Skip to main content
x

वाघ, अनुताई बाळकृष्ण

     पुण्यातल्या मोरगाव येथील बाळकृष्ण धुंडिराज वाघ व यमुना हे अनुताईंचे जन्मदाते. बुद्धिमान, कष्टाळू, प्रेमळ, उदार व सुधारकी मताच्या वडिलांची वारंवार बदली होत राहिल्याने अनुताईंचे बाळपणचे शिक्षण सुसंगत झालेच नाही. तशातच वयाच्या तेराव्या वर्षी (१९२३) शंकर वामन जातेगावकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला, परंतु फक्त वरातीच्या दिवशीच सासरचे नाममात्र दर्शन झाले. वय लहान त्यामुळे त्या आपल्या वडिलांकडेच होत्या. मनमाड रेल्वेलाईनवर फिरत असताना जातेगावकरांचे अपघाती निधन होऊन अनुताई विधवा झाल्या. १९२५ ला इगतपुरी येथे व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत त्या पहिल्या आल्या. नंतरची तीन वर्षे पुण्याच्या ‘वुमेन्स ट्रेनिंग कॉलेजा’तून शिकताना शिष्यवृत्ती मिळवून जिल्ह्यात पहिली येण्याचा त्यांना मान मिळाला. त्या मोडी शिकल्या, शिवणकामात तरबेज झाल्या.

      १९२९ मध्ये प्राथमिक शिक्षक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होऊन नाशिकमधील चांदवडच्या शाळेत त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून नोकरी सुरू केली. १९३३ मध्ये ही नोकरी सोडून त्या पुण्यातल्या हुजुरपागेत गेल्या. तेथे तेरा वर्षात त्यांनी उत्तम शिक्षिका म्हणून नाम कमावले. त्याचबरोबर मुख्याध्यापिका पार्वतीबाई आठवले यांच्या प्रोत्साहनाने रात्रशाळेत जाऊन त्या मॅट्रिक झाल्या.

      आचार्य अत्रे यांची कन्या शिरीष पै, डॉ. तारा वनारसे, सिंधु परांजपे, डॉ. सुशीला आगा, मृणालिनी देसाई इत्यादी हुजुर पागेतील आपल्या विद्यार्थिनींचा नामोल्लेख त्या अभिमानाने करतात. यापैकीच कुसुम कारखानीस आता कुसुम नारगोळकर बनून आदिवासींची सेवा करीत आहे. तर लीला गोडबोले या लीला कोसके होऊन कोसबाडच्या संस्थेत प्राध्यापिका म्हणून सेवारत आहेत.

      स्वातंत्र्यानंतर ‘सुराज्य’ निर्माण करण्याच्या स्वप्नाने प्रेरित झालेल्या अनुताई हुजुरपागेतील नोकरी सोडून कस्तुरबा ट्रस्टच्या विद्यमाने मुंबईत बोरिवली येथे आयोजित शिक्षक शिबिरात प्रविष्ट झाल्या. “म्हणूनच ताराबाईंची भेट झाली. त्या भेटल्या नसत्या तर माझे आयुष्य आज आहे त्यापेक्षा कितीतरी वेगळे झाले असते.” असे त्या कृतज्ञतेने म्हणतात.

      सप्टेंबर १९४५ मध्ये ताराबाईंनी अनुताईंना ‘आघाडीचा सैनिक’ म्हणून पूर्वतयारीसाठी बोर्डी येथे पाठविले. तेथे त्यांना ‘जीवनाचा सूर’ सापडला. २४ डिसेंबर १९४५ रोजी बोर्डी येथे बाळासाहेब खेर यांच्या हस्ते बालग्राम केंद्राचे उद्घाटन झाले. खेडेगावात बालवाड्या शास्त्रीय रीतीने पण कमी खर्चात कशा चालवाव्यात याचा प्रयोग करणे एवढे उद्दिष्ट होते. त्यातून अनेक समस्या पुढे येत व त्यांची उकल करताना नवे उपक्रम निघत. १९४५ पासून बोर्डीला बारा वर्षे आणि १९५७ पासून आदिवासी वस्तीच्या अंतर्भागात कोसबाड येथे ताराबाई व अनुताई या दोघींनी भारतातील ग्रामीण बालशिक्षणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावे असे प्रयोग केले.

      १९४६ मध्ये पाड्यावरची बालवाडी चालवण्यासाठी अनुताईंचा मासिक अर्थसंकल्प तीन रुपये असे. मग त्या कोळशाने भिंतीवर अक्षरे काढीत. माणकूबाई व एक नवतरुणी काकूबाई यांच्याशी मैत्री करून अनुताईंनी गुजराती भाषेशी ओळख करून घेतली व वाचनाने ती वाढवली, प्राथमिक शिक्षिकेचे काम अनुताईंनी अनेक वर्षे केले असले तरी बालमंदिराचे तंत्र त्यांच्यासाठी नवीन होते. शेलतभाईंसारखे अनुभवी व जातिवंत शिक्षक त्यांना लाभले व मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. १९५० मध्ये अनुताईंनी मुंबईच्या शिशुविहारांचे १ वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले.

