Skip to main content
x

विकमसी, हिराचंद आनंदजी

        विदर्भात स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात सातत्याने काम करणारे म्हणून नागपूरमधील हिराचंद आनंदजी विकमसी प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म विदर्भातील एलिचपूर येथे एका व्यवसायप्रिय गुजराथी कुटुंबात झाला. वडील आनंदजी व आई वालबेन हे दोघेही हिराचंद लहान असतानाच निवर्तले. त्यामुळे हिराचंद यांचे शालेय शिक्षण, १९२४ मध्ये खामगाव येथे सुरू झालेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात झाले.

बालपणापासून कलेची ओढ असलेल्या हिराचंद विकमसी यांनी वडिलधाऱ्यांच्या इच्छेविरुद्ध कलाशिक्षण घ्यायचे ठरविले व शिल्पकार बी. विठ्ठल व बी. प्रभा यांच्या सल्ल्यानुसार मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. १९६७-६८ या कालावधीत विकमसी शिकत असताना त्यांना ज्येष्ठ शिल्पकार सोनवडेकर व मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले; पण प्रकृतिअस्वास्थ्यामुळे विकसमी यांनी मुंबई सोडली व ते खामगावला परतले. तेथे खऱ्या अर्थाने विकमसींची शिल्पकार म्हणून जडणघडण झाली.

राष्ट्रीय विचाराने प्रेरित अशा टिळक राष्ट्रीय विद्यालयात विकमसींना कलाचार्य पंधे गुरुजींचे मार्गदर्शन लाभले. त्यातूनच त्यांच्यावर राष्ट्रप्रेम, महात्मा गांधी, अरविंद घोष व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचे संस्कार झाले. पंधे गुरुजींची विचारधारा त्यांच्या संस्थेतील ‘गुरुकुल’ पद्धत व स्वावलंबन यांचा विकमसींच्या आचारविचारांवर सखोल प्रभाव पडला. टिळक राष्ट्रीय विद्यालयातून ‘मूर्तिकला विशारद’ होऊन विकमसी बाहेर पडले व १९७४ पासून नागपूर येथे स्थायिक झाले. याच काळात त्यांचा विवाह सरला राव यांच्याशी झाला व त्यानंतर त्यांनीही पतीच्या कामात सातत्याने, मनःपूर्वक सहभाग घेतला.

नागपूरला ‘कलाकुंज’ ही चित्र-शिल्पकला विषयक कार्य करणारी संस्था विकमसींनी आपली कर्मभूमी बनवली व शिल्पसाधनेत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या कलाजीवनातातील यशाची पहिली पायरी म्हणजे नागपुरात संपन्न झालेल्या विश्‍व हिंदी साहित्य संमेलनात प्रदर्शित झालेली सात फूट उंचीची वीणा- वादिनी देवी सरस्वती. यानंतरच्या काळात त्यांनी अनेक स्मारकशिल्पे साकारली. ब्राँझ, प्लास्टर, सिरॅमिक, सिमेंट, फायबर ग्लास इत्यादी अनेक माध्यमांवर पकड असलेल्या विकमसी यांची सर्वाधिक शिल्पे ब्राँझ माध्यमात आहेत. त्यांत सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, चंद्रशेखर आजाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी अशी राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वे व छत्रपती शिवाजी महाराज व राणा प्रताप यांसारखे शूरवीर योद्धे व विदर्भातील नेते बॅरिस्टर वानखेडे व कन्नमवार अशा अनेकांचा समावेश आहे. विदर्भाव्यतिरिक्त इंदूर, भोपाळ, औरंगाबाद, चंदिगड इत्यादी ठिकाणी विकमसींची स्मारकशिल्पे आहेत.

मारवाडी अग्रवाल समाजाचे कुलदैवत अग्रसेन महाराज, संत जगनाडे अशा संत-महात्म्यांची व्यक्तिशिल्पेही विकमसी यांनी घडविली. यांतील सर्वांत भव्य आकाराचे मूर्तिशिल्प संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे असून ते ३० फूट उंचीचे आहे व नागपूरनजीक वडगाव धरण येथे वसवले आहे.

विकमसींच्या आयुष्यातले सर्वांत आव्हानात्मक शिल्प म्हणजे १९९३ मधील कृष्ण वल्लभाचार्य यांची भव्य प्रतिमा. ही ७०० किलोग्रॅम वजनाची भव्य मूर्ती राजकोट येथे स्थापित करण्यात आलेली आहे. त्यांच्या अन्य शिल्पांपैकी नागपूरच्या मातृसेवा संघाच्या इस्पितळाच्या दर्शनी भागात असलेले ज्येष्ठ समाजसेविका कमलाताई हॉस्पेट यांचे शिल्प उल्लेखनीय आहे. कवी निराला व नाट्यलेखनकार महेश एलकुंचवार यांची व्यक्तिशिल्पेही विकमसींनी साकारली आहेत.

हिराचंद विकमसी यांनी ‘संगीत’ या विषयावरील अनेक सर्जनात्मक शिल्पे घडविली आहेत. या मालिकेतील काही शिल्पे २००५ मध्ये मुंबईच्या म्युझियम आर्ट गॅलरीत प्रदर्शित झाली होती. नागपूर स्थित ‘गोवारी स्मारका’करिता गोवारी समाजावरील निष्पाप व्यक्तींवर झालेल्या लाठीमाराचे प्रतीकात्मक शिल्प विकमसी यांनी केले असून त्यात ‘लाठी’ या आकाराला धरून वेल्डिंगने जोडलेल्या स्टीलच्या नळ्यांचा वापर केला आहे.

१९७० च्या दशकापासून शिल्पकलासाधना करणारे हिराचंद विकमसी अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. त्यांत १९७६ मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ब्राँझ कास्टिंगसाठी टिळक राष्ट्रीय विद्यालयातर्फे सुवर्णपदक, १९८१ मधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई म्युरल डिझाइनचे प्रथम पारितोषिक व १९९३ मधील ‘कच्छशक्ती’ पारितोषिक ही प्रमुख आहेत.

- डॉ. मनीषा पाटील

विकमसी, हिराचंद आनंदजी