Skip to main content
x

प्रयागी, प्रभाकर विष्णू

         वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन-कार्यास व उपचारपद्धतींच्या प्रसारास आवश्यक असलेल्या उपयोजित चित्रकलेचे (मेडिकल इलस्ट्रेशन) नवे दालन सुरू करणारे भारतातले पहिले चित्रकार प्रभाकर विष्णू प्रयागी यांचा जन्म मध्य-प्रदेशातील खांडवा येथे झाला. त्यांच्या आजोबांचा सुबोध सिंधू प्रेसहोता. भारत सरकारची व विद्यापीठाची मुद्रणाची कामे तिथे केली जात. मुद्रणकलेचे संस्कार प्रयागी यांच्यावर बालपणातच झाले.

त्यांनी सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट येथे  प्रवेश घेतला आणि त्यांनी १९५१ मध्ये कमर्शिअल आर्टमधील पदविका प्राप्त केली. लिथोग्रफीच्या मुद्रणतंत्रात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. त्यांनी फ्री प्रेस जर्नलया वृत्तपत्रात काही काळ काम केले. व्यंगचित्रकार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा तिथेच काम करीत होते.

प्रयागी १९५१ मध्ये टाटा कर्करोग रुग्णालयामध्ये रुजू झाले ते कला संचालक व्ही.एन. आडारकर यांच्या सांगण्यावरून. वैद्यकीय चित्रकला हे क्षेत्र त्या काळात पूर्णपणे नवीन होते. प्रयागी यांना कोणाचेच मार्गदर्शन नव्हते. संशोधक डॉक्टरांच्या गरजा लक्षात घेऊन, छायाचित्रणाची अत्याधुनिक साधने नसतानाही निरीक्षण आणि कल्पकता यांच्या जोरावर प्रयागींनी वैद्यकीय संशोधनास पूरक अशी अनेक चित्रे काढली.

विकृतिविज्ञान (पॅथॉलॉजिकल) तपासणीसाठी त्या काळात आजच्यासारखी आधुनिक यंत्रणा नव्हती. सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण करून अंतर्गत रचना दाखविणारी चित्रे तयार करावी लागत. इंडियन कॅन्सर सोसायटी, यूडीसीटी अशा संस्था आणि डॉ. के.के. दाते, डॉ. बावडेकर, डॉ. जसावाला यांसारख्या नामवंत वैद्यकीय संशोधकांचे संशोधनकार्य तज्ज्ञांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयागी यांनी अनेक चित्रे आणि पारदर्शिका तयार केल्या. इतकेच नव्हे, तर त्यांनी मधू पाटील, सुशील कदम यांच्यासारखे पुढे जागतिक स्तर गाठणारे वैद्यकीय कलेतील चित्रकारही तयार केले.

कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाचे प्रतीक म्हणून जे खेकड्याचे बोधचिन्ह आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे, ते प्रयागी यांनी तयार केले होते. टाटा कॅन्सर संस्थेस भेटी देणार्‍या मान्यवरांची छायाचित्रे घेणे, माहिती पुस्तिकांचे संकल्पन आणि मांडणी करणे यांसारखी वैद्यकीय संज्ञापनास पूरक अशी अन्य कामेही त्यांनी केली. एक छंद म्हणून त्यांनी रांगोळीसाठी स्टेन्सिल्स देखील तयार केली होती आणि त्यांतून ते आपल्या विशिष्ट शैलीत रांगोळी साकार करीत असत.

आज वैद्यकीय चित्रकला (मेडिकल इलस्ट्रेशन) ही उपयोजित कलेची स्वतंत्र शाखा निर्माण झाली आहे आणि परदेशांत त्याचे स्वतंत्र पदवी अभ्यासक्रमही आहेत. वैद्यकीय चित्रकलेची व्याख्या अशी केली जाते : वैद्यकीय किंवा जीवशास्त्रीय माहितीचे आकलनसुलभ किंवा आभासी (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या) माध्यमातून आणि चित्रकलेची कौशल्ये वापरून केलेले दृश्यांकन. अशा चित्रकारांना वैद्यक, विज्ञान, शिक्षणपद्धती आणि संज्ञापनकला यांचाही अभ्यास करावा लागतो. गुंतागुंतीची शास्त्रीय माहिती कल्पनाशक्तीस चालना देणार्‍या दृश्यप्रतिमांमध्ये रूपांतरित करण्याचे काम वैद्यकीय चित्रकाराचे असते. आज त्यात चित्रकले-बरोेबरच, छायाचित्रण, व्हिडिओ, अ‍ॅनिमेशन आणि संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

प्रयागी यांनी सुरू केलेली वैद्यकीय चित्रकलेची शाखा मधुकर पाटील व सुशील कदम यांनी अधिक प्रगत केली. मधुकर आत्माराम पाटील यांनी १९७० मध्ये सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून उपयोजित कलेतील पदविका प्राप्त केली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झुऑएॉजी डिपार्टमेंटमध्ये मायक्रो-फोटोग्रफर म्हणून त्यांनी काम केले. नंतर इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्शन (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) टुब्रो वैज्ञानिक चित्रकार (सायंटिफिक आर्टिस्ट) म्हणून त्यांनी काम केले. टाटा कर्करोग रुग्णालयामध्ये पाटील वैद्यकीय छायाचित्रकार म्हणून लागले व अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये बायोमेडिकल कम्युनिकेशनचे प्रशिक्षण घेऊन आले. वैद्यकीय परिषदांसाठी दृकश्राव्य सादरीकरणाला लागणार्‍या पारदर्शिका तयार करण्याचे काम ते करीत असत.

सुशील कदम यांनी सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून १९७२ साली पदविका घेतल्यानंतर ते परळच्या इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शनया संस्थेत सूक्ष्मछायाचित्रण-कलातज्ज्ञ म्हणून रुजू झाले. तिथे नलिकाबालक (टेस्ट ट्यूब बेबी) संबंधातले संशोधन होत असताना त्यांनी प्रयोग-प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचे छायाचित्रीकरण आणि दृक्श्राव्य माध्यमांसाठी लागणार्‍या पारदर्शिका तयार केल्या.

रॉकफेलर युनिव्हर्सिटीमध्ये १९९७ साली आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी कदम यांना अमेरिकेत पाठवण्यात आले. त्यानुसार भारतात आल्यावर त्यांनी इलेक्ट्रोमायक्रोस्कोपीचे तंत्र दृश्यकलेच्या माध्यमातून पोहोचवण्याचे प्रयत्न केले. आज वैद्यकीय क्षेत्रात भारतात प्रगती होत असताना वैद्यकीय चित्रकलेचा विकास होत आहे. त्याची सुरुवात प्रभाकर प्रयागी यांच्यापासून झाली

- रंजन जोशी, दीपक घारे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].