Skip to main content
x

त्रिंदाद, अँटोनिओ झेविएर

चित्रकार

           कॅथलिक ख्रिश्‍चन धर्मश्रद्धा जपत त्या विषयावर भारतीयत्वाचा आविष्कार करीत चित्रनिर्मिती करणार्‍या स्त्री-चित्रकार अँजेला अँटोनिओ त्रिंदाद या भारतीय कलाजगतास काहीशा अज्ञातच आहेत. त्यांचे वडील ए.एक्स. त्रिंदाद हे अत्यंत नावाजलेले व्यक्तिचित्रकार होते. त्यांच्या आईचे नाव फ्लोरंटिना. स्वत: चित्रकार असूनही त्रिंदाद यांची इच्छा आपल्या कोणत्याही अपत्याने चित्र-शिल्पकलेचे शिक्षण घेऊ नये अशी होती. त्यानुसार त्यांनी आपल्या दोन्ही थोरल्या मुलांना कलाशिक्षण घेण्यापासून परावृत्त केले. पण अँजेलांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकवणार्‍या आपल्या वडिलांचे मन वळविले व त्यांच्या इच्छेविरुद्ध कलाशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

           शिक्षणाच्या काळात त्यांनी शिष्यवृत्तीसह ‘डॉली कर्सेटजी’ हा पुरस्कारही मिळविला. १९३२ मध्ये ‘जी.डी. आर्ट’ ही पदविका त्या प्रथम वर्गात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. अंबिका धुरंधर, गोपाळ देऊसकर व ज.द. गोंधळेकर हे त्यांचे सहाध्यायी होते. डिप्लोमा परीक्षेतील यशामुळे त्यांना ‘म्यूरल डेकोरेशन’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर त्यांना जे.जे. स्कूलच्या फेलोशिपचा बहुमानही प्राप्त झाला. यानंतर अँजेला यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीचा शिक्षणविषयक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. १९३६ मध्ये त्यांना ‘ऑल इंडिया वुमन आर्टिस्ट एक्झिबिशन’मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.

           त्या जे.जे. स्कूलमध्ये शिकत होत्या त्या काळात प्रिन्सिपल कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांच्या प्रेरणेतून कलेतील भारतीयत्व जोपासणारी ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ ही कलाचळवळ ऐन भरात होती. अँजेलांचे वडील ए.एक्स. त्रिंदाद यांचा कल पाश्‍चिमात्य पद्धतीच्या यथार्थदर्शी चित्रपरंपरेकडे होता. किंबहुना, भारतीयत्व जपणारी ही कलाचळवळ त्यांना अजिबात रुचत नसे. परंतु त्यांनी याबाबत आपल्या मुलीवर स्वत:ची मते न लादता, ‘कलेचे काम करताना स्वत:शी प्रामाणिक राहण्याचाच’ सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार व सॉलोमन यांच्या प्रोत्साहनामुळे अँजेला यांनी दोन्ही प्रकारचे शिक्षण मन:पूर्वक घेतले. जे.जे.त त्या काळी सुरू झालेल्या जे.एम. अहिवासी यांच्या इंडियन क्लासमधून अँजेलांवर पौर्वात्य पद्धतीचे कलासंस्कार झाले. परिणामी, अँजेला यांच्या कलानिर्मितीत भारतीयत्व जपण्याचा प्रयत्न आयुष्यभर होत गेला.

           सुरुवातीच्या काळात त्यांनी काही व्यावसायिक व्यक्तिचित्रे रंगविली. परंतु अविवाहित असलेल्या अँजेलांना लहान मुलांची चित्रे रंगविण्यात जास्त रस होता. नंतर अमेरिकेत गेल्यावरही त्यांनी लहान मुलांची व्यावसायिक व्यक्तिचित्रे रंगविल्याचे आढळते. १९४० च्या दरम्यान त्यांचा कल ख्रिस्ती धर्मावर आधारित आध्यात्मिक विषयांकडे वळला व त्यातून निर्माण झालेल्या चित्रांमुळे अँजेला या भारतातील ख्रिस्ती कलेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाच्या चित्रकार असल्याचे मानले जाऊ लागले. १९४७ मध्ये त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन झाले व त्यानंतर तर त्यांनी केवळ धार्मिक विषयांवरील चित्रनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी भारतीय शैलीतील ‘बायबल’चे काम स्वीकारले. यांतील चित्रे सर्वसाधारणपणे दिसणार्‍या पाश्‍चिमात्य बायबलमधील चित्रांपेक्षा अगदी वेगळ्या स्वरूपाची होती. त्यातील येशू, मेरी व इतर सर्व व्यक्तिरेखा व त्यांच्या वेषभूषा भारतीय होत्या.

           १९४९ ते १९५९ या काळात त्या प्रथम इंग्लंड येथे व त्यानंतर सातत्याने अमेरिकेस जाऊ लागल्या. तेथील विमेन्स क्लब, शाळा, कॉलेज व विद्यापीठांतून त्यांनी कलाविषयक व्याख्याने दिली. या काळात त्यांचा परिचय ‘अँजेला त्रिंदाद — इंडियन आर्टिस्ट’ असा करून दिला जाई व त्याचा त्यांना अभिमान वाटे.

           याच दरम्यान त्यांची अमेरिकेत वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, क्लीव्हलँड अशा ठिकाणी प्रदर्शने झाली. याशिवाय लंडन, पॅरिस, रोम, ब्रुसेल्स आदी पाश्‍चिमात्य कलाकेंद्रांत त्यांची एकल प्रदर्शने झाली.

