Skip to main content
x

शिरोडकर, विठ्ठल नागेश

     डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर यांचा जन्म गोमंतक म्हणजेच गोव्यातील शिरोडा गावातील एका सधन कुटुंबात झाला. डॉ. शिरोडकरांनी सरस्वतीची उपासना उत्तम रीतीने केली. त्या काळी सधन कुटुंबातील फार थोडी मुले शिक्षणाच्या मागे लागत होती. डॉक्टरांचे शालेय शिक्षण हुबळी व पुणे येथे झाले. वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या प्रसिद्ध ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाले. त्यांचा आवडीचा विषय होता स्त्री-रोगचिकित्सा. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच विषयात १९२७ साली एम.डी. केले. तो काळ असा होता, की कोणतीही परदेशी, विशेषत: इंग्लंड येथील पदवी असल्याशिवाय तुमच्या हुशारीला मान मिळत नसे; तुमची विद्वत्ता लोकांच्या लक्षात यायची नाही. वैद्यकीय क्षेत्रात तर हे प्रकर्षाने जाणवायचे. डॉ. शिरोडकर आणखी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. १९३१ साली ते एफ.आर.सी.एस. झाले. वास्तविक त्यांना इंग्लंडमध्येच राहण्यासाठी भरपूर वाव होता; पण त्या काळच्या पदवीधरांप्रमाणे डॉ. शिरोडकरांचाही देशाभिमान जाज्वल्य होता. विषयातील सर्व अनुभव घेऊन डॉक्टर मायदेशी परतले.

      परत आल्यावर त्यांनी ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्त्री-रोगचिकित्साशास्त्राचे प्राध्यापक व ज.जी. रुग्णालयामधील मोटलीबाई रुग्णालयाचे मानद स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणून १९३५ ते १९५५ सालापर्यंत काम केले. या २० वर्षांच्या काळात त्यांनी रुग्णालयामध्ये येणाऱ्या स्त्री-रुग्णांची आस्थेने देखभाल केली. त्यामुळे सबंध भारतातच नव्हे, तर इतर देशांतही मोटलीबाई रुग्णालयाचे नाव झाले. त्यांच्या स्वत:च्या नर्सिंग होममध्ये, तसेच ज.जी. रुग्णालयामध्ये येणाऱ्या असंख्य गरीब-श्रीमंत स्त्री-रुग्णांची त्यांनी सेवा केली. १९३५ साली त्यांनी डॉ.जी.एम. फडके यांच्याबरोबर माटुंग्याला ‘कॉलनी नर्सिंग होम’ नावाचे खाजगी रुग्णालय चालू केले. १९३६ साली पत्नी सुधासमवेत त्यांनी ‘डॉ. शिरोडकर मेमोरियल रिसर्च फाउण्डेशन’ चालू केले.

     या प्रदीर्घ काळात डॉक्टरांनी खूप संशोधन केले. अनेक गर्भवती स्त्रियांच्या होणाऱ्या गर्भपाताविषयी त्यांनी विचार व संशोधन केले. गर्भपाताचे नक्की कारण कोणालाच कळत नव्हते. डॉक्टरांच्या लक्षात आले की काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेजवळचे स्नायू कमकुवत असतात. गर्भाचे वजन जसे वाढू लागते, तसे या स्नायूंना ते पेलता येत नाही व गर्भपात होतो. याला उपाय म्हणून त्यांनी ग्रीवेची शक्ती वाढवण्यासाठी ग्रीवेच्या स्नायूंना टाका घालून सशक्त आधार दिला. यालाच सुप्रसिद्ध ‘शिरोडकर स्टिच’ म्हणतात. यामुळे या स्त्रियांचे गरोदरपण पूर्ण दिवसांचे होऊन प्रसूती पूर्णकाळाची झाली. प्रसूतीच्या वेळी तो टाका कापला जातो. अशा तऱ्हेने या स्त्रियांची अपत्यइच्छा पूर्ण झाली. हा ‘एक टाका सुखाचा’ ठरला.