      या भागातले खरे शिक्षण मुलांना ‘माणसात’ आणायचेच होते. अनुताईंनी मुलांना आंघोळी घातल्या, मुलींच्या डोक्यातल्या उवा काढल्या, खरजेला औषधं लावली, संडास तयार करून त्याचा वापर कसा करायचा याचे एका लहान मुलाकडून प्रात्यक्षिकही करून घेतलं. साधने मुंबई किंवा बाहेरून विकत न आणता त्यांनी परिसरातूनच करून घेतली.

      मातीकाम, टकळीवर सूतकाम, रंगकाम, पिसांच्या जोड्या लावणे, बांगड्यांना दोरे गुंडाळून त्यांच्या रंगजोड्या लावणे, कार्डबोर्डच्या रंगतक्त्या करणे, शंख शिंपले आणून ते निवडणे, फुटके शंख व फुटके दगड ओवणे, शंखांचे आकार व रंगावरून वर्गीकरण करणे, काड्या, पाने, बिया, चिंचोके, पाकळ्या वगैरेंचा उपयोग करून घेतला. बाटलीत रेती भरणे, गोवरी भरडणे, विटकर कुटणे, साबू किसणे असे खेळ सुरू झाले. रंगकामासाठी बांबू फळे व दांतणाचे ब्रश झाले. केळीच्या सोपटाचे बारीक धागे काढून त्याच्या वाट्या-टोपल्या विणणे, खजुराच्या झाडाच्या चटया, डब्या, खुळखुळे करणे, पानांच्या पत्रावळी, द्रोण करणे अशी कामे मुक्त व्यवसायासाठी असत. मातीच्या लहान विटा पाडल्या. छोटी भट्टी मुलांच्या मदतीने केली. रेती-कागदही तयार केला.

     १९४९ ते ५६ या सात वर्षांत १५ अंगणवाड्या अनुताईंनी चालवल्या. रोज अंगणवाडीत जाताना बादलीत आरसा, फण्या, तेल, रुमाल, झांजा, हस्तव्यवसायाचे सामान घेऊन, खांद्यावर खराटे, पंखा, झाडू अशा थाटात अनुताई व सहकारी निघत. मुलांची नावेही ठेवलेली नसत. कोणातरी समाजसेविकेला बोलावून सामुदायिक बारसे होऊ लागले. बारा वर्षे हा उपक्रम चालला होता. सापडतील तेथून मुलांना शोधून, स्वच्छ करून आणावे लागे. त्यांना सदा भटकण्याची सवय मग हिंडून परिसर पाहून त्यावर गप्पा, गोेष्टी, गाणी, बडबडगीते रचून सांगणे असे उपक्रम केले.

     एकदा एका मुलाने म्हटले, “आम्हाला दिवसा वेळ नाही. रात्री शिकवशील का? तू रात्री बोलावलेस तर आम्ही येऊ.” मग तो मुलगा २०-२५ मुलांना घेऊन आला व स्वयंभू रात्रशाळा सुरू झाली. मग लेखन, वाचन, नाटक, खेळ, गणित आदी विषयांना सुरूवात झाली. हे विषय सोप्या, मनोरंजक पद्धतीने व कृतीद्वारा घेतले जात. कुरणशाळेच्या कामांबाबत त्या रोजनिशी लिहीत. त्या मुलांना आट्यापाट्या, खोखो, हुतूतू हे मैदानी खेळ आवडायचे. जिल्हा लोकल बोर्डाची कोसबाडची शाळा अनुताईंनी चालवायला घेतली. त्यांनी घरोघरी हिंडून तपास केला. 

     कॉटेज इंडस्ट्रीजतर्फे ताराबाईंनी २ वर्षांचा सुतारी कामाचा वर्ग चालवला. १७ पैकी १३ विद्यार्थी पास झाले. शाळेत येणाऱ्या मुलांना काम देऊ केले. त्यांना बिल्ला दिला. याचा अनुकूल परिणाम झाला. भाताचे गवत विणून पिशव्या करणे, रद्दी कागदाच्या पिशव्या, पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण लावणे अशी कामे काढली. परिसरातील वस्तूंचा उपयोग करून साधने तयार करण्याचे काम शबरी उद्योगालयात होऊ लागले. आदिवासी माणूस स्वाभिमानी, कष्टाळू व प्रामाणिक आहे. त्यांच्या भाकरीचा प्रश्‍न सोडवणे हे पहिले काम होते. स्वच्छतेची राहणी शिकवणे हेही ओघाने येई. ताईं (ताराबाईं) नी ‘विकासवाडी’ योजना तयार करून जे.पी. नाईक यांना दाखवून, मंजुरीसाठी पाठवली. ६५ वर्षीय ताईंनी पाऊण लाख रुपये स्वत:च्या हिमतीवर जमवले. राहुरी कृषि विद्यापीठाच्या कृषिकेंद्राकडून अनुताईंना सर्व बाबतीत मदत मिळत असे. रात्रशाळेचे किसानशाळेत रूपांतर झाले होते.

