Skip to main content
x

तळवलकर, सुरेश दत्तात्रेय

ख्याल गायन, वाद्यसंगीत, कथक नृत्य यांना साथसंगत आणि एकल तबलावादन या तबलावादनाच्या चार दालनांमध्ये स्वत:चा एक वेगळा आणि स्वतंत्र असा ठसा निर्माण करणारे पंडित सुरेश दत्तात्रेय तळवलकर हे बहुधा एकमेव मराठी कलाकार असावेत. सुरेश यांचे पिताजी दत्तात्रेय ऊर्फ अण्णा तळवलकर यांनी सुरेश यांना तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण देऊन पंडित पंढरीनाथ नागेशकर यांच्याकडे पुढील शिक्षणाकरिता सुपूर्द केले. नागेशकर गुरुजींनी पायाभूत शिक्षणापासून प्रगत शिक्षणापर्यंत सखोल असे शिक्षण सुरेश यांना दिले. या शिक्षणामुळे आणि विशेषत: लखनौ, फरूखाबाद या घराण्यांची विद्या त्यांना प्राप्त झाली.

सूक्ष्म लयकारीविषयी गोडी असल्यामुळे कर्नाटक संगीतातील लयशास्त्राचे गुरू, मृदंगवादक पंडित रामनाड ईश्वरन यांच्याकडे सुरेश तळवलकरांनी दाक्षिणात्य लयकारीचे शिक्षण घेतले आणि ते आत्मसात केले. ‘अत्यंत अवघड लयकारी प्रस्तुत करीत असताना, ती सहजतेने कशी करावी हा संस्कार पंडित ईश्वरन यांनीच आपल्यात रुजवला’, अशी कबुली ते स्वत:च देतात. ताल-सौंदर्याचा आविष्कार पाश्चात्त्य वाद्यात आणि विदेशी संगीतातही व्हावा किंवा कसा करावा यासाठी सुरेश तळवलकर विदेशी संगीतकारांना जे मार्गदर्शन करीत असतात, त्याचा गुरुमंत्रही त्यांना ईश्वरन यांच्याकडून प्राप्त झालेल्या लयशास्त्राच्या अध्ययनातून मिळाला आहे, असे ते मानतात.

आध्यात्मिक वृत्तीचे तबला गुरू पंडित विनायकराव घांग्रेकर यांच्या वैचारिक प्रभावामुळे सुरेश तळवलकरांना तबल्याचा रियाझ ही तबल्याची अक्षरसाधनाच असे वाटू लागले. पंडित गजाननराव जोशी यांना ते गुरुस्थानी मानले . मूलत: गतिमान असलेल्या लयीचे स्थिरस्वरूप कसे असते याची जाणीव आणि अनुभूती गजाननबुवांमुळे प्राप्त झाली, असे ते कृतज्ञतापूर्वक मानतात. पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या सहवासातूनही त्यांना रागसंगीत आणि लयतालाचे ज्ञान प्राप्त झाले असल्याने सुरेश त्यांनाही गुरुस्थानी मानतात.

लयशास्त्राचे सुरेश तळवलकरांनी सखोल अध्ययन केले आणि आपल्या वादनात ते सूक्ष्म लयकारीचे प्रयोग करू लागले. अशा प्रकारच्या वादनशैलीला ‘लघुमात्राकालयुक्त’ वादन असेही म्हणतात. या प्रकारचे वादन सातत्याने करून सुरेश तळवलकरांनी ते लोकप्रियही केले .

स्वतंत्र तबलावादन प्रस्तुत करणारी एक नवी विचार- शैली तळवलकरांनी निर्माण केली . तबल्याचा लोकप्रिय ताल ‘त्रिताल’ यामध्येच तबल्याची विद्या प्रामुख्याने निर्माण झाली . बहुसंख्य तबलावादक हे स्वतंत्र वादन त्रितालातच करतात. आपल्या विद्यार्थ्यांनाही ते त्रितालाचीच सखोल अशी तालीम देत असतात. परंतु गेली कित्येक वर्षे सुरेश तळवलकर रूपक, झपताल, आडाचौताल इत्यादी त्रितालेतर तालांत आपले एकल तबलावादन जाणीवपूर्वक करीत आहेत. एकल वादनात कलापूर्ण, तसेच विद्वत्तापूर्ण असा धिम्या लयीतील पेशकार प्रस्तुत करणे ही त्यांची खासियत आहे. यानंतर ते स्वत: बांधलेले कायदे आणि चलने पेश करतात.

