Skip to main content
x

सरसर, मुकुंद एम.

    १९९७ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन रक्षक’ या मोहिमेमध्ये मुकुंद सरसर सहभागी झाले होते. त्यावेळी ते सेकंड लेफ्टनंट या पदावर येते. १९ ऑगस्ट १९९७ रोजी श्रीनगर जिल्ह्यातील बरसू गावात एक शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी अचानक अडीचशे मीटर अंतरावरच्या दोन घरांमधून स्वयंचलित बंदुकांचा अंदाधुंद गोळीबार होऊ लागला. एक क्षणही वाया न घालवता मुकुंद सरसर एका घराच्या दिशेने सरपटत गेले. त्या घराच्या खिडकीतून त्यांनी हातबाँब आत फेकला. समोरून होत असलेल्या गोळीबाराची त्यांनी पर्वा केली नाही.

     घरात फेकलेला हातबाँब फुटून एक अतिरेकी जखमी झाला व तो पळून जाऊ लागला. तेव्हा सरसर यांनी त्याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारले. तेथे असणार्‍या अन्य दोन अतिरेक्यांवरही अचूक गोळीबार करून त्यांनाही सरसर यांनी ठार केले.

     या कारवाईमध्ये तीन रायफल्स व दारूगोळा हस्तगत करण्यात आला. मुकुंद सरसर यांनी अंदाधुंद गोळीबारामध्ये स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सैन्याचे जे नेतृत्व केले त्यासाठी त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.

- रूपाली गोवंडे

सरसर, मुकुंद एम.