Skip to main content
x

अक्षीकर, गोपाळ नारायण

        गोपाळ नारायण अक्षीकर हे अलिबाग जवळच्या अक्षी गावचे रहिवासी होते. मॅट्रिