Skip to main content
x

आगासकर, शांताराम पुरुषोत्तम

           शांताराम पुरुषोत्तम आगासकर हे रावबहादूर धुरंधर, तासकर, पिठावाला आदी चित्रकारांच्या  काळातील एक महत्त्वाचे चित्रकार होते. आगासकरांचा जन्म  भावनगर संस्थानात झाला. त्यांचे वडील या संस्थानाचे हेड ड्राफ्टमन होते. आगासकर शाळेत शिकत असतानाच १८८८ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी १८९० मध्ये मुंबईत सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. श्रीपाद दामोदर सातवळेकर, एल.एन. तासकर हे चित्रकार आगासकरांचे वर्गमित्र होते. आगासकरांनी लवकरच एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळख प्राप्त केली. कदाचित वडिलांचा वारसा असेल, सुरुवातीपासूनच लाइन ड्रॉइंगमध्ये ते पारंगत होते. सूक्ष्म निरीक्षणाच्या आधारे चितारलेल्या वस्तूंच्या कडा व छायाप्रकाशाच्या तरल छटा दर्शवणारी पेन्सिल, तसेच चारकोलच्या साहाय्याने त्यांची काढलेली चित्रे सुरेख असत. या रेखाटनांसोबत आगासकरांनी तैलरंगात चित्रे रंगवण्याचे तंत्र आत्मसात केले. याबरोबरच त्यांनी स्थापत्यशास्त्राचेही शिक्षण घेतले.

           या दोनही अभ्यासक्रमांत त्यांनी चांगलेच प्रावीण्य मिळविले. १८९६ मध्ये स्थापत्यशास्त्रात व १८९७ मध्ये चित्रकलेत ‘मेयो पदक’ त्यांना मिळाले. सुप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांचा मुलगा रामवर्मा हा जे.जे.त आगासकरांच्या वर्गात शिकत होता. ‘आगासकरांकडून तुला जेवढे शिकता येईल, तेवढे शीक’, असे रविवर्मांनी आपल्या मुलास  सांगितल्याचा उल्लेख १९३४ मधील एका लेखात आढळतो. त्यांची १८९७ च्या दरम्यान शिक्षक म्हणून नेमणूक झाली व एम.व्ही. धुरंधर यांचे सहाय्यक म्हणून ते काम करू लागले व त्यांनी पुढे तीस वर्षे शिकवण्याचे कार्य केले. चित्रकलेबरोबर ते शिल्पेही घडवत अशी नोंद आहे. त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण कुठे घेतले याची माहिती नाही; परंतु त्यांनी चित्रकार त्रिंदाद यांचे एक व्यक्तिशिल्प केल्याची नोंद आहे.

           आगासकर एक चित्रकार म्हणून तत्कालीन इतर चित्रकारांप्रमाणेच व्यक्तिचित्रे काढत. याशिवाय भारतीय इतिहास, पुराणकथा आदींवर आधारित चित्रे तयार करून बॉम्बे आर्ट सोसायटी किंवा मद्रास, कलकत्ता, दिल्ली, सिमला, लखनौ आदी ठिकाणच्या प्रदर्शनांसाठी पाठवत. अशा प्रदर्शनांमधून त्यांना अनेकदा रौप्य किंवा ब्रॉन्झ पदक किंवा रोख रकमेचे पुरस्कार मिळत असल्याचे धुरंधर यांनी नोंदवले आहे.

           जगन्नाथ शंकरशेठ व त्यांची पत्नी, तसेच त्या काळचे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रिन्सिपल सेसिल बर्न्स यांच्या व्यक्तिचित्रांनी त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यापैकी जगन्नाथ शंकरशेठ व त्यांच्या पत्नीचे व्यक्तिचित्र बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात प्रदर्शित झाले व आगासकरांना व्यक्तिचित्रांची भरपूर कामे मिळू लागली. त्या काळातील प्रस्थापित तंत्र व शैलीमध्ये निओक्लासिकल शैलीनुसार केलेले ड्रॉइंग असे. रंगकामात इंप्रेशनिझम व रोमँटिसिझमप्रमाणे रंगांचे विविध प्रकारे थर लावत, विविध पोतनिर्मिती करत, काहीशा मुक्त पद्धतीने ते रंगकाम करत. यांचे प्रतिबिंब आगासकरांच्या व्यक्तिचित्रांमधून दिसून येते.

           याखेरीज ‘मनोरंजन’, ‘नवयुग’, ‘उद्यान’ आदी मासिकांतून त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली होती. रविवर्मा यांच्यामुळे प्रसिद्ध व प्रस्थापित झालेल्या पौराणिक विषयांवरील चित्रप्रकारात त्यांची मंथरा, उषास्वप्न, प्रिय पत्रिका, पायघडी, अग्निशुद्धी, सीताराम, भस्मासुर— मोहिनी, भारतीय युद्ध आदी चित्रे गाजली होती. मानवाकृती चित्रणातील हातखंडा निसर्गचित्रणातील तंत्र, अलंकरणाची आवड व कल्पनाशक्ती यांच्या आधारे विविध भाव व्यक्त करणारी, नाट्यमय प्रसंगांचे चित्रण करणारी ही चित्रे होती.

