मअभ्यासक के.आर. कामा यांच्या व्यक्तिचित्रात अभ्यासकाच्या व्यक्तिमत्त्वासोबतच अलौकिकाच्या शोधात असणार्‍या गूढ व पवित्र वातावरणाचा अनुभव येतो. दादाभाई नौरोजींच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वातूनही त्यांची स्वदेशवासीयांप्रती असलेली आत्मीयता व कनवाळूपणा प्रतीत होतो. फिरोजशहा मेहता यांच्या व्यक्तिचित्रातून करारी व्यक्तिमत्त्वासोबतच, शिस्तप्रिय प्रशासकाचे दर्शन घडते, तर त्यांच्या पारशी स्त्रियांच्या व्यक्तिचित्रांमधून तत्कालीन पारशी समाजाच्या आवडीनिवडींसोबतच त्यांत स्त्री-सौंदर्य व शालीनतेचा अनुभव येतो. त्यांची अशी चित्रे अनेक शासकीय, खाजगी संस्था आणि श्रीमंत उद्योगपती, व्यापारी व व्यावसायिकांच्या संग्रहात आहेत.

व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरलेल्या पीठावाला यांनी युरोपातील व खास करून ब्रिटिश अकॅडमिक आदर्शांचाच त्यांच्या चित्रांतून पाठपुरावा केला. ज्या समाजाची चित्रे त्यांनी रंगविली तो श्रीमंत वर्ग व त्यातील विविध व्यवसाय करणार्‍या यशस्वी व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व व त्यांचे वैभव दर्शविणारी ही चित्रे होती. यांत जमीनदार, व्यापारी, वकील, नेते, उद्योजक आणि त्यांच्या स्त्रियांचाही समावेश आहे. पीठावालांच्या अशा व्यक्तिचित्रांतून भारतात त्या काळी असलेल्या व्हिक्टोरियन आदर्शांचे अनुकरण करणार्‍या समाजजीवनाचे आणि त्यांच्या वैभवाचे दर्शन घडते. अशा प्रकारच्या व्यावसायिक कामात ते इतके अडकले, की त्यांच्याकडून कलावंत म्हणून स्वतःच्या आनंदासाठी क्वचितच चित्रनिर्मिती झाली. परिणामी, पेस्तनजी बोमनजी यांच्याप्रमाणे त्यांनी सर्वसामान्य माणसांची चित्रेही फारशी रंगविली नाहीत. परंतु त्यांच्या व्यावसायिक व्यक्तिचित्रांतूनही ते रंगवीत असलेल्या व्यक्तीमधील मानवी भावनांचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

पीठावाला यांना १९०७, १९०८ व १९०९ अशा तीन सलग वर्षी बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. ही गोष्ट व्यवस्थापक मंडळाच्या लक्षात येताच त्यांनी एक नवीन नियम तयार केला. ‘जर एखाद्या चित्रकाराला एका वर्षी ‘सुवर्ण पदक’ मिळाले, तर त्याला ते पुढील तीन वर्षांपर्यंत देण्यात येऊ नये’, असा हा नवीन नियम होता. हा नियम होताच पीठावालांनी त्यानंतर सोसायटीच्या कोणत्याही प्रदर्शनात स्पर्धेसाठी चित्र न पाठविण्याचा निर्णय घेतला. परंतु ते १९१० पासून बॉम्बे आर्ट सोसायटीच्या समितीवर सदस्य म्हणून काम करीत असत. एम.के. परांडेकर व जे.पी. फर्नांडीस यांनी १९१८ मध्ये आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. पीठावाला या संस्थेचे स्थापनेपासून अध्यक्ष होते व त्यांनी ही संस्था वाढविण्यासाठी मनःपूर्वक मदतही केली. पोर्ट्रेट पेंटिंगमधील त्यांचे यश व प्रसिद्धी यांमुळे त्यांची ‘सोसायटी ऑफ ब्रिटिश पोर्ट्रेट पेंटर्स’ या संस्थेतर्फे ‘फेलो’ म्हणून निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला. पीठावाला यांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षीनिधन झाले.

त्यांच्या चिरंजीवांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथील अभ्यासक्रम पूर्ण करून पेंटिंंग व आर्किटेक्चरची पदविका मिळविली व तेदेखील व्यक्तिचित्रे करीत. त्यांची कन्या पिरोज पीठावाला यांनी आपल्या वडिलांकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले व त्याही व्यावसायिक व्यक्तिचित्रणाचा व्यवसाय करीत.

- सुहास बहुळकर

संदर्भ :
१. मित्तर, पार्था; ‘आर्ट अॅण्ड नॅशनॅलिझम इन कलोनियल इंडिया’, १८५०-१९२२. २. धुरंधर, एम.व्ही.; ‘एम.एफ. पीठावाला’; ‘वसुंधरा’; २४ जून १९३३.३. ‘मॅनिफेस्टेशन खख’; दिल्ली आर्ट गॅलरी.