Skip to main content
x

रातंजनकर, श्रीकृष्ण नारायण

श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब यांचा जन्म मुंबई येथील भटवाडीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील नारायण गोविंद रातंजनकर हे मुंबई पोलिसांतील गुन्हे अन्वेषण विभागात एक अधिकारी म्हणून नोकरी करीत. त्यांना संगीताची खूप आवड व जाण होती आणि ते उत्तम सतार वाजवीत असत. त्यांचे इंग्रजी, मराठी व संस्कृत या भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. श्रीकृष्ण रातंजनकर यांचे शालेय शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये झाले. सन १९२६ मध्ये ते विल्सन महाविद्यालयातून बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण रातंजनकरांचे संगीताचे प्रारंभिक शिक्षण पतियाळा घराण्यातील उस्ताद काले खाँ यांचे शिष्य कृष्णभट्ट होनावर यांच्याकडे सुरू झाले. त्यानंतर १९०८ पासून त्यांना  पं. अनंत मनोहर जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण मिळाले. त्यांचा १९१० साली त्यांच्या वडिलांचे एक वकील मित्र शंकरराव कर्नाड यांच्या मार्फत पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याशी परिचय झाला व १९११ पासून भातखंडे यांच्याकडे त्यांची नियमित तालीम सुरू झाली.
१९१६ साली बडोदे येथील पहिल्या संगीत परिषदेच्या वेळी श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्या मध्यस्थीने भातखंडे यांनी रातंजनकरांना उस्ताद फैयाझ खाँसाहेबांचे गंडाबंध शागीर्द केले. १९१६ ते १९२२ या मधल्या पाच वर्षांत रातंजनकरांना आफताब-ए-मौसिकी उ.फैयाझ खाँसाहेबांकडून आग्रा-रंगीले घराण्याच्या गायकीची रीतसर तालीम मिळाली व या गायकीचा सांगोपांग अभ्यास त्यांनी केला. त्या तालमीसाठी त्यांना बडोदा संस्थानाकडून दरमहा चाळीस रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली होती. ‘मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’ या नावाने १९२६ मध्ये संगीत महाविद्यालयाची स्थापना झाली. पं. भातखंड्यांनी लखनौ येथे अण्णासाहेबांना या महाविद्यालयामध्ये शिकविण्यासाठी बोलावले आणि त्यांची महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नेमणूक केली. या पदावर त्यांनी १९५७ पर्यंत अखंड काम केले.
पुढे १९२८ ते १९५६ या कालावधीत त्यांनी सांस्कृतिक, सांगीतिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या व मानाच्या हुद्द्यांवर कार्य केले. त्यांत बहुतेक सर्व विद्यापीठांचे परीक्षक, अभ्यासक्रम समिती, केंद्र व राज्य सरकारांच्या सांस्कृतिक समित्या, आकाशवाणीच्या ऑडिशन समित्या व अखिल भारतीय आकाशवाणीच्या ऑडिशन बोर्डाचे उपाध्यक्षपद इत्यादींचा समावेश आहे. ते युनेस्कोचे  सभासद होते.
सन १९४७ मध्ये त्या वेळचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  गोविंद वल्लभ पंत यांच्या हस्ते ‘भातखंडे संगीत विद्यालया’चे ‘भातखंडे विद्यापीठ’ म्हणून नामांतर झाले व त्याचे मुख्य संचालक म्हणून रातंजनकरांची नेमणूक झाली. त्याच वर्षी त्यांना भातखंडे विद्यापीठाने ‘गायनाचार्य’ (डॉक्टर ऑफ म्युझिक) ही पदवी दिली. सन १९४८ मध्ये त्यांच्या सल्ल्याने मुंबई येथील भारतीय विद्या भवनात कुलपती डॉ. के.एम. मुन्शी यांच्या मदतीने ‘भातखंडे संगीत व नर्तन शिक्षापीठा’ची स्थापना झाली व रातंजनकर यांची सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. या पदावर ते फेब्रुवारी १९७४ पर्यंत, म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत कार्यरत होते.