      १९५६ सालची गोष्ट. त्या काळी भारतीय डॉक्टर्सची जगात विशेष प्रसिद्धी नव्हती. किंबहुना भारतीय डॉक्टरांचे खास स्वत:चे संशोधन असू शकेल यावर पाश्चात्त्यांचा विश्वास नव्हता, तशी त्यांची मनोधारणाही नव्हती. अमेरिकेतील बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियांचा अभ्यास करणाऱ्या निरनिराळ्या देशांतील डॉक्टरांसाठी एक शैक्षणिक कार्यशाळा ठेवली होती. त्यात वॉशिंग्टन येथील सुप्रसिद्ध स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. रॉबर्ट बार्टर व्याख्यान देत होते. त्या वेळी त्यांनी ‘गर्भावस्थेचे विकार’ या विषयाची एक पारदर्शिका दाखवली. ‘‘या अवस्थेमध्ये आपण काहीच साहाय्य करू शकत नाही,’’ असे सांगितले. या विद्यार्थ्यांमध्ये एक भारतीय डॉक्टर, सनत जोशी होता. त्याने उठून सांगितले, ‘‘ही परिस्थिती भारतामध्ये तरी खरी नाही. डॉ. शिरोडकरांनी शोधून काढलेल्या शस्त्रक्रियेने अशा तऱ्हेने होणारे गर्भपात टाळून पूर्ण दिवसांची प्रसूती होते.’’ सर्वांची या विषयाची जिज्ञासा जागृत झाली. या प्रसंगाने या शस्त्रक्रियेच्या प्रसिद्धीला महत्त्वाचे वळण मिळाले.

     डॉ. रॉबर्ट यांनी लगेचच या क्रांतिकारी संशोधनाची अधिक माहिती घेण्यासाठी डॉ. शिरोडकरांशी संपर्क साधला. अशा प्रकारे त्यांच्या संशोधनाला जगभर प्रसिद्धी मिळाली. या संशोधनाचे मूळ कारण म्हणजे डॉ. शिरोडकरांचा संवेदनशील स्वभाव. असफल गर्भधारणेमुळे खिन्न व निराश होणाऱ्या स्त्रियांचे चेहरे पाहून डॉक्टरांना अस्वस्थ वाटे. सतत संशोधन व मनन करून अथक प्रयत्नांनी त्यांना ही शस्त्रक्रिया सुचली. या स्त्रियांची पूर्ण दिवसांनी झालेली प्रसूती बघून डॉक्टरांना मनस्वी समाधान वाटले.

     वैद्यकीय जगतामध्ये या अभिनव आणि अतिशय परिणामकारक शस्त्रक्रियेला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. विशेष बाब म्हणजे, स्त्रीरोगचिकित्सेच्या ग्रंथांमध्ये व क्रमिक पुस्तकात या शस्त्रक्रियेला ‘शिरोडकर शस्त्रक्रिया’ असेच नाव मिळाले. या शस्त्रक्रियेची प्रात्यक्षिके द्यायला आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या अधिवेशनाची त्यांना आमंत्रणे येऊ लागली. अमेरिकेतील स्त्री-रोगतज्ज्ञांनी त्यांच्याकडून ही अभिनव शस्त्रक्रिया शिकून घेतली व १९५५ सालापासून ही शस्त्रक्रिया अमेरिकेत चालू झाली.

