Skip to main content
x

विलायची, गोविंद शिवराम

          गोविंद शिवराम विलायची यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचे वडील तबला उत्तम वाजवीत. त्यामुळे संगीताचे संस्कार त्यांना बालपणीच मिळाले. त्यांनी वडिलांकडून तबला वादनाचे प्राथमिक धडे घेतले. आर्थिक परिस्थितीमुळे ते शालेय शिक्षण घेऊ शकले नाहीत. पुढे त्यांना श्रीमंत राजे लक्ष्मणराव भोसले यांनी राजाश्रय दिला, त्यामुळे संगीताची जोपासना करता आली.

          निष्णात तबलावादक उ. मेहबूबखान यांच्याकडून विलायची यांनी तबला वादनाचे रीतसर  शिक्षण घेतले, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य रास्तेबुवांकडून मृदंगाचा अभ्यास केला. लाल खाँसाहेबांकडून सतारीचे शिक्षण घेतले. हार्मोनिअमवरही गोविंदराव विलायची यांचे प्रभुत्व होते. तसेच जलतरंग, सारंगी, दिलरुबा या वाद्यांवरसुद्धा त्यांनी प्रभुत्व मिळवले होते.

          बनारस घराण्याचा बाज, लयीचे तंतोतंत संतुलन आणि दुर्मिळ बोलांचा त्यांच्याजवळ असलेला खजिना यांमुळेच ते लोकप्रिय झाले. त्यांनी नागपूर आकाशवाणी केंद्रावरून कार्यक्रम सादर केले. स्वतंत्र वादनाबरोबरच अनेक कलाकारांना त्यांनी साथसंगत केली. त्याबरोबरच वाद्यशिक्षणाचे कार्यही केले. त्यांच्या शिष्यपरंपरेत जनार्दनपंत दारव्हेकर, भैयाजी चौरीकर, गजाननराव दशपुत्रे यांचा समावेश होतो.

          विलायचींचा स्वभाव निर्भीड, स्पष्टवक्ता व थोडासा फटकळ होता. परंतु संपूर्ण आयुष्यभर कलाराधनेत घालवल्यामुळे संगीताची झालेली हेळसांड त्यांना बघवत नसे. त्यांनी १९२० ते १९३७ पर्यंत आपल्या निवासस्थानी संगीताचे वर्ग चालवले. नंतर त्याच वर्गाचे संस्थेत रूपांतर केले. त्या संस्थेचे ५ जानेवारी १९३७ रोजी ‘श्री गुरू गायन वादनालय’ असे नामकरण केले. नागपूरमधील बडकस चौकात ही संस्था स्थलांतरित झाली. त्यांनी संगीत प्रचारार्थ बरेच भ्रमण केले.

          वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी नागपूरमधील सुप्रसिद्ध राजाराम वाचनालयातर्फे ‘संगीत महर्षी’ ही उपाधी देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच मध्यप्रदेश संगीत समाजाच्या वतीने वर्धा इथे त्यांचा सत्कार झाला. वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी गोविंद विलायची यांचे नागपूर येथे निधन झाले.

सुपर्णा कुलकर्णी

विलायची, गोविंद शिवराम