राव, उमेश
‘एअर इंडिया’च्या महाराजा प्रतीकाला दृश्यरूप देणारे चित्रकार उमेश राव यांचा जन्म मद्रास (चेन्नई) येथे झाला. ते १९३२ मध्ये मुंबईत स्थलांतरित झाले. ते १९३३ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या सेवेत रुजू झाले. व्ही.एन. आडारकर, रतन बात्रा हे त्यांचे ‘टाइम्स’मध्ये सहकारी होते आणि चार्ल्स मूरहाउस त्यांचे वरिष्ठ होते. राव १९३६ पासून जाहिरात क्षेत्रात आले.
काही संपादकांच्या सूचनांवरून ते व्यंगचित्रांकडे वळले. एअर इंडिया विमानसेवेच्या महाराजाचे बोधचिन्ह (मॅस्कॉट) उमेश राव यांच्या व्यंगचित्रकलेच्या रेखाटनातून साकारले गेले. एअर इंडियाचे कमर्शिअल डायरेक्टर बॉबी कूका यांची ही मूळ कल्पना. जे. वॉल्टर थॉम्प्सन या प्रसिद्ध जाहिरातसंस्थेत काम करणार्या उमेश राव यांनी महाराजाच्या कल्पनेला दृश्यरूप दिले.
बॉबी कूका टाटा एअरलाइन्ससाठी दर महिन्याला एक बुलेटिन प्रसिद्ध करीत. त्यासाठी उमेश राव व्यंगचित्रे काढीत असत. बाकदार नाक, भरघोस मिशा, लाल अंगरखा आणि डोक्याला फेटा असा हा आदबशीर, खानदानी महाराजा अल्पावधीतच विशिष्ट विमानसेवेचा प्रतिनिधी न राहता भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचाच एक भाग बनला. पॅरिसमधला प्रेमवीर, जपानमधला सुमो कुस्तीगीर, अमेरिकेतला रेड इंडियन अशा विविध भूमिकांमधला महाराजा पन्नासच्या दशकात एअर इंडियाच्या भित्तिचित्रांच्या माध्यमातून लोकप्रिय झाला. त्या वेळेस भारतीय जाहिरात क्षेत्रातली ही महत्त्वाची घटना होती. सुरुवातीची काही भित्तिचित्रे उमेश राव यांनी तयार केली होती. ही भित्तिचित्रे आता अभिजात चित्रकलेप्रमाणे संग्रहमूल्य असलेली कलेक्टर्स आयटेम बनली आहेत. उमेश राव यांची ओळख दृश्यसंकल्पनकार (व्हिज्युअलाइजर) आणि नर्मविनोदी, प्रसन्न शैलीचा इलस्ट्रेटर अशीच आहे.
- रंजन जोशी, दीपक घारे