वाघेला, गौतम दाह्याभाई
वस्त्रोद्योगकलेच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आणि भारतीय वस्त्रकलेतील आकारांचा कलात्मक वापर करून आधुनिक शैली घडविणारे चित्रकार गौतम दाह्याभाई वाघेला यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातल्या सानंद या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव खनिबा होते. त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून रेखा व रंगचित्रकला (ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग) या विषयात पदविका घेतली आणि भित्तिचित्र (म्युरल) या विषयाचे तंत्र त्यांनी बनस्थली, राजस्थान येथे आत्मसात केले. वीव्हर्स सर्व्हिस सेंटर येथे त्यांनी विविध पदांवर काम केले व संचालकपदावरून ते निवृत्त झाले. ‘अस्तित्व आर्टिस्ट्स ग्रूप’चे ते संस्थापक होते.
वस्त्रोद्योगातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी वीव्हर्स सर्व्हिस सेंटरतर्फे त्यांनी युरोपातील विविध देशांना भेटी दिल्या आणि रेशीम संकल्परचना तज्ज्ञ व सल्लागार म्हणून अनेक आशियाई देशांमध्येही त्यांनी प्रवास केला. या सोबत त्यांची सातत्याने चित्रनिर्मितीही सुरू होती. त्यांचा कलेतील प्रवास प्रतीकात्मक चित्रांपासून सुरू होऊन अमूर्ततेकडे होत असतानाच, त्यांना लघुचित्रशैलीतील देवदेवतांच्या चित्रांचे आकर्षण वाटू लागले. आलंकारिक पद्धतीच्या चित्रणात ते पारंगत होतेच. अखेरच्या काही वर्षांत त्यांनी या पद्धतीची रेषा व सपाट रंगांचा वापर करून चित्रे रंगवली व ती सातत्याने प्रदर्शित केली. देशात आणि देशाबाहेर त्यांनी अनेक प्रदर्शनांमध्ये भाग घेतला आणि एकल प्रदर्शनेही भरवली. त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले, तसेच १९६१ आणि १९६२ मध्ये त्यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना १९८२ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने, तर १९९० मध्ये त्यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारतीय लोकसंस्कृतीची पाळेमुळे घट्ट रुजलेल्या छोट्याशा खेड्यात त्यांचे बालपण गेले. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करण्याची वृत्ती असल्यामुळे वाघेला यांच्या चित्रांमधून निसर्ग, समाज आणि मानवता यांची संस्कृतिसापेक्ष आदिमता व्यक्त होते. त्यांच्या चित्रांवर तंत्रकला, लघुचित्रे, भित्तिचित्रे, शिल्पकला यांचाही प्रभाव दिसून येतोे
वाघेला यांच्या प्रतिमा अबोध मनातून आलेल्या, एखाद्या ग्रमदेवतेच्या मूर्तीसारख्या थेट, सामर्थ्यपूर्ण आणि उत्कट अनुभव देणार्या असत. प्राणिसृष्टी आणि मानवी आकृतींचे, निसर्गाचे आणि वास्तूंचे एक वेगळेच रसायन त्यांच्या सपाट आणि पारदर्शक रंगलेपनाने तयार होई. त्यामुळे त्यांच्या चित्रांना गूढरम्य काव्यात्मकता प्राप्त होत असे.
- प्रतिभा वाघ