     १९६४ मध्ये सुरू केलेले ‘ग्रामसेविका विद्यालय (कोसबाड)’ हे सबंध भारतात एकमेव होते. १९८० पर्यंत त्यात १७ वर्ग चालले. त्यातल्या प्रशिक्षित मुली महाराष्ट्रभर कामाला लागल्या. युनिसेफच्या मदतीने अनुताईंनी सकस आहार प्रशिक्षण वर्ग चालवला. १० गावात हिंडून महिलांना सकस आहार, बालसंगोपन, बाल आरोग्य वगैरे संबंधी माहिती दिली. इंडियन कौन्सिल फॉर चाइल्ड वेल्फेअरने ‘अंगणवाडी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग’ घ्याल का, असे विचारताच अनुताईंनी लगेच होकार दिला. हे चार महिन्यांचे वर्ग आदिवासी वस्तीतून चालवले.  सरकारी कागद मिळण्याची व्यवस्था डॉ. चित्रा नाईकांच्या सौजन्याने होताच ‘शिक्षक मित्रमालेतर्फे’ बालगीते, बडबडगीते, प्रीतिगीते, गोष्टी भाग-२ व भाग-३, सकस आहार गीते, छोटीशी नाटुकली, गंमत जंमत आदी बालवाडी व प्राथमिक शाळेच्या खालच्या वर्गातील मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी त्यांनी १९८० पर्यंत २५ छोटी पुस्तके प्रकाशित केली. एनसीईआरटी व आयसीसीडब्ल्यूच्या निमित्ताने १९७० ते १९८० या काळात अनुताईंच्या दिल्लीला खूप वार्‍या झाल्या.

    ‘ऑल इंडिया प्रीस्कूल एज्युकेशन’ तर्फे वर्षातून एकदा तीन दिवसांची परिषद असे. हैद्राबाद, इंदूर, बडोदे, अजमेर, बंगलोर इत्यादी ठिकाणी हजर राहून त्यांनी पेपर वाचले, परिसंवादात भाग घेतला, साधनांची प्रदर्शने मांडली. बंगलोर येथे आयोजित अखिल भारतीय शेतकी प्रदर्शनात कोसबाडला पहिले बक्षीस मिळाले. याच परिषदेचे एक अधिवेशन कोसबाडला भरवून ४०० पेक्षा जास्त प्रतिनिधींची सोय करण्यात आली व एकाच प्रकारे कार्यक्रम होतील अशी ५ केंद्रे उभी केली गेली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे या प्रसंगी उपस्थित होते. ग्रामसेविका, बालसेविका, अंगणवाडी सेविका अशा अनेक प्रकारच्या प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थिनी ‘सर्वच माझ्या मुली’ आहेत अशी अनुताईंची आंतरिक भावना होती.

     १८ मार्च १९८० रोजी केंद्रिय समाज कल्याण मंत्रालयातर्फे बाल कल्याण कार्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक म्हणून २० हजार रुपयांचे रोख पारितोषिक अनुताईंना देऊन त्यांचा गौरव केला गेला. त्यावेळी त्या म्हणाल्या, “ताराबाई मोडकांनी मला सर्व प्रकारे घडविले. त्या माझ्या ताईंचा आणि त्यांच्या कार्याचाच हा गौरव आहे. ३० ऑगस्ट १९७३ रोजी आपली सर्व प्रेरणा, दुर्दम्य शक्ती आणि आत्मविश्वास माझ्यामध्ये ओतून ताई संस्थेचा भार माझ्या माथी सोपवून निघून गेल्या! त्याच ताईंनी दिलेला पुढील मंत्र मी आजन्म सांभाळून ठेवला.”

      ‘मळलेल्या पायवाटेने कुणीही जाईल. आपल्याला नवी पायवाट पाडायची आहे. तेथे काटेकुटे, खाचखळगे, झाडेझुडपे असणारच! विषारी जनावरे आणि हिंस्र पशूही असणार. विचाराने आणि निर्धाराने आपण पावले टाकीत गेलो तर हीच (कोसबाड) जागा नंदनवन होईल.’

     अनुताईंचे साहित्य (बालसाहित्य व इतर)- टिल्लूची करामत, बाल संवाद, शब्दांची मजा, सकस आहारगीते, प्रौढ शिक्षणमाला, अजब सातभाई, गंमत जंमत, कुरणशाळा, विकासाच्या मार्गावर, आटपाट नगरात, बडबडगीते, बालवाडी कशी चालवावी

- वि. ग. जोशी

संदर्भ
१. चिटणीस,अशोक, संपादन  ; ‘कोसबाडच्या टेकडीवरून’, ऋचा प्रकाशन,  ठाणे ;  ३१ ऑगस्ट १९८०.
वाघ, अनुताई बाळकृष्ण