Skip to main content
x

सातवळेकर,माधव श्रीपाद

           माधव श्रीपाद सातवळेकर यांचा आधुनिक कलादृष्टीचे निष्णात चित्रकार, उत्तम प्रशासक व शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक होता. त्यांचा जन्म पाकिस्ता-नातील लाहोर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांच्या आयुष्यावर, वडील श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा, तसेच औंध संस्थानातील कलात्मक वातावरण, पाश्‍चात्त्य कलाजगताचे दर्शन व शिक्षण यांचाही परिणाम झाला. माधव सातवळेकरांकडे चित्रकलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून व आजोबांकडून आला. वडील मूळचे चित्रकार होते. पण त्यांच्या वेदाभ्यासामुळे पुढे ते ‘पंडित सातवळेकर’ म्हणून नावारूपाला आले. वयाच्या तिसर्‍या वर्षी माधव सातवळेकर आपल्या आई-वडिलांबरोबर सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानात आले. त्यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी हे विद्या व कला यांचे जाणकार होते. ते स्वत: चित्रकार आणि चित्रसंग्रहक होते. औंधच्या चित्रसंग्रहालयातील देश-विदेशांतील दर्जेदार व वैविध्यपूर्ण कलाकृती बघतच माधव सातवळेकरांची कलादृष्टी विकसित झाली.

           सातवळेकर सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १९३४ मध्ये दाखल झाले. तेव्हाचे प्रिन्सिपल ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी सातवळेकरांचे आरेखनावरील प्रभुत्व पाहून थेट चौथ्या वर्षाला प्रवेश दिला. १९३५ मध्ये त्यांना, जी.डी. आर्ट इन ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेन्टिंग ही पदविका मिळाली. या काळात ते ‘मेयो’ पदकासह अनेक पारितोषिकांचे मानकरी ठरले. त्यांनी १९३७ ते १९४० या काळात युरोपातील इटली, लंडन, पॅरिस येथे कलेचे उच्चशिक्षण घेतले.

           सातवळेकरांची युरोप वास्तव्याची दैनंदिनी १९३८ च्या ‘पुरुषार्थ’ मासिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली होती. त्यात त्यांनी केलेले कलेवरचे भाष्य आहे. दैनंदिनीतून त्यांची संवेदनक्षमता, विश्‍लेषकवृत्ती व भोवतालच्या अर्थकारणाचे भान विशेषत्वाने जाणवते. युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते १९४० मध्ये भारतात परतले.

           सुरुवातीच्या काळात सातवळेकरांनी ‘किर्लोस्कर’सारखी मासिके व पुस्तकांसाठी कथाचित्रे व मुखपृष्ठे केली. याशिवाय व्यक्तिचित्रांची व्यावसायिक कामे करण्यास सुरुवात केली. त्यांची, स्वत:साठी चित्रनिर्मितीही सुरू होती. हैद्राबादच्या कुसुम नाखरे यांच्याबरोबर १९४३ मध्ये त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर पतीच्या चित्रकार जगतात त्या उत्सुकतेने समरस झाल्या.

           युरोपातून परतल्यावर त्यांचे पहिले चित्रप्रदर्शन १९४५ मध्ये व दुसरे १९४७ मध्ये मुंबईत झाले, तर फक्त व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन १९५६ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत झाले. आयुष्यभरात त्यांची अंदाजे साठ ते सत्तर चित्रप्रदर्शने झाली. मुंबईतील वांद्रे येथील कलानगरात ते १९७६ मध्ये राहण्यास आले. त्यांचा स्टूडिओही तेथेच तळमजल्यावर होता.

           त्यांनी देश-परदेशात भरपूर भ्रमंती केली. आपल्या भ्रमंतीत ते प्रत्यक्ष जागेवर आवर्जून स्केचेस करीत व हा सराव त्यांनी आयुष्यभर केला. त्यांच्या चित्रनिर्मितीत मुख्यत्वे स्वानंदासाठी काढलेली व्यक्तिचित्रे, व्यावसायिक व्यक्तिचित्रे, मानवी रचनाचित्रे (फिगरेटिव्ह कॉम्पोझिशन), निसर्गचित्रे, युद्धचित्रे, नग्नाभ्यासचित्रे (न्यूड स्टडीज) दिसून येतात. त्यांत त्यांचा अभ्यास व परिपूर्णतेचा ध्यास लक्षात येतो. सातवळेकरांच्या चित्रांचे विषय व प्रेरणा मुख्यत्वे भारतातील ग्रमीण व लोक- जीवनाशी निगडित होत्या. उदा. पतंगवाला, कुंभार, पाणवठा, संत्र्याचा मळा, जुन्या वास्तू, गावातील एखाद्या गल्लीचे किंवा बाजाराचे दृश्य इत्यादी. यात मुख्यत्वे महाराष्ट्र, सौराष्ट्र, काठेवाडचा समावेश होता. याशिवाय त्यांनी विविध आविर्भावातील स्त्रियांची चित्रे रंगविली असून या प्रकारच्या चित्रांतून ते दृश्यात्मक सौंदर्य व्यक्त करतात. तसेच छाया-प्रकाश, आकार, पोत यांचा मनोहर खेळ अभिव्यक्त करतात. चित्रातील रंगसंगती उजळ अथवा तेजस्वी असते. आकार अधिक देखणे करणारी ‘निळी रेषा’ ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली. ‘मानवी रचनाचित्रां’मधील व्यक्तिरेखांवर पाश्‍चात्त्य चित्रकार गोगँ व मातीसचा प्रभाव दिसतो. चित्रांचे विषय भारतीय असले तरी शैली पाश्‍चात्त्यकलेचा आधुनिक दृष्टिकोन व्यक्त करणारी आहे. त्यांच्या रेखाचित्रणात अचूकता व लालित्य यांचा सुंदर मिलाफ दिसतो. स्वानंदासाठी त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे काढली. त्यांत वडील, आई, पत्नी यांना महत्त्वाचे स्थान होते. वडील जेव्हा त्यांच्या घरी येत, तेव्हा ते वडिलांचे निदान एक तरी रेखाटन (स्केच) करीत. पत्नीही काही वेळा चित्रांसाठी पोझ देत असे. ही चित्रे उत्तम व्यक्तिचित्रांचा नमुना आहेत.

           व्यावसायिक व्यक्तिचित्रणातही त्यांचा उत्तम नावलौकिक होता. चेहर्‍याबरोबर, हातांची ठेवण, बोटे यांतही साधर्म्य ठेवलेले असे. त्या व्यक्तीच्या वापरातील वस्तू, वस्त्रे, फर्निचर, तसेच एकूण व्यक्तिमत्त्व यांचा संदर्भ घेऊन ते अभ्यास करीत व मगच व्यक्तिचित्रणाची सुरुवात होई. व्यावसायिक व्यक्तिचित्रांपैकी म. गांधींचे (१९५०) नैरोबी येथे, एच.एच. कबाकांचे (१९५०) युगांडा येथे, राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद (१९५६) यांचे राष्ट्रपती भवनात, सभापती पु.ग. मावळणकर यांचे संसदेत, स्वामी विवेकानंद (१९५९) यांचे दिल्लीतील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, शं.वा.कि. (१९४१) व लक्ष्मणराव किर्लोस्कर (१९६२) यांचे किर्लोस्करवाडी येथे, मनोरमा साराभाई यांचे (१९७७) अहमदाबाद येथे, इत्यादी व्यक्तिचित्रे महत्त्वाची आहेत.

           व्यावसायिक कामात व सर्जनशील निर्मितीत त्यांनी स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. सर्जनशील निर्मितीत त्यांच्या अंत:प्रेरणा कधीही टोकाच्या प्रायोगिकतेकडे वळल्या नाहीत. तथापि, त्यांच्या  निर्मिताला एक विशिष्ट दर्जा अखेरपर्यंत राहिला.