           आगासकर यांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते व ते आपल्या दिमाखदार वेषभूषेने त्यात भर घालीत. कानात मोत्यांची भिकबाळी, डोक्यावर तिरपी ठेवलेली मखमली टोपी, मलमलचा सदरा व सुरवार, तर कधी कोट व पँट अशा वेषात ते लक्ष वेधून घेत. ते स्पष्टवक्ते होते. १९१९ च्या दरम्यान नव्याने आलेले प्रिन्सिपॉल सॉलोमन आगासकरांच्या वर्गावर आले व त्यांनी एका विद्यार्थ्याला आपल्या पद्धतीने- करेक्शन-चित्रात सुधारणा करून दिली. आगासकरांनी त्यावर आक्षेप घेतला व सॉलोमनबरोबर वर्गाबाहेर जाऊन सांगितले, ‘‘सर, जर तुम्ही माझ्या वर्गात हस्तक्षेप केलात तर माझ्या पद्धतीने मला शिकवता येणार नाही.’’ त्यानंतर सॉलोमन आगासकरांच्या वर्गात शिरताना आधी त्यांना विचारून मगच प्रवेश करत. आगासकरांचे विद्यार्थी माधवराव बागल त्यांच्या ‘कोल्हापूरचे कलावंत’ या पुस्तकात, ‘माझे गुरुजी आगासकर’ या लेखात त्यांच्याबद्दल लिहितात, ‘आगासकरांना पोटर्र्ेट करताना पाहण्याचं भाग्य मला लाभलं याबद्दल आजही मला धन्यता वाटते. त्या आठवणीनंसुद्धा हृदय फुलून जातं. पेंटिंग करू लागले की ते देवी संचारल्याप्रमाणे दिसायचे. मॉडेलशी अगदी एकरूप व्हायचे. जणू कायाप्रवेश केल्यासारखे. ब्रश असा चालवीत, की समोरचा माणूस कॅनव्हासवर जिवंत आकार घेऊ लागे. कामामध्ये ते इतके एकाग्र झालेले असत की आजुबाजूचे त्यांना भान नसे. एकदा तर त्यांनी वर्गात काम करताना घाम पुसायला हातातले रंगांचे फडके वापरले आणि स्वत:चा चेहरा रंगांनी माखवून टाकला!’

           बागल यांच्या म्हणण्याप्रमाणे त्रिंदाद यांच्या चित्रांमधील कुंचल्याचा मोहकपणा व सफाई आगासकरांच्या चित्रांमध्ये नव्हती. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी आगासकरांच्या चित्रांमध्ये प्रकाशाची बाजू जाड रंगात असे. रंगीबेरंगी शिंपल्यांसारखे रंग लावत कुंचल्यांची दिशा आतील स्नायूंच्या रोखाने असे व हायलाईट्स कुंचल्याच्या दांड्याने पांढरा रंग लावून दाखवलेले असत. छायेची बाजू मात्र अगदी गुळगुळीत असे. बागल म्हणतात, " एकदा त्यांनी प्रिन्सिपल सेसिल बर्न्स यांचं असंच एक पोट्रेट केलं. काय वर्णन करावं त्याचं! जे.जे.च्या जिन्याच्या पायऱ्या संपताच वर, इझलवर ते ठेवलं होतं. घंटा वाजताच आम्ही जिन्याच्या पायऱ्या चढू लागलो. वर नजर टाकली, तो खुद्द सेसिल बर्न्स उभे! पण ते बर्न्स नव्हते. ते तर आगासकरांनी केलेलं बर्न्स साहेबांचं पोट्रेट होतं. मुलांकडे पाहून गालातल्यागालात हसणारं ! पितृतुल्य हास्य होतं ते. सारी मुलं आश्‍चर्यचकित झाली.’

           आगसकरांना १९१८ मध्ये ‘रे आर्ट वर्कशॉप’वर सुपरिन्टेंडंट म्हणून नेमण्यात आले. जातिवंत चित्रकार असलेल्या आगासकरांना कारागिरीच्या स्वरुपाचे ते काम आवडले नाही. त्यांचा काम करण्याचा उत्साह नाहीसा झाला व त्यांची मनोवृत्ती निराश झाली. मनाने खंबीर  नसलेल्या व चटकन कोणत्याही गोष्टीच्या अधीन होणाऱ्या आगासकरांना पूर्वीपासून सिगारेटचे व्यसन होतेच. निराश व अस्वस्थ मन:स्थितीत ते भरपूर सिगारेट ओढू लागले. याच काळात त्यांच्या एका मित्रानेच त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना दारूची दीक्षा दिली. लवकरच ते व्यसनाच्या अधीन झाले. त्यांच्यावर सोपविलेली कामे व जबाबदाऱ्या वेळेत पार पडेनात. घेतलेली कामे पूर्ण होईनात. त्यांचा तरतरीतपणा, उद्योगप्रियता हरवली.

           लोकमान्य टिळकांशी त्यांचा पूर्वी संबंध आला होता. लोकमान्यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांच्याशी त्यांची मैत्री होती. व्यसनाधीनतेला आवर घालण्यासाठी शेवटी काही काळ आगासकरांना पुण्यात केसरी वाड्यात जागा देण्यात आली व सुट्टीच्या काळात त्यांनी तिथे राहून चित्रे रंगवावीत, असे ठरविण्यात आले. त्यानुसार आगासकरांनी ‘केसरी’साठी काही व्यक्तिचित्रे व श्रीकृष्ण गीता सांगतानाचे चित्र, अशी काही चित्रे पुण्यात राहून रंगविली. श्रीकृष्ण गीता सांगतानाचे चित्र छापून ते लोकमान्यांच्या ‘गीतारहस्या’च्या प्रतीसोबत दिले जाऊ लागले व घराघरांत पोहोचले. दिवसेंदिवस आगासकरांची तब्येत बिघडत गेली. त्यातच त्यांची पत्नीही निवर्तली. त्याचा त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आणि पुढे  वयाच्या बावन्नाव्या  वर्षी त्यांचे निधन झाले.

- महेंद्र दामले, सुहास बहुळकर

 

आगासकर, शांताराम पुरुषोत्तम