Skip to main content
x

पराडकर, राजाराम नारायण

राजाराम नारायण पराडकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील वेरळ या खेडेगावात, भिक्षुक ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण गणेश पराडकर व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. पराडकरांचे सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या बहिणीकडे, शिपोशीला झाले. वडिलांकडे ब्रह्मचर्य कर्म शिकून ते १९१३ साली मुंबईत आले.

झावबा वाडीतील श्रीराम मंदिरात त्यांचे वडील पुजारी असल्याने पराडकरांना अनेक कीर्तनकारांचा सहवास लाभला. त्यातून त्यांनी हार्मोनिअम वादनाची कला अवगत केली. यामुळे अभिजात संगीताची आवड निर्माण होऊन पराडकरांनी प्रथम नरहरबुवा गोखले यांच्याकडे तालीम घेतली. गायनाचार्य पं. भास्करबुवा बखल्यांशी परिचय होऊनही त्यांची तालीम घेण्याचे भाग्य दुर्दैवाने पराडकरांना लाभले नाही.

त्यांना महापालिकेत संगीत-शिक्षकाची नोकरी मिळाली. १९२७-२८ च्या सुमारास बाळकृष्ण इचलकरंजीकरांचे शिष्य यशवंतबुवा मिराशी हे पराडकरांना गुरूच्या रूपाने लाभले. त्यांच्याकडे पराडकरांनी दहा ते बारा वर्षे तालीम घेतली. ही तालीम रोज आठ-दहा तास चालत असे. पराडकरांच्या गायनशैलीवर भास्करबुवा व यशवंतबुवा या महान कलाकारांच्या शैलीचा प्रभाव होता. परिपूर्ण असलेला निकोप आवाज, बोल, आलाप, उपज अंग, लयदार शैली त्यांच्या गायनात दिसून येत असे. ते राग ‘मलुहा केदार’ फार चांगला गात व त्यामुळे आचार्य रातंजनकर त्यांना ‘मलुहा पराडकर’ असे गौरवाने संबोधत.

विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल अशी विद्या पराडकर यांनी विद्यार्थ्यांना भरभरून दिली. जोड राग, अभिजात संगीतातील आम राग पराडकर प्रभावीपणे सादर करत. तबला, हार्मोनिअम सफाईने वाजवणार्‍या पराडकरांच्या विद्यार्थीवर्गात पद्मभूषण पं. सी.आर. व्यास, पं. जे.व्ही. भातखंडे, आर.व्ही. सोहोनी, श्रीपाद व राम (पुत्र), दर्शना पराडकर, निर्मलाताई गोगटे इत्यादी शिष्यांचा समावेश आहे. त्यांचे वयाच्या शहात्तराव्या वर्षी मुंबईत निधन झाले.

श्रीपाद पराडकर

पराडकर, राजाराम नारायण