तळवलकर यांची आणखी एक खासियत म्हणजे विविध मात्राकालांच्या विरामांच्या (दम) तिहाई, चक्रदार बंदिशींचे विविध प्रकार ते तडफेने वाजवितात. पूर्वांगातील तबला तळवलकर दिल्ली शैलीने वाजवितात, तर उत्तरांगातील त्यांचे तबलावादन हे पूरब आणि पखावजी अंगाचे असते. गवई जसा गाण्याकरिता साथीला तानपुरावादक घेत असतो, त्याचप्रमाणे  तळवलकरसुद्धा आपल्या एकल वादनात एक किंवा दोन शिष्य साहाय्यक वादक म्हणून घेत असतात.

सर्वसाधारणपणे तबलावादनात लेहर्‍याकरिता हार्मोनिअम किंवा सारंगीची मदत घेतली जाते, पण तळवलकर आपल्या एकलवादनात लेहर्‍याची बंदिश प्रस्तुत करण्याकरिता प्रत्यक्ष गाण्याची मदत घेतात. या त्यांच्या अभिनव प्रयोगामुळे त्यांचे तबलावादन गाण्याच्या अधिक जवळ येते, जे श्रोत्यांना भावते.

सुरेश तळवलकरांचे गाण्यावर प्रेम आहे आणि गायनाच्या सर्व साथी ते डोळसपणे आणि एकाग्रतेने करीत असल्याने गाण्याच्या शेकडो बंदिशी त्यांना पाठ आहेत. यामुळे त्यांची गायनाची साथसंगत ही सुंदर तर असतेच; पण त्यांच्या साथीमुळे गवय्याचे गाणे रंगते. गजाननबुवांसारख्या कसलेल्या गवय्याबरोबर वर्षानुवर्षे साथ करता करता तळवलकर यांनी गजाननबुवांची गायकीच अत्यंत बारकाईने समजून घेतली. जी गोष्ट गजाननबुवांची, तीच गोष्ट पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, पंडित रामभाऊ मराठे, उस्ताद खादिम हुसेन, पंडित उल्हास कशाळकर आणि अन्य गायकांची. गायकांच्या गायकीचा अभ्यास करून ग्वाल्हेर गायकीकरिता ‘तिलवाडा-झूमरा’ या तालांचा ठेका आणि ठेकाभरी कशी असावी किंवा जयपूर-अत्रौलीच्या गायकीकरिता धिम्या त्रितालाचा ठेका कसा वाजवावा यांचा अभ्यास करून सुरेश तळवलकरांनी ख्याल गायकीकरिता तबल्याच्या साथसंगतीचे नवे तंत्रच विकसित केले आहे.

कथक नृत्यकलेतील बंदिशींचा आणि त्यांतील लयकारीचा सखोल अभ्यास केला असल्यामुळे त्यांची कथक नृत्याची साथ ही अत्यंत समर्पक आणि उत्स्फूर्त असते. कथक नृत्यप्रकारात खानदानी तबल्याशी नाते सांगणार्‍या लयकारी आणि रियाझाची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन कथक नृत्याच्या विद्यार्थ्यांकरिता तळवलकर यांनी विविध प्रकारच्या रचना, शब्दबंध, छंद, त्यांच्या विस्ताराचे मार्ग, त्यांतील गणित आणि लयकारी यांची निर्मिती केली असून त्यांच्या साहाय्याने कथकच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत असतात. पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर येथील कथकच्या विद्यार्थ्यांना त्यांनी हा विचार आणि विविध रचना शिकवल्या असून ते त्यांच्याकडून कठोर रियाझ करून घेत असतात. परिणामत: कसदार, सशक्त, कलात्मक आणि विचारप्रगल्भ अशा लयकारीयुक्त कथकचा एक वेगळाच आणि आकर्षक आविष्कार आज आपल्याला त्यांच्या विद्यार्थ्यांकडून पाहायला आणि ऐकायला मिळतो.

