Skip to main content
x

आगाशे, मोरेश्वर नारायण

     डॉ. मोरेश्वर नारायण ऊर्फ मोरोपंत आगाशे यांचा जन्म १० सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामधून ते एम.बी. बी. एस. झाले. मोरोपंतांनी सातार्‍यात १९१८ पासून वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. सातार्‍यात १९१३ मध्ये ‘आयुर्वेद वैद्यक शाळा’ ह्या संस्थेची स्थापना झालेली होती. ही संस्था सध्या ‘शेठ चंदनमल मुथा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय’ म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मोरोपंत अ‍ॅलोपॅथिक मेडिसिन शिकवू लागले. थोडे विद्यार्थीच मॅट्रिक झालेले असत. मोरोपंतांनी मराठीतून अ‍ॅलोपॅथी शिकवण्यास सुरुवात केली. उत्कृष्ट वक्तृत्व, विषयाची तयारी व पायाभूत विषयांवर आधारित शिकवण्याची पद्धत ह्यामुळे विद्यार्थ्यांना विषय चांगले समजू लागले. मोरोपंत विद्यार्थिप्रिय अध्यापक झाले.

      संमिश्र स्वरूपात आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी शिकविण्यासाठी चांगले प्राध्यापक, योग्य अभ्यासक्रम व ग्रंथ ह्यांची गरज होती. मोरोपंतांनी संस्थेत उत्तीर्ण झालेल्या हुशार विद्यार्थ्यांना अध्यापक म्हणून शिकविण्यासाठी बोलावून घेतले. सातार्‍यात व्यवसायासाठी आलेल्या अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांना बोलावून घेतले. संस्थेत अनेक अध्यापक समविचाराने काम करू लागले.

      अभ्यासू व विद्वान संशोधक तयार व्हावेत म्हणून मोरोपंतांनी १९४४ मध्ये संस्थेच्या आवारात ‘डॉ. भडकमकर संशोधन मंदिर’ सुरू केले. डॉ. एन. आर. आपटे, वैद्य गो. आ. फडके, वैद्य भा. द. गोडबोले, पंडित गोस्वामी अशा विचारवंतांसह स्वत: भाग घेऊन आयुर्वेद संहिता ग्रंथांचे वाचन, चर्चा, लेखन, विचार, प्रसार असा आयुर्वेद प्रसाराचा प्रयोग सहा वर्षे केला. यातून भारतात, विदेशात आयुर्वेदाचा प्रसार व्हावा म्हणून विदेशातील काही जर्नल्समधून त्यांनी आयुर्वेदाविषयी लेख लिहिले.

      विद्यालयातील विद्यार्थ्यांना औषधीकरणाचा अनुभव मिळावा व व्यावसायिकांना ग्रंथोक्त आयुर्वेदीय औषधे मिळावीत म्हणून मोरोपंतांनी १९२६ मध्ये ‘अर्कशाळा’ सुरू केली. वैद्य  सी. ना. रानडे ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने परिश्रमपूर्वक औषधी निर्माण करण्याचे पाठ बसवले, विद्यार्थ्यांना शिकविले. वनस्पती अर्क तयार करण्याचा पाया घातला. या अर्कशाळेचे दर्जेदार औषधे तयार करणार्‍या ‘आयुर्वेदिय अर्कशाळा लि., सातारा’ या कंपनीत रूपांतर झाले. मोरोपंतांचे हे सर्व उपक्रम संस्थेच्या विकासासाठी मानधन न घेता चालत. डॉ. मोरोपंत आगाशे ह्यांनी नामांकित व्यावसायिक म्हणून यश व कीर्ती मिळविली. रुग्णपरीक्षण, योग्य चिकित्सा, आरोग्यरक्षणासाठी मार्गदर्शन, आयुर्वेद औषधांचाही जाणीवपूर्वक वापर ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अनेक कुटुंबांचे ‘फॅमिली डॉक्टर’ म्हणून त्यांनी विश्‍वास व नावलौकिक मिळविला. नवीन पदवीधरांना ते सतत मार्गदर्शन करीत. अनेक यशस्वी चिकित्सक त्यांनी तयार केले.

      आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयातील त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १९४९ मध्ये त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्काराच्या निमित्ताने मिळालेल्या देणगीतून ‘डॉ. मो. ना. आगाशे धर्मार्थ रुग्णालय’ ही भव्य वास्तू उभी राहिली. विद्यार्थी प्रशिक्षण, रुग्णपरीक्षण, संशोधन व अत्यल्प दरात चिकित्सा येथे होते.

      डॉ. मोरोपंत आगाशे ह्यांचे सातार्‍याच्या शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांतही मोठे योगदान आहे. सातारा कन्याशाळा, न्यू इंग्लिश स्कूल व पॉप्युलर स्कूलच्या व्यवस्थापनात त्यांचा सहभाग होता. ते सातारा स्वदेशी बँकेचे अध्यक्ष होते. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या पहिल्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. दि वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनीचे ते अनेक वर्षे संचालक व नंतर अध्यक्ष होते.सातार्‍याच्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रात डॉ. मोरेश्वर नारायण आगाशे यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे.

- डॉ. श्रीकृष्ण गोविंद फडके

आगाशे, मोरेश्वर नारायण