Skip to main content
x

शिंदे, येताळा कृष्णा

       डॉ. येताळा कृष्णा शिंदे हे डॉ. वाय. के. शिंदे म्हणून ओळखले जातात. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पोसेवाडी हे त्यांचे जन्मगाव. पोसेवाडी गावात त्यांचे एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईस गेले. तेथे त्यांनी शिक्षण पूर्ण करून ठाणे येथील कर्मवीर माध्यमिक विद्यालयात शिक्षकी व्यवसायास सुरुवात केली. पण त्यांना अध्यापनापेक्षा संशोधनात अधिक रस होता.

      त्या दृष्टीने शिंदे यांचा संशोधन प्रवास सुरू झाला. १९८३ मध्ये मुंबई विद्यापीठातून शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी पीएच. डी पदवी मिळविली. नंतर काही काळ कागल, विटा येथील शिक्षण शास्त्र महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. नंतरच्या काळात मुंबई विद्यापीठात संशोधन अधिकारी म्हणून ते होते.

       १९८५ मध्ये त्यांनी ‘एज्युकेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट, पोसेवाडी’ या संस्थेची स्थापना केली. संशोधनाचे कार्य चालू राहिले. १९९२ मध्ये त्यांनी व्यक्तिमत्त्व मापन कसोट्यांची निर्मिती केली. १९९६ ते २००५ ह्या काळात महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन सल्लागार परिषद-पुणे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व्यासपीठ-औरंगाबाद, शैक्षणिक चिंतन परिषद-कराड, गुरुवर्य चिपळूणकर प्रबोधिनी-औरंगाबाद अशा विविध परिषदांतून सल्लागार म्हणून काम केले.

      संशोधन क्षेत्रातील अनुभवातून व्यक्तिमत्त्व संजीवनी, शिक्षक संजीवनी, पालक संजीवनी अशी उपयुक्त पुस्तके लिहिली. शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, डॉ. जे. पी. नाईक गुणवत्ता संवर्धन राज्य पुरस्कार, महाराष्ट्र मानसशास्त्र पुरस्कार, समाज प्रबोधन राज्य पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा कर्मवीर भाऊराव राज्य पुरस्कार या पुरस्कारांनी शिंदे यांचा गौरव झाला. शिक्षण संशोधन संस्थेमध्ये ते संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

- विजय बक्षी

शिंदे, येताळा कृष्णा