सन १९५२ ते १९६० या आठ वर्षांच्या कालावधीत त्यांनी आकाशवाणीच्या केंद्रीय ऑडिशन बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यांची १९५७ मध्ये मध्य प्रदेशातील खैरागड येथे इंदिरा कला संगीत विश्वविद्यालयाचे प्रथम उप-कुलपती म्हणून नेमणूक झाली. या पदावर त्यांनी १९६१ पर्यंत अखंड काम केले. सन १९६२ ते १९७४ पर्यंत मुंबईतील शीव येथील श्रीवल्लभ संगीतालयाचे सन्मान्य संचालक (ऑनररी डायरेक्टर) म्हणूनही त्यांनी कार्य केले. मध्यंतरीच्या काळात त्यांना दीड वर्षांसाठी लखनौ येथे ‘भातखंडे संगीत महाविद्यालया’ची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या सांगीतिक जीवनाच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय अभिजात रागदारी संगीताचे अध्ययन करणार्‍यांसाठी प्रचंड साहित्य निर्माण केले. तसेच त्यांनी ‘सुजान’ या नाममुद्रेने ढंगदार अशा ८००हून अधिक बंदिशींची रचना व रागांची निर्मितीही केली. त्यांनी संगीत नाटके लिहिली व प्राचीन ग्रंथांचे अनुवादही केले. ‘अभिनव गीत-मंजिरी’ (तीन भागांत) या पुस्तकांत त्यांच्या बंदिशी प्रकाशित झाल्या. ‘तान-संग्रह’ (भाग १-३), पं. भातखंडे क्रमिक पुस्तक-मालिका भाग १ ते ४ मध्ये असलेल्या ४५ रागांवर आधारित तानांचा संग्रह, ‘वर्णमाला’ या पुस्तकात दाक्षिणात्य संगीतातील ‘वर्णम’वर आधारित, हिंदुस्थानी आणि कर्नाटक रागांमध्ये संस्कृत भाषेत रचलेले वर्णम् आहेत.
त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थान येथील उच्च-माध्यमिक शाळांतील अभ्यासक्रम व परीक्षांसाठी ‘संगीत-शिक्षा’ नामक (तीन भागांत) पुस्तके लिहिली. लखनौ येथील भातखंडे संगीत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी ‘अभिनव संगीत शिक्षा’ (भाग १ व २) ही पुस्तके त्यांनी लिहिली. रातंजनकरांनी हिंदुस्थानी संगीतातील तालांची लक्षणगीते ‘ताल लक्षण-गीतसंग्रह’ नावाचे पुस्तकही लिहून प्रकाशित केले. ‘हिंदुस्थानी संगीत पद्धति की स्वरलिपि’ नावाचे हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिले व प्रकाशित केले. भारतातील विश्वविद्यालयांत संगीत विभागांच्या अभ्यासक्रमांसाठी मराठी व हिंदी भाषेत ‘संगीत परिभाषा विवेचन’ हे उपयुक्त पुस्तक त्यांनी लिहिले. त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्लीकरिता, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळासाठी पं. वि.ना. भातखंडे यांचे चरित्र लिहिले व त्या पुस्तकाचे भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये प्रकाशन झाले.
‘अ‍ॅस्थेटिक आस्पेक्ट्स ऑफ इंडियाज  म्युझिकल हेरिटेज’ हे पुस्तक म्हणजे रातंजनकरांच्या आयुष्यातील त्यांनी भारतीय संगीताचे प्रात्यक्षिक व शास्त्रीय घटकांवर लिहिलेले सर्व लेख व त्यांच्या एकूण सर्व व्याख्यानांचा संकल्पित संग्रह आहे. रातंजनकरांनी हिंदुस्थानी संगीताचे मूळ आधारग्रंथ उ.पं. व्यंकटमखी लिखित, ‘चतुर्दण्डिप्रकाशिका’ व पं. रामामात्त्य लिखित, ‘स्वर-मेलकलानिधि’ या दोन संस्कृत ग्रंथांचे हिंदी भाषांतर केले. पं.वि.ना.भातखंडे यांच्या ‘श्रीमल्लक्ष्यसंगीतम्’ या ग्रंथावर त्यांनी संस्कृतमध्ये भाष्य लिहून ‘लक्ष्य संगीतकार’ या नावाने ते प्रकाशित केले. ‘संगीत-रत्नाकर’ या ग्रंथातील  ‘स्वराध्याय’ व ‘रागाध्याय’ या प्रकरणांचे सिंहावलोकन त्यांनी इंग्रजीमध्ये केले. याव्यतिरिक्त कालिदास लिखित, ‘कुमार-संभव’ या महाकाव्याचे ‘शिवमंगलम्’ या नावाचे संगीत नाटक लिहिले व त्याचे निर्देशन केले.
त्याचप्रमाणे त्यांनी ‘गोवर्धन-उद्धार’ हे ब्रजभाषेत व ‘झांसी की रानी लक्ष्मीबाई’ हे हिंदीच्या ‘खडी बोली’ मध्ये अशी संगीत नाटके लिहिली व त्यांचे दिग्दर्शन केले. अखंड, नि:स्वार्थ संगीतसेवा व मौलिक योगदानासाठी केंद्र सरकारने १९५७ मध्ये आचार्य रातंजनकरजींना ‘पद्मभूषण’ या सन्माननीय पदवीने अलंकृत केले. ते प्रार्थना समाजाचे सदस्य होते.

प्रा. यशवंत महाले

रातंजनकर, श्रीकृष्ण नारायण