वाद्यसंगीताची साथ याविषयी सुरेश तळवलकरांनी केलेला विचार इतका परिपूर्ण आहे, की कुठल्याही वादक किंवा नृत्यकलाकाराची ते अत्यंत सक्षमतेने साथ करू शकतात. समर्पक आणि परिणामकारक साथसंगत होण्याकरिता, आपल्या शिष्यांसाठी त्यांनी अनुरूप छंद बांधले, चलने बांधली, त्यांचे पलटे बांधले आणि त्या रचना कलापूर्ण पद्धतीने संपवणार्‍या विविध प्रकारच्या ‘तिहाई’सुद्धा बांधल्या. हा सर्व तपशील ते शिष्यांकडून बसवून घेतात. त्यामुळे त्यांचे शिष्य विजय घाटे,  रामदास पळसुले आदी प्रभावीपणे साथ करताना आपण पाहतो.

कलाकार हा ज्ञानग्रहण आणि कौशल्यप्राप्तीच्या प्रवासात विकसित आणि समृद्ध व्हायला लागला की त्याला मनापासून असे वाटायला सुरुवात होत असावी, की आपले ज्ञान आपण आणखी कोणाला द्यावे का? अशा प्रकारची जाणीव तळवलकरांना तरुणपणीच झाली आणि त्यांनी ‘तबला-विद्या-ज्ञानाच्या’ प्रशिक्षणाचा वसाच हाती घेतला. तळवलकर गुरु-शिष्य परंपरेनुसार निवडक शिष्यांना तबला शिकवीत असतात. संपूर्ण भारतात त्यांचे शंभरच्या वर शिष्य पूर्णवेळ तबला-वादक म्हणून व्यवसाय करीत आहेत.

तबला-विद्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सुरेश तळवलकर कार्यशाळा पद्धतीने (वर्कशॉप्स) तबला शिकवीत असतात आणि अशा या कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना तबल्याची विद्या दिली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कार्यशाळांच्या माध्यमातून भारतभर तबला-विद्येचे वर्षानुवर्षे शिक्षण प्रदान करणारे सुरेश तळवलकर हे एकमेव कलाकार आहेत. त्यामुळे ते एक चालते-बोलते विद्यापीठच झाले आहेत.

तबल्याचे शिक्षण-प्रशिक्षण कसे व्हावे, या विषयाच्या विविध उपांगांमध्येे संशोधन व्हावे आणि विविध तज्ज्ञ, विचारवंतांचे परिसंवाद व्हावेत या विचाराने सुरेश तळवलकर झपाटलेलेच असतात. एस.आर.ए. कोलकाता, पुणे विद्यापीठ, संगीत नाटक अकादमी यांच्या साहाय्याने तळवलकर यांनी अत्यंत प्रभावकारक, यशस्वी परिसंवाद आयोजित केले आहेत.

सुरेश तळवलकरांकडून गुरु-शिष्य पद्धतीने शिक्षण घेऊन व्यावसायिक कलाकार म्हणून लौकिक पावलेले कलाकार पुढीलप्रमाणे आहेत : विजय घाटे, रामदास पळसुले, सुप्रीत देशपांडे, जावेद, मुकुल डोंगरे (पाश्चात्त्य ड्रम), चारुदत्त फडके, राजप्रसाद धर्माधिकारी, त्यांचा मुलगा आणि शिष्य सत्यजित तळवलकर, शमा भाटे (कथक) आदी.

राष्ट्रीय-राज्यस्तरीय, तसेच विविध सांस्कृतिक संस्थांतर्फे पंडित सुरेश तळवलकरांना अनेक पुरस्कार व मानपत्रे प्राप्त झाली आहेत. यांतील ‘तालयोगी’ पुरस्कार पू. शंकराचार्यांच्या हस्ते (२००१); ‘त्यागराज’ पुरस्कार, नादब्रह्म, चेंबूर,  (२००२); ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार(२००४); ‘पंडित पलुसकर’ पुरस्कार, गांधर्व महाविद्यालय, पुणे  (२००४); ‘श्री. वसंतराव नाईक’ पुरस्कार, महाराष्ट्र शासन (२००५); मानपत्र : अभिनव कला समाज, इंदूर (२००५); ‘जायंट्स इंटरनॅशनल’ पुरस्कार (२००७) ; ‘आयटीसी-एसआरए’ पुरस्कार, ‘स्वर साधना रत्न’ पुरस्कार (२००८) हे निवडक पुरस्कार आहेत.२०१३ साली तळवलकर यांनी भारत सरकारने पदमश्री सन्मानाने गौरविले आहे.

सुधीर माईणकर  / आर्या जोशी 

तळवलकर, सुरेश दत्तात्रेय