Skip to main content
x

पटवर्धन, कुसुम विठ्ठल

     कुसुम विठ्ठल पटवर्धन ह्या पूर्वाश्रमीच्या कुसुम गोळे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या म्युनिसिपल शाळेत व माध्यमिक शिक्षण नाशिक विद्यालयामध्ये झाले. या शाळेतील संस्कारांचा व वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला. शाळेत ‘ग्रामोद्धार’ सारखे उपक्रम होत. त्यातून कुसुमताईंच्या मनात सामाजिक जाणिवा जाग्या होत गेल्या. मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्या पुण्याला गेल्या. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. पुण्यात कुसुमताईंनी महात्मा गांधींची भाषणे ऐकली. देशसेवेच्या ध्येयाने त्या भारावून गेल्या आणि शिक्षण सोडून नाशिकला परत आल्या. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाल्या. एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला आणि त्यांचे जीवनच बदलून गेले. नाशिकच्या एच. पी. टी. (हंसराज प्रागजी ठाकरसी) विद्यालयामधून त्या अर्थशास्त्राच्या पदवीधर झाल्या. त्याचवेळी विठ्ठलराव पटवर्धनांशी त्यांचा विवाह झाला. दोघांनीही स्वत:ला समाजकार्यात, देशकार्यात झोकून दिले.

      राष्ट्रप्रेमातून कुसुमताईंनी हिंदी भाषेत एम. ए. केले. देशाची आर्थिक संरचना जाणून घेण्याच्या इच्छेने अर्थशास्त्रात एम. ए. पदवी मिळविली. नाशिकच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मधून बी.एड. पदवी प्राप्त केली. सन १९६० मध्ये नाशिकच्या शारदा मंदिर म्हणजे आजच्या मा. रा. सारडा कन्या विद्या मंदिरात त्यांनी शिक्षकी व्यवसायास प्रारंभ केला.

      कुसुमताई इंग्रजी, मराठी, हिंदी व अर्थशास्त्र ह्या विषयांच्या व्यासंगी शिक्षिका होत्या, उत्तम वक्तृत्वाचा गुण त्यांच्याजवळ होता. त्या स्वत: उत्तम खेळाडू होत्या. नाटक, संगीत यात त्यांना रस होता. विद्यार्थिनींबद्दल मनात प्रेम होते. यातूनच विद्यार्थिनींना त्यांचे मार्गदर्शन मिळाले. अल्पावधीतच विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांचे नाव झाले.

       सन १९६० मध्ये महाराष्ट्र समाज सेवा संघाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. या संस्थेच्या वतीने, समविचारी सहकार्‍यांच्या मदतीने नाशिकमधील शरणपूर भागात त्यांनी शाळा काढली. ‘रचना विद्यालय’ सुरू केले. मुले शाळेत यावीत म्हणून कुसुमताई सहकार्‍यांबरोबर शरणपूर भागात घरोघरी हिंडल्या. परिणामत: पालक मुलांना शाळेत पाठवू लागले. विद्यालयास कुसुमताईंच्या रूपात एक उत्तम शिक्षिका, उत्तम मुख्याध्यापिका मिळाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रचना विद्यालयाची प्रगतीच्या दिशेने वेगात वाटचाल सुरू झाली.

       ‘समता, साधना व समृद्धी’ हे शाळेचे ब्रीदवाक्य. मुलांना ज्ञानविज्ञान संपन्न करीत असतानाच मूल्यसंस्कार त्यांच्यावर व्हावेत, देशाचे भावी नागरिक उत्तम रीतीने घडावेत या दृष्टीने विद्यालयात त्यांनी विविध उपक्रम सुरू केले. गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता सप्ताह, पावसाळ्यातील पायी सहली, दहीहंडी, कोजागिरी, भोगीसारखे कार्यक्रम आणि विविध स्पर्धा अशा उपक्रमांतून मुलांचा विकास होत गेला. संगीत, नाटक, क्रीडा या विषयात कुसुमताईंना रस असल्याने मुलांनाच नव्हे तर शिक्षकांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत असे. परिणामत: शहर, जिल्हा व राज्यपातळीवरील स्पर्धांमधून विद्यार्थी नाव मिळवू लागले, नाशिकमधील अग्रगण्य शाळा म्हणून रचना विद्यालय ओळखले जाऊ लागले.

       बालवाडीपासून कनिष्ठ महाविद्यालयाचे रचना विद्यालय, नवरचना विद्यालय, बालवाडी प्रशिक्षण वर्ग, सी.टी.सी. प्रशिक्षण वर्ग, आश्रमशाळा, माई लेले श्रवण विकास विद्यालय असे विविधांगी शैक्षणिक कार्य करणार्‍या महाराष्ट्र सेवा संघाला एक वैभवशाली रूप प्राप्त झाले. त्यात कुसुमताईंचे योगदान फार मोठे आहे. या त्यांच्या योगदानासाठी १९८१ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने कुसुमताईंचा गौरव झाला.

       १९८२ मध्ये रचना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून कुसुमताई निवृत्त झाल्या. स्वस्थ बसणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. महिलांच्या समस्या त्यांना नेहमीच अंतर्मुख करीत. अन्याय व अत्याचारांनी पीडित स्त्रियांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी ‘महिला हक्क संरक्षण समिती’ची स्थापना केली. अशा स्त्रियांना ताठ मानेने जगायला शिकविण्याचे त्यांचे कार्य असामान्य आहे. संघर्षात्मक कार्याला रचनात्मक कार्याची जोड मिळावी लागते ह्या विचारातून त्यांनी ‘कल्याणी प्रकल्प’ उभा केला. अनेक महिलांना आधार दिला, चरितार्थाची साधने उपलब्ध करून दिली. आदिवासी मुलींसाठी सुमतीबाई गोरे ह्यांच्या स्मरणार्थ उभे राहिलेले वसतिगृह हे कुसुमताईंच्या चौफेर कार्याचे आणखी एक दालन. त्यामुळे नाशिकमध्ये राहण्याजेवण्याची आदिवासी मुलींची सोय झाली व शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.

      या कार्याच्या निमित्ताने कुसुमताईंनी वृत्तपत्रातून, नियतकालिकांतून विपुल लेखन केले. त्यांना इस्त्रायलला जाण्याची संधी मिळाली. भारतात परत आल्यावर जॉर्डन नदीच्या तीरावरील सामूहिक शेतीवर आधारित आर्थिक परिवर्तनाच्या व समाजबांधणीच्या प्रयोगांवर ‘ध्येयधुंद’ पुस्तक त्यांनी लिहिले. ‘भारतातील शेती’ ह्या  पुस्तकात गांधीजींचे शेतीविषयक आर्थिक विचार मांडले. गुरुवर्य अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या जीवनाची वाटचाल ‘जडणघडण’ ह्या पुस्तकात शब्दांकित केली.

      कुसुमताई पटवर्धनांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अजोड कार्याबद्दल महाराष्ट्र सामाजिक परिषद-निफाड, समाजवादी महिला सभा महाराष्ट्र, नाशिक महानगरपालिका लोककल्याण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.

     - प्रा. सुहासिनी पटेल

पटवर्धन, कुसुम विठ्ठल