Skip to main content
x

फुले, सावित्रीबाई जोतीराव

     कोणिसाव्या शतकात जन्मलेल्या सावित्रीबाई जोतीराव फुले या अशिक्षित स्त्रीने असामान्य धैर्य दाखविले. स्वतः लिहायला वाचायला शिकून ती शिक्षिका बनली. तळागाळातील लोकांचे उपेक्षित जीवन, शूद्रांच्या व्यथा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, शेतकऱ्यांचा प्रश्‍न, दुष्काळाची परिस्थिती, अनाथ विधवांचे आणि अनाथ अर्भकांचे हाल, दत्तक प्रश्‍न अशा सामाजिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.

     सावित्रीबाईंं फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. प्रेमळपणा, अन्यायाची चीड, बेडर वृत्ती, कष्टाळू, चपळ, बुद्धिमान असे गुण लहानपणापासून तिच्यामध्ये दिसू लागले.

     जोतीराव गोविंदराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह १८४० मध्ये झाला. घरकाम करून शेतीकामातही त्या मदत करीत. जोतीराव फुल्यांचे एक मित्र सदाशिव गोवंडे यांचे मेहुणे वारले. त्यामुळे गोवंडेच्या बहिणीला सासरच्या लोकांनी जबरदस्तीने सती जायला भाग पाडलेे. ही बातमी ऐकून सावित्रीबाईंना खूप वाईट वाटले. असे भयानक प्रकार थांबवायचे असतील तर स्त्रियांचे अज्ञान दूर केले पाहिजे आणि स्त्रियांनी व शूद्रांनी शिकायला हवे, असा उपाय जोतीरावांनी सावित्रीबाईंना सांगितला. त्यावर सावित्रीबाईंनी हे कार्य आजन्म करण्याचे वचन त्यांना दिले. सावित्री-जोतीरावांनी नवसमाज निर्माण करण्याची शपथ घेतली.

     सावित्रीबाईंनी स्वत:पासून शिक्षणाचा श्रीगणेशा केला. जोतीरावांंकडून लिहिणे वाचणे शिकून घेतले. आता इतरांना शिकविण्याचे काम हाती घ्यायचे हा निश्चय केला. मिसेस मिचेल यांच्या शाळेत जाऊन प्रशिक्षण घेतले. त्या उत्तम शिक्षिका झाल्या. जोतीराव फुले यांनी पुण्यातील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी तिथे शिकविण्यास सुरुवात केली. एक बाई स्वत: शिकते व इतरांना शिकविते हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मानवणारे नव्हते. त्यांनी प्रखर विरोध केला व शिकविण्यासाठी जाणाऱ्या सावित्रीबाईंवर शेण, चिखल फेकला. या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षणकार्य नेटाने चालू ठेवले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मठ लोकांनी जोतीरावांंच्या वडिलांना वाळीत टाकण्याची धमकी दिली.

     वडिलांना त्रास नको म्हणून जोतीराव आणि सावित्रीबाई घराबाहेर पडले. एका छोट्याशा घरात राहू लागले. पुण्यात त्यांनी १८४८ च्या ऑगस्ट महिन्यात दलितांसाठी शाळा काढली. त्या काळात त्यांनी १८ शाळा काढल्या व  समर्थपणे चालवूनही दाखविल्या. सावित्रीबाई या भारतातील आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका व ग्रंथपाल होत. त्यांनी भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक व शैक्षणिक जीवनाचा श्रीगणेशा केला.

     स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी महिला सेवा मंडळ ही संस्था सावित्रीबाईंनी काढली. या संस्थेतर्फे १४ जानेवारी १८५२ रोजी पुणे जिल्हाधिकारी साहेबांच्या मिसेस जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जातीधर्माच्या बायकांसाठी हळदीकुंकू व तिळगूळ समारंभ साजरा करण्यात आला.

