Skip to main content
x

रानडे, विवेक विनायक

         डॉ. विवेक विनायक रानडे यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आय.सी.टी.) या संस्थेतून रसायन अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आणि तेथूनच पुढे मुंबई विद्यापीठाची रसायन अभियांत्रिकीमधील पीएच.डी. संपादन केली. नंतर ते दीड वर्षे झूरीकच्या स्विस फेडरल टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत होते. तिथे डॉ. रानडे यांनी टर्ब्यूलंट रिअ‍ॅक्टिव्ह मिक्सिंग म्हणजेच रासायनिक द्रवपदार्थांचे घुसळणे चालू असताना त्यांच्यात प्रक्रियात्मक काय बदल होतात, यावर काम केले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे त्या वेळचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या सल्ल्यानुसार रानडे १९९० साली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत रुजू झाले. १९९३ साली नेदरलँडच्या डेल्फ तंत्रशास्त्र विद्यापीठात त्यांनी वायू-द्रव संयत्राच्या (गॅस लिक्विड रिअ‍ॅक्टर) संगणक प्रारूपावर संशोधन केले. त्याच विषयावरील पुढील संशोधन म्हणून १९९७-९८ साली नेदरलँडच्या ट्वेंटे तंत्रशास्त्र विद्यापीठात अभ्यागत संशोधक म्हणून त्यांनी वायू-द्रव संयत्राच्या गतिविज्ञानावर काम केले. आपल्या या संशोधनाचा देशाला फायदा करून देण्यासाठी त्यांनी २००३ साली आय.सी.टी.मध्येच प्राध्यापक म्हणून काम करावयास सुरुवात केली.

     संशोधन, नवनवीन प्रयोग, नवीन प्रारूपे तयार करून डॉ. रानडे, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी विविध प्रकारच्या रासायनिक संयत्रांवर काम करीत आहेत. रासायनिक संयत्रामध्ये अनेक रासायनिक प्रक्रिया होतात. या रासायनिक संयत्राची कार्यक्षमता आणि उत्पादकता उच्च राखण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील, यावर त्यांनी संशोधन केले. त्यानुसार या संयत्रामध्ये रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारा कच्चा माल आणि ऊर्जा योग्य त्या वेळी आणि योग्य त्या प्रमाणात असणे आणि रासायनिक द्रवपदार्थांचा प्रवाह नियंत्रणात ठेवणे, या गोष्टी साध्य केल्यास उत्पादकता आणि कार्यक्षमता उच्च प्रतीची असते, हे त्यांनी शोधले. तसेच त्यांचे गणन करून गणिती प्रारूपे तयार केली.

     डॉ. रानडे यांच्या या संशोधनाचा फायदा देश- परदेशांतील अनेक नावाजलेल्या संस्थांनी करून घेतला व आपली उत्पादनक्षमता वाढविली. त्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंजिनिअर्स इंडिया लि., हर्डेलिया केमिकल्स लि., भन्साळी पॉलिमर, आर्क्टिक इंडिया, फ्लिटगार्ड फिल्टर्स, टाटा स्टील या देशी, तर ड्यू. पाँ - अमेरिका, इन्व्हिस्टा - अमेरिका, एन.आर.सी. - कॅनडा, टी.ओ.सी.सी. - थायलंड इत्यादी परदेशी कंपन्यांचा समावेश आहे.

     डॉ. रानडे यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक फेलोशिप, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जसे केमटेक, इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअर्स, हर्डेलिया, ए.व्हि.आर.ए. युवा शास्त्रज्ञ, आय.एन.ई. युवा शास्त्रज्ञ, शांतिस्वरूप भटनागर असे पुरस्कार, तर स्वर्णजयंती फेलोशिप, महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप, यांचा समावेश आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ६० शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून त्यांनी त्यांचे संशोधनकार्य पुढे चालूच राहावे यासाठी संयत्र अभियांत्रिकी आणि त्याचे संगणक प्रारूप यांवर शिबिरे घेतली आहेत.

-  मृणालिनी साठे

दिलीप हेर्लेकर

रानडे, विवेक विनायक