           १९५९ नंतर त्यांच्या चित्रांत आधुनिक पद्धती व काही वेळा क्युबिझम शैेली दिसू लागली. विषय ख्रिस्ती धर्मविषयक असले तरी त्यात हिंदू तांत्रिक प्रतीके येऊ लागली. याच दरम्यान त्यांना पोर्तुगाल सरकारतर्फे लिस्बन येथील ‘मॉल ऑफ जस्टीस’साठी ७ द १४ फूट आकाराचे चित्र तयार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्याचा विषय ‘गोव्यातील हिंदूंचे सेंट फ्रान्सिस करीत असलेले धर्मांतर’ असा होता. या चित्रामुळे व त्या आधीच्या काळात अँजेला यांनी ख्रिस्ती धर्मासाठी केलेल्या कलात्मक कामाबद्दल पोप पायस बारावे यांच्या हस्ते अँजेला त्रिंदाद यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना ‘प्रो इच्च्लेसिया इट पोन्तिफिचे ’ हा किताब देण्यात आला. कार्डिनल कॉन्स्टंटिनी यांनी त्यांच्या ‘सॅक्रेड आर्ट’ या पुस्तकात अँजेला त्रिंदाद यांच्या धार्मिक कलानिर्मितीवर खास लेख अंतर्भूत केला.

           अँजेला यांनी देशात व परदेशांत दिलेल्या व्याख्यानांत स्वातंत्र्योत्तर भारत व भारतीय कलेतून व्यक्त झालेला ख्रिस्ती धर्म हे दोन विषय आवर्जून असत. १९६३ व १९६४ ही दोन वर्षे त्यांनी अमेरिकेतील सेंट लुइस युनिव्हर्सिटीत ‘इंडियन आर्ट’ हा विषय शिकवला. त्यानंतर त्यांना ‘भारतीय तांत्रिक तत्त्वज्ञान’ या विषयात रस वाटू लागल्यामुळे त्या भारतात परतल्या. १९६० ते १९७० या काळातील ‘कलेतून अध्यात्म शोधण्याच्या’ प्रक्रियेत त्यांची चित्रनिर्मिती अमूर्ततेकडे झुकू लागली. सांख्य, तंत्र, योग या विषयांचा अभ्यास करताना त्यांना हिंदू तत्त्वज्ञानाची ओळख झाली. परिणामी, त्यांना ख्रिस्ती धर्मश्रद्धा व हिंदू तत्त्वज्ञानातील ब्रह्मा-विष्णू-महेश आणि मायास्वरूप संकल्पना चित्रांतून व्यक्त करण्याची ओढ वाटू लागली. याच काळात अमेरिकेतील ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम’ या कलाचळवळीतील चित्रकार विल्यम डी कूनिंग हे त्यांचे प्रेरणास्थान होते. यातून त्यांना ‘कलेतून मानवता व बंधुत्वाची एक सखोल अशी जाणीव निर्माण व्हावी’, असे वाटू लागले.

           अँजेला त्रिंदाद पाश्‍चिमात्य शैली ते भारतीयत्व आणि ख्रिस्ती धर्मश्रद्धा ते तांत्रिक कलेतील हिंदू प्रतीके व तत्त्वज्ञान इथपर्यंत सर्वांचा वापर त्यांची ख्रिस्ती धर्मविषयक चित्रे रंगविताना करत असत. या प्रवासात त्यांनी यथार्थदर्शी ते अमूर्त शैलीपर्यंत अनेक प्रकारची चित्रनिर्मिती केली असली, तरी त्याचा हेतू ख्रिस्ती धर्माशीच निगडित राहिला. परिणामी, कलात्मक शोध - प्रयोग व अभिव्यक्तीपेक्षा चित्रनिर्मिती-मागच्या धर्मविषयक प्रेरणांमुळे त्यांच्या कलानिर्मितीला मर्यादा पडल्या. त्यांची कला विशिष्ट वर्तुळात अडकली व समकालीन भारतीय कलाजगताला त्या अज्ञातच राहिल्या.

           त्या स्वत:ला भारतीय ख्रिस्ती कन्या मानत. कॅथलिक धर्मश्रद्धा मन:पूर्वक जपत. पण आपले त्रिंदाद कुटुंब हे मूलत: गोव्यातील धार्मिक, सारस्वत ब्राह्मण हिंदू कुटुंब होते व पोर्तुगिजांनी केलेल्या गोव्यातील धर्मांतराच्या काळात ते ख्रिस्ती झाल्याचे त्या आवर्जून सांगत.

           स्वत:ची चित्रनिर्मिती करीत असताना त्यांनी आपल्या वडिलांची चित्रनिर्मिती उत्तम प्रकारे सांभाळली. त्यांची स्वत:ची चित्रे व या संदर्भातील व त्यांनी केलेले लेखन १९९७ मध्ये स्थापन झालेल्या ए.एक्स. त्रिंदाद फाउण्डेशन म्यूझियम, गोवा येथे जतन केलेले आहे.

           अँजेला त्रिंदाद यांचे १९८० मध्ये, बहिणीच्या भेटीसाठी त्या ब्राझिल येथे गेल्या असताना निधन झाले.

- सुहास बहुळकर

त्रिंदाद, अँटोनिओ झेविएर