Skip to main content
x

पंडित, शंकर पांडुरंग

     न १८८४ मध्ये पुण्यात हुजूरपागा शाळेची स्थापना झाली. त्या आधी एतद्देशीय मुलींसाठी फारशा शाळा नव्हत्या. काही परदेशी आणि परधर्मीय ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एतद्देशीय मुलींसाठी कलकत्ता, मुंबई या शहरांमधून शाळा सुरू केल्या होत्या. पण या शाळांमधून मुली पाठवण्यास पालक कचरत असत. बरेचदा त्यामध्ये धर्मांतराची भीती असे. त्यामुळे मग मुलींचे शिक्षण चार इयत्तांपर्यंतच कसेबसे पोचत असे. याच काळात काही समाजसुधारकांनी मात्र स्त्री शिक्षणाचा विषय उचलून धरला होता. किंबहुना, त्यांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व कळले होते असेच म्हणायला हवे. या समाजसुधारकांमध्ये न्या. म. गो. रानडे, वा. आ. मोडक, डॉ. सर रा. गो. भांडारकर, तसेच रा. ब. शंकर पांडुरंग पंडित यांचा समावेश होता. यांनीच स्त्री शिक्षणासंबंधी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांनाच पुढे गोपाळ गणेश आगरकरांनीही पूर्ण पाठिंबा दिला.

      हुजूरपागा शाळेची स्थापना करताना शंकर पांडुरंग पंडितांची भूमिका महत्त्वाची ठरली. स्त्री शिक्षणाची आवश्यकता त्यांनी आपल्या बोलण्यातून, भाषणातून कायमच उत्तमप्रकारे विशद केली. स्त्री-पुरुषांतील बौद्धिक अंतर समाजाच्या, प्रगतीच्या व देशोन्नतीच्या मार्गातील एक संकट आहे. हे टाळण्यास सर्व धर्माच्या व जातींच्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पुणे शहरात विद्यालय स्थापण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

      स्त्री जातीच्या व पर्यायाने समाजाच्या उन्नतीसाठी बालविधवांची अनुकंपनीय स्थिती सुधारण्यासाठी स्त्री शिक्षणावाचून पर्याय नाही. तेव्हा मुलींना किमान मॅट्रिकपर्यंत शिक्षण देणारे विद्यालय स्थापन करून मुलींच्या शिक्षणाची सोय करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे असेही आवाहन त्यांनी केले. त्यानंतर पुण्यात मुलींचे विद्यालय स्थापन करण्याचे ठरले.

      त्यानंतर २९ सप्टेंबर १८८४ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर त्या वेळच्या मुंबई इलाख्याचे गर्व्हनर सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते ‘हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल्स’ या संस्थेचा उद्घाटन समारंभ हिराबागेतील टाऊन हॉलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी नेमलेली समिती हीच शाळेची पहिली व्यवस्थापक समिती होती. या समितीत रा. ब. शंकर पांडुरंग पंडित हे पहिले सचिव आणि कोषाध्यक्ष होते. १ डिसेंबर १८८७ रोजी ‘महाराष्ट्र फीमेल एज्युकेशन सोसायटी’ या नावाने विद्यालयाच्या व्यवस्थापक मंडळाची कायदेशीररीत्या नोंद झाली.

      शाळेच्या इमारतीसाठी स्वतंत्र जागा शोधणे आणि ती मिळवणे यातही शंकर पंडित यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ही जागा पुणे शहराच्या मध्यवस्तीत लक्ष्मी रस्त्यावर होती. ही जागा सांगलीचे राजे धुंडिराज चिंतामण उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांच्या मालकीची होती. शनिवार, नारायण, बुधवार आणि सदाशिव या चार मुख्य पेठांमध्ये ही हुजूरपागा होती. या परिसरात राहणाऱ्या बहुतांश मुली या शाळेत शिक्षणासाठी येणार होत्या. प्रवास करावा लागणार नव्हता. त्यामुळे ही जागा सोयीची होती. त्यावेळी सांगलीच्या राजांकडून ही जागा शंकर पंडित यांनी शाळेसाठी ९९ वर्षांच्या करारावर घेतली.

     शाळेची इमारत उभी करताना, प्रत्यक्ष शाळा सुरू करताना शंकर पंडितांनी अनेक कष्ट घेतले. त्या काळच्या बहुतेक उदार स्त्री-पुरुषांकडून देणग्या मिळवण्याचे बरेचसे श्रेयही शंकर पंडित यांनाच जाते. युरोपियन स्त्री-पुरुष, एतद्देशीय संस्थानिक, धनिक इत्यादींच्या मनामध्ये त्यांनीच शाळेच्या कार्याविषयी सहानुभूती उत्पन्न केली. केवळ सहाच महिन्यात त्यांनी निरनिराळे संस्थानाधिपती आणि इतर धनिक यांच्याकडून त्या काळात एक लाखावर निधी शाळेसाठी जमविला होता.

      न्यायाधीश, उपजिल्हाधिकारी, ओरिएंटल ट्रान्सलेटर इ. अधिकारपदांवर त्यांनी कामे केली होती. करारी, बाणेदार, सत्यप्रिय, स्पष्टवक्ता आणि धर्मनिष्ठ म्हणून त्यांची ख्याती होतीच. तसेच ते बहुभाषी, विद्वान अणि ग्रंथकार म्हणूनही प्रसिद्ध होते. ते पहिल्या प्रतीचे कर्ते समाजसुधारक होते. स्त्रिया आणि अस्पृश्यांच्या उद्धाराबाबत त्यांच्या अंत:करणात निस्सीम कळकळ असे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शाळा समितीच्या सचिवपदी  सतत ११ वर्षे काम केले.

      पोरबंदर संस्थानच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरचे कामही त्यांनी केले.

- वर्षा जोशी-आठवले

पंडित, शंकर पांडुरंग