     एक विधवा स्त्री फसवणुकीमुळे गर्भवती राहिली होती. तेव्हा ती आत्महत्येस प्रवृत्त झाली होती. फुले दांपत्याने तिला घरी आणून तिचे बाळंतपण केले. तिच्या मुलास फुले यांनी दत्तक घेतले. त्यांनी आपल्या घरातच बालहत्या प्रतिबंधगृह व विधवाश्रम २८ जानेवारी १८५३ रोजी काढले. जन्मजात बालकांना मारून टाकण्याऐवजी या केंद्रात त्यांना आणून द्या असे आवाहन त्यांनी जनतेस केले. विधवा स्त्रियांचे केशवपन करण्याची प्रथा त्या काळी होती. फुले पती-पत्नींनी पुण्यातील नाभिकांची बैठक बोलावून त्यांना विधवा स्त्रियांचे केशवपन करण्यास नकार देण्यास पटवून सांगितलेे. सावित्रीबाईंच्या प्रेरणेने नाभिकांनी संप पुकारून भगिनींच्या डोक्यावर वस्तरा न चालविण्याचा निर्धार व्यक्त केला.

      तरूण विधवांना विवाह करता यावा यासाठी फुले पती-पत्नीने ‘विधवा विवाह महिला संघ’ स्थापन केला. विधवांची लग्ने लावून दिली. तसेच विधवांनीही कपाळास कुंकू लावण्याची प्रथा निर्माण केली.

      दूरवरून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना राहण्याची सोय नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन सावित्रीबाईंनी आपल्या घरातच अशा मुलांसाठी वसतिगृह उघडले.

      आपण सारी एकाच परमेश्‍वराची लेकरे आहोत. माणसामाणसात भेदाभेद नसावा ही सावित्रीबाईंची शिकवणूक होती. त्या काळी पाणीटंचाईमुळे अस्पृश्यांना प्यायला पाणी मिळत नव्हते. सार्वजनिक हौदावर अस्पृश्यांना येण्यास मज्जाव होता. यावर मार्ग काढण्यासाठी फुले यांनी आपल्या वाड्यातील हौदाचे पाणी सर्वांसाठी खुले केले. 

      १८७७ मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्यावाचून मरू लागले. ज्योतीबा आणि सावित्रीबाई यांनी पुण्यात अन्नछत्र उघडले. सतत ९ महिने १ हजार मुलांना भाकरी दिल्या. त्यांच्या कार्याची वार्ता सर्वदूर पसरली. पंडिता रमाबाई रानडे, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी या कार्यास साहाय्य केले. सत्यशोधक समाजाने ब्रिटिश सरकारकडे जनतेची गाऱ्हाणी पोहोचविली. त्यामुळे शेतकऱ्यांवर लादलेला कर वसूल करण्यास स्थगिती मिळाली.

      महात्मा ज्योतीबा फुले यांचे निधन झाल्यानंतरही त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे सावित्रीबाईंनी दलितोद्धाराचे कार्य चालूच ठेवले. पुण्यात प्लेगची साथ आली होती. रोग्यांना सेवा मिळावी म्हणून आपला पुत्र डॉ. यशवंत याच्या मदतीने वानवडी व घोरपडीमध्ये ससाप्याच्या माळाजवळ दवाखाना काढला. रोग्यांची अहोरात्र सेवा केली. त्यातच सावित्रीबाई आजारी पडल्या आणि या रोगानेच त्यांची प्राणज्योत मालवली.

     सावित्रीबाई फुले या साहित्यिकही होत्या. ‘काव्यफुले’ हा त्यांचा कवितासंग्रह आहे. ‘विचारप्रवर्तक निबंध’ हे ही त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. अत्यंत कठीण परिस्थितीत समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी राहिले आहे. पंडिता रमाबाई यांनी म्हटले आहे,“एक वेळ असे ज्योतीबा जन्माला येतील. अशी सावित्री जन्माला येईल पण या दोघांच्या कामातील साथ हा एक आदर्श आहे.”

     - श्याम भुर्के

संदर्भ
१.      संगणक माहिती, पुणे मराठी ग्रंथालय
२.      देशपांडे सुषमा  - व्हय मी ‘सावित्रीबाई.
३.      सावंत ,मधू ;समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले,
फुले, सावित्रीबाई जोतीराव