           युरोपातून परतल्यावर तेथील शिक्षणाचा येथे काहीतरी उपयोग करण्याच्या हेतूने १९५४ मध्ये ‘इंडियन आर्ट इन्स्टिट्यूट’ या शैक्षणिक संस्थेची त्यांनी व बोरकर यांनी पुन: नव्याने उभारणी केली. ही संस्था मुंबईतील चर्निरोड रेल्वे स्थानकाजवळ आजही आहे. ते स्वतः तेथे शिकवीत. महाराष्ट्रातील कलाशिक्षणविषयक प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून १९६० मध्ये स्थापन झालेल्या ‘दि फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूट’ या संस्थेचे ते सलग दहा वर्षे अध्यक्ष होते.

           सातवळेकर १९६९ ते १९७५ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे कलासंचालक होते. त्यांच्या कारकिर्दीत कलाशिक्षणाच्या जर्मनीतील ‘बा’हाउस’च्या धर्तीवरील नवीन मूलभूत अभ्यासक्रमाची (फाउण्डेशन कोर्स) कार्यवाही करण्यात आली. राज्य कलाप्रदर्शनात व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे अशा कलांना महत्त्व देऊन बक्षिसे देण्याची प्रथा पुन: रूढ केली.

           वैयक्तिक जीवनात येणारी सुख-दु:खे, कटू, निराश क्षणांचा परिणाम त्यांच्या चित्रनिर्मितीवर कधीही झाला नाही. त्यांनी वैयक्तिक जीवन व कला हे दोन अलग कप्पे ठेवले होते. त्यांच्या मते, ‘चित्रांची निर्मिती प्रत्येकाच्या स्वभावानुसार होणार! जे काही व्यक्त करायचे आहे, ते आतून जाणवून झाले पाहिजे. केवळ फॅशन म्हणून एखादी शैली स्वीकारता कामा नये. चित्रातील शैली, इझम, तंत्र यांवर त्याचे कलामूल्य ठरू नये! आपल्याकडील शिक्षणात गणित व विज्ञान यांना अवास्तव महत्त्व आहे. अशा एकांगी विकासामुळे पुढील पिढी यांत्रिक बनण्याचा धोका आहे. याचा अंतिम परिणाम म्हणजे कलेबाबत लोक उदास व अनभिज्ञ राहतात. शेवटी त्याचे दृश्यफळ म्हणजे कलांचा र्‍हास, पर्यायाने मानवी जीवनातील संपन्नतेचा र्‍हास होय.’ चित्रकलेबद्दल मूलभूत, ठोस व सुस्पष्ट विचार त्यांनी व्याख्यानांद्वारे व लेखांद्वारे वेळोवेळी व्यक्त केले होते.

           ते स्पष्टवक्ते, शिस्तप्रिय, नीटनेटके, अत्यंत काटेकोर व पराकोटीचे वक्तशीर होते. वयाच्या एक्याण्णवाव्या वर्षापर्यंत त्यांनी सातत्याने चित्रनिर्मिती केली. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या जलप्रलयात त्यांच्याही स्टूडिओत पाणी शिरले. आयुष्यभराच्या निर्मितीची एका रात्रीत वाताहत झाली. उतारवयात हा धक्का जबरदस्त होता.

           जानेवारी २००६ मध्ये ते अहमदाबादला एन.आय.डी. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन) येथे संचालक पदावर असलेल्या विकास सातवळेकर या आपल्या मुलाकडे राहण्यास गेले. २६ जुलैच्या जलप्रलयाने खराब झालेल्या काही चित्रांमध्ये त्यांनी बारीकसारीक  सुधारणा व रिटचिंगचे काम सुरू केले होते. अल्पआजाराचे निमित्त होऊन तेथेच त्यांचे निधन झाले.

- साधना बहुळकर

सातवळेकर,माधव श्रीपाद