Skip to main content
x

प्रधान, स्नेहप्रभा विठ्ठल

     सौंदर्याने, कलेने आणि बुद्धिमत्तेने हिंदी आणि मराठी चित्रपटक्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्नेहप्रभा विठ्ठल प्रधान. त्यांच्या आईचे नाव ताराबाई होते. आई-वडील या दोघांनीही सामाजिक क्षेत्रात - विशेषत: शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले होते. स्नेहप्रभा प्रधान यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी गेले. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षणही अनेक गावांमधून पार पडले. परंतु डॉक्टरच व्हायचे या ध्येयाने त्या मुंबईला आल्या आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या ग्रँट मेडिकल महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. मात्र दुर्दैवाने त्यांना डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही. पण त्याने नाउमेद न होता त्या नृत्य, संगीत आणि अभिनय यांसारख्या कलांमध्ये पारंगत झाल्या. पुढील काळात आपली कारकिर्द घडवताना त्यांना या कलाशिक्षणाचा पुरेपूर उपयोग झालेला दिसतो. त्यांचे कलागुण लक्षात घेऊन त्या काळातल्या बॉम्बे टॉकीज, मुरली मुव्हीटोन, रणजित मुव्हीटोन, हिन्दुस्थान मुव्हीटोन यांसारख्या नावाजलेल्या चित्रपटसंस्था त्यांना चित्रपटात अभिनय करण्यासाठी विचारत होत्या.

     शेवटी १९३९ साली चिमणभाई देसाई यांच्या बॉम्बे टॉकीज संस्थेच्या ‘सौभाग्य’ व ‘सजनी’ या चित्रपटात त्यांनी भूमिका करण्यास सुरुवात केली. पण त्या भूमिका  नगण्य होत्या. मात्र १९४० साली बॉम्बे टॉकीजने ‘पुनर्मिलन’ हा चित्रपट तयार केला आणि स्नेहप्रभा प्रधान यांनी नायिका म्हणून त्यात काम केले. चित्रपटाला रामचंद्र पाल यांचे संगीत होते. चित्रपटाचे नायक होते किशोर साहू. हा चित्रपट खूप यशस्वी ठरला. त्यातले ‘नाचो... नाचो प्यारे मनके मोर’ हे गीत लोकप्रिय झाले. याच दरम्यान स्नेहप्रभा प्रधान यांनी किशोर साहू यांच्याशी विवाह केला. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर मा. विनायक यांनी बनवलेल्या ‘पहिली मंगळागौर’ (१९४२) या चित्रपटात स्नेहप्रभा प्रधान यांनी भूमिका केली. स्नेहप्रभा प्रधान यांचा हा पहिला मराठी चित्रपट होता. शाहू मोडक त्याचे नायक होते व लता मंगेशकर यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. स्नेहप्रभा आणि लता मंगेशकर यांनी गायलेले द्वंदगीतही या चित्रपटात होते. हा चित्रपट चांगला चालला.

     त्या काळात नवयुगच्या ‘दिनरात’ (नायक - परेश बॅनर्जी), ‘शिकायत’ (नायक - श्याम), ‘कालिदास’ (नायक - पहाडी संन्याल) अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांतून स्नेहप्रभा प्रधान यांनी भूमिका केल्या. ‘प्यास’ या मुरली मुव्हीटोनच्या चित्रपटात त्यांनी काम केले. १९५० साली देव आनंद, नर्गीस यांच्या ‘बिरही की रात’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आणि १९५० पासून चित्रपट क्षेत्रातून त्या निवृत्त झाल्या. त्यानंतर बाबूराव पै यांच्या फेमस पिक्चर्स संस्थेत त्यांनी माहितीपट, जाहिरातपट खात्यात नोकरी केली.

     स्नेहप्रभा प्रधान यांनी १९४९ साली ‘झुंझारराव’ या नाटकात भूमिका करून रंगभूमीवर पाऊल ठेवले. अ.वा. वर्टीलिखित ‘राणीचा बाग’, ‘लग्नाची बेडी’, रत्नाकर मतकरी यांचे ‘अस्ताई’, सुमती धनवरे यांचे ‘धुळीचे कण’, विद्याधर गोखले यांचे ‘साक्षीदार’ अशा नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. तसेच ‘प्रभा थिएटर’ अशी स्वत:ची नाट्यसंस्था स्थापन करून ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’ यासारखी संगीत नाटके रंगभूमीवर आणली. ‘सर्वस्वी तुझाच’ हे आत्मचरित्रवजा कथानक असणारे नाटक लिहून त्यात भूमिका केली, तसेच त्याचे दिग्दर्शनही केले. ‘स्नेहांकिता’ हे  आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे.

     - स्नेहा अवसरीकर

प्रधान, स्नेहप्रभा विठ्ठल