     गर्भाशयाच्या दोषांवर त्यांनी अनेक निबंध लिहिले. ते भारतातील व परदेशातील वैद्यकीय मासिकांत छापून आले. गर्भाशय या विषयात जगातील ख्यातनाम तज्ज्ञांत त्यांची गणना होऊ लागली. गर्भाशयाच्या स्खलनाच्या (प्रोलॅप्स) शस्त्रक्रियेत त्यांनी मांडीच्या स्नायूच्या आवरणाचा उपयोग केला. या शस्त्रक्रियेत आवरण काढून त्याचा गर्भाशय वर उचलण्यासाठी दोरीसारखा उपयोग केला. गर्भाशयाच्या मागच्या भागातून हा ओवून मागच्या त्रिकास्थी (सेक्रम) या पाठीच्या मणक्याच्या अस्थिबंधनात (लिगामेन्ट) दुसरे टोक बांधून गर्भाशय उचलले व बांधून ठेवले. त्यामुळे गर्भाशय खाली येऊन होणारा त्रास बंद झाला. वंध्यत्वाच्या चाचण्यांमध्ये व उपायांमध्ये बीजवाहिन्या बंद असल्यास पोटास छेद देऊन शस्त्रक्रिया करावी लागते. त्या वेळी बीजवाहिनी नक्की कोठे बंद झाली आहे हे बघण्यासाठी बीजवाहिनीत डाय भरून तपासतात. या वेळी गर्भाशयाच्या ग्रीवेतून डाय बाहेर पडू नये म्हणून गर्भाशयास चिमटा लावतात-युटेराइन क्लॅम्प-तो डॉ. शिरोडकरांनी तयार केला. बंद झालेली बीजनलिका कापून पुन: तिचे गर्भाशयात रोपण करावे लागते. त्यासाठी गर्भाशयाला छिद्र पाडण्यासाठी ‘रीमर’ नावाचे उपकरण त्यांनी तयार केले व ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. कृत्रिम योनिमार्ग तयार करण्यासाठी त्यांनी बृहदांत्राच्या (कोलन) शेवटच्या भागाचे अवरोपण केले. पण ही शस्त्रक्रिया त्या वेळी यशस्वी झाली नाही.

     १९६० साली डॉ.शिरोडकरांनी ‘कॉन्ट्रिब्यूशन टू ऑब्स्टेटिक्स अ‍ॅण्ड गायनॅकोलॉजी’ हे पुस्तक लिहिले. यात त्यांनी गर्भाशयाच्या रोगांविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे.

     १९६२ साली डॉ.शिरोडकरांना एफ.आर.सी.ओ.जी. हा बहुमान मिळाला. हा बहुमान विशेष संशोधन करणाऱ्या स्त्री-रोगतज्ज्ञांनाच देण्यात येतो. हा बहुमान मिळवणारे डॉ.शिरोडकर हे पहिलेच भारतीय सन्मान्य सभासद. ‘‘शिरोडकरांनी हा बहुमान स्वीकारून आमच्या संस्थेवर अनुग्रह केला,’’ असे उद्गार त्या संस्थेच्या अध्यक्षांनी काढले.

     डॉ. शिरोडकरांनी कुटुंबनियोजनासाठी अंडनलिकेवरील (फॅलोपिन ट्यूब) केलेल्या शस्त्रक्रियेची चित्रफीत जगभर दाखवली गेली. डॉ.शिरोडकर कुटुंबनियोजनासाठी स्त्रियांवर शस्त्रक्रिया करू लागले. प्रसूतीनंतर तिसऱ्या दिवशी ही शस्त्रक्रिया करत असत. म्हणजे आपोआप स्त्रीला विश्रांती मिळत असे. पोटावरील त्वचेला छेद देऊन, बीजवाहिनीपर्यंत पोहोचून बीजवाहिन्या मध्येच कापायच्या. त्यांची दोन टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेला करून टाके मारून बंद करायची, म्हणजे शुक्राणू व स्त्री-बीज यांचे मिलन होत नाही व गर्भ राहत नाही.

     शस्त्रक्रियेच्या वेळी त्यांचे हात इतके सफाईदारपणे व नाजूकपणे चालत, की विद्यार्थी व इतर डॉक्टर्स ती बघण्यात रंगून जायचे. त्यांच्या हातातील या कौशल्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे हात कलाकाराचे होते. व्हायोलीन वाजवणे असो वा चित्रकला असो, त्यांच्या हातून उत्कृष्ट आविष्कार व्हायचा. ते गोल्फही उत्तम खेळायचे. त्या वेळची त्यांची पद्धत, खेळातील नजाकत बघण्यासारखी असे.

     डॉ. शिरोडकर मराठी विज्ञान परिषदेचे आजीव सभासद होते. १९६७ साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते. परिवार नियोजनाच्या कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. भारत सरकारने १९७१ साली त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान केला.

डॉ. शशिकांत प्रधान

शिरोडकर, विठ्ठल नागेश