Skip to main content
x

सासणे, भारत जगन्नाथ

     भारत सासणे यांचा जन्म जालना येथे झाला. अहमदनगरच्या कॉलेजातून बी.एस्सी. पदवी मिळवून ते शासकीय अधिकारी झाले. शालेय जीवनातच त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. दर्जेदार नियत-कालिकातून त्यांच्या आरंभीच्या कथा प्रसिद्ध झाल्या. ग्रामीण परिसरातील माणसे, त्यांच्या श्रद्धा, दैवते, वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ यांची सूक्ष्म वीण गुंफत ते मानवी मनोविश्वाची गूढ गुंतागुंत व्यक्त करतात. जगावेगळे अनुभवविश्व चित्रित करणारी त्यांची कथा दीर्घत्वाकडे झुकते.

     सासणे म्हणतात, “माणसाचा बौद्धिक एकटेपणा आणि त्याचं तुटलेपण याचं मला कुतूहलजनक आकर्षण वाटत आलं आहे. तालुक्यापलीकडचं जिणं मी पाहतो, तेव्हा जिण्याला अमर्याद मर्यादा दिसतात.”

    समकालीन कथेच्या प्रकृतीविषयी चर्चा करताना त्यांना जाणवते की कथा खोल, गंभीर व वास्तवाशी संलग्न न राहता बर्‍याचदा निरर्थक, रोगी, वर्गवारीजन्य व समाजजीवनापासून दूर झालेली दिसते. १९६० सालापर्यंत चांगल्या, सृजनशील कथाकारांनी जीवनातील काही भाग अस्पर्श्य मानला व पुनःपुन्हा समाजातल्या एका विशिष्ट वर्गावर, विशिष्ट प्रदेशावर, त्या प्रदेशातल्या अनैसर्गिक व दैन्या निर्मित दुःखावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ग्रामीण कथेला स्थान मिळविण्यासाठी भांडावे लागले. दलित कथेचा त्याच सुमारास उद्रेक झाला.

     “माझी कथा कोणत्याही वर्गवारीत बसत नाही असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा मला आनंद वाटतो. माझ्या कथेतील पात्रे अर्धी स्वप्नात व अर्धी वास्तवात वावरतात अशी टीका मी जेव्हा वाचली, तेव्हा मला आनंद झाला.

     ५० वर्षांनंतर जी.ए. इत्यादींच्या कथा जशा राहिल्या, तशा आपल्याही राहतील असा सासणे यांना विश्वास आहे. त्यांच्या मते, ‘माणसाची जटिलता कथेचं आव्हान असतं.’ ‘आयुष्याची छोटी गोष्ट’ (२०००) या संग्रहात ते नमूद करतात : ‘या माझ्या काही कथा माणसाच्या आणि त्याच्या आत्मशोधाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात.’ ‘चिरदाह’च्या निमित्ताने मी ‘दीर्घकथा’ या फॉर्मबद्दल काही तांत्रिक भूमिका मांडली होती. ‘अस्वस्थ’, ‘विस्तीर्ण रात्र’च्या निमित्तानं नातेसंबंधांबद्दल काही सूचन केले होते. जन्माधिष्ठित नातेसंबंधापेक्षा आयोजनजन्य नातेसंबंधांच्या यशस्वितेवर (आणि अयशस्वितेवर) माणसाचे मानसिक आणि लौकिकही समाधान अवलंबून असते.’

     ‘शुभवर्तमान’ (२००४) या संग्रहामध्ये सासणे म्हणतात, ‘अथक साधनेनंतर लेखक स्वतःची शैली सिद्ध करतो आणि सिद्धतेतून निर्मिती करीत राहतो.’

     शैलीत बंदिस्त न राहता, भारत सासणे सतत नवतेच्या शोधात व शैलीच्या प्रयोगात राहणे पसंत करतात. त्यांच्या लेखनप्रवासात ‘जॉन आणि अंजिरी पक्षी’ (१९८०), ‘कँप किंवा बाबीचे दुःख’ (१९८२), ‘लाल फुलांचे झाड’ (१९८४), ‘क्षितिजावरची रात्र’ (२०००) असे कथासंग्रह; ‘दूर तेथे दूर तेव्हा’ या दोन लघुकादंबर्‍यांचा संग्रह (२०००), ‘मरणरंग’ (१९९९), ‘नैनं दहति पावक:’ (१९९९) ही नाटके, तसेच लहान मुलांसाठी कादंबरी व बालनाटिकाही प्रकाशित झाल्या आहेत.

     - वि. ग. जोशी

सासणे, भारत जगन्नाथ