सावडिया, कनकराय सौभाग्यचंद
कनकराय सौभाग्यचंद्र सावडिया यांचा जन्म गुजरात राज्यातील कुटियाना गावी झाला. त्यांनी १९५२मध्ये औषधविक्रेता म्हणून कारकिर्द सुरू केली. अहिंसा, दया, सेवा अशी भारतीय संस्कृतीची मूल्ये त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. म्हणूनच त्यांनी मुक्या प्राण्यांचे संरक्षण आणि कल्याण साधण्याच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. गोहत्येविरुद्ध ते गेली १५ वर्षे अथक लढा देत आहेत. महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने कत्तलखाने आहेत आणि अवैधरीत्या रोज बऱ्याच गायींना मारले जाते त्यामुळे अशा गायींना वाचवण्यासाठी सावडिया यांनी २५ सप्टेंबर २००२ रोजी नागपूर येथे सुकृत निर्माण धर्मादाय संस्था स्थापन केली.
सावडिया आणि त्यांचे सहकारी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायींची सुटका पोलिसांच्या मदतीने करून त्यांनी १५ वर्षांत त्यांनी हजारो गायींचे प्राण वाचवले. गायींचे मांस वाहतूक करणारी अनेक वाहने पकडून ते मांस नष्ट करण्याचे कामही सावडियांनी केले . सुटका झालेल्या गायी पुन्हा कत्तलखान्याकडे जाऊ नयेत म्हणून त्यांचा न्यायालयीन ताबा घेणे, गुन्हेगारांविरुद्ध खटला भरणे हा न्यायालयीन लढादेखील सावडिया सातत्याने, चिकाटीने यशस्वीरीत्या करताना दिसतात. पुढील न्यायालयीन आदेश येईपर्यंत अशा गायींचा सांभाळ करण्याची जबाबदारी सावडिया पत्करतात. त्यांच्याच प्रेरणेने स्थापन झालेल्या गोशाळेत या गायी पाठवल्या जातात. आश्रयदाता म्हणून त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या गोशाळा रेंगेपार (जि. भंडारा), हळदा (जि. चंद्रपूर) आणि अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) येथे आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कत्तलखान्यामुळे, तसेच मांस विक्रीच्या दुकानांमुळे प्रदूषण वाढलेले दिसते तसेच सार्वजनिक आरोग्यास बाधा पोहचताना दिसते . याविरोधीही सावडीया यांनी सुकृत निर्माण धर्मादाय संस्थेमार्फत केलेल्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने कडक कार्यवाही करण्याचे आदेश शासनास दिले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (१९७६) नुसार गाय आणि गायी वर्गाच्या १ वर्ष वयाच्या आतील वासराची कत्तल करण्यास बंदी आहे. मात्र १ ते ३ वर्षे वयोगटातील नर वासरे शेती किंवा प्रजननासाठी उपयुक्त नसल्याने कत्तलीकरता योग्य अशी पळवाट शोधून त्यांची सर्रास कत्तल केली जाते. तसेच १५ वर्षे वयानंतरचे बैल, वळू निकामी, निरुपयोगी समजून त्यांची हत्या केली जाते, परंतु संपूर्ण गो-वंश (जन्मापासून मृत्यूपर्यंत, सर्व वयोगटांतील नर व मादी दोन्ही प्रकारांतील जनावरे) गोमूत्र व शेणाद्वारे आयुर्वेदिक औषधनिर्मिती, सेंद्रिय शेती, ऊर्जानिर्मिती (गोबर गॅस), कीटकनाशक निर्मिती अशा योगदानातून मानवकल्याण, शेती सुधारणा व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्र शासनाने १९९६मध्ये संपूर्ण गोवंश हत्याबंदीचे विधेयक पारित करून मंजुरीसाठी केंद्र शासनास पाठवले. हे सावडिया व त्यांच्या संस्थेचे मोठे यश मानले पाहिजे. दुर्दैवाने अजूनपर्यंत या विधेयकास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाली नाही. त्यासाठीही सावडिया चिकाटीने पाठपुरावा करत आहेत.
उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे विदर्भ औषध उत्पादक संघटना नागपूर शाखेचे अध्यक्ष (१९८७ -९५), भारतीय औषध उत्पादक संघटना मुंबईच्या कार्यकारी समितीचे सभासद (१९९६-९९), नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक (१९९०-९४), फेडरेशन ऑफ इन्व्हेस्टर्स, ट्रेडर्स अॅन्ड इंडस्ट्रियालिस्ट नागपूरचे उपाध्यक्ष इ. उद्योग संघटनेतील उच्चपदांचा सन्मान सावडिया यांना मिळाला आहे. औषधनिर्मिती उद्योगातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावडिया यांना उद्योगगौरव पुरस्कार (१९९३), राष्ट्रीय उद्योग पुरस्कार (१९९४) आणि भारतीय औषधनिर्मिती संघटना नागपूर शाखेचा पुरस्कार (२००१) इ. पुरस्कार प्राप्त झाले. गो-संरक्षण आणि गो-संवर्धन क्षेत्रात काम करत असताना सावडियांनी प्राणी क्रूरता निवारण समिती, नागपूर शाखेचे अध्यक्ष, पशुकल्याण कायद्यांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमध्ये पशुकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट, नागपूरचे उपाध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत. सावडिया यांना क्रिएटीव्ह स्पिरिच्युअल फोर्स (२०००), श्री उवसग्गहरं पार्श्वतीर्थ, नगपुरा, छत्तीसगढ - श्री जिनशासन दीपक सन्मान (२००५), भारतीय जैन संघटना, नागपूर शाखा शांतिभूषण पुरस्कार (२००६), जैन समाज, कलकत्ता सोरठ जैन समाजरत्न पुरस्कार (२००८), महात्मा फुले भारतीय प्रतिभा संशोधन संस्था नागपूर यांचा महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय सन्मान (२००९), विश्वमंगल गोग्राम यात्रा सन्मानपत्र (२०१०) नागपूर पुरस्कार इ. पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आयुर्वेद चिकित्सा आणि सेंद्रिय शेती या दोन्ही पद्धतींमध्ये गायीपासून मिळणारे दूध, दही, तूप, गोमूत्र व गोमय (शेण) हे पदार्थ अत्यावश्यक घटक आहेत. गोमूत्र व गोमय, दूध न देणारी गाय तसेच बैल, वळू, वृद्ध गायी, लहान वासरे यापासूनही उपलब्ध होते. त्यामुळे संपूर्ण गोवंश हत्या थांबवणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने सावडिया यांचे गोहत्याविरोधी कार्य निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शन ठरणारे आहे.
- डॉ. विजय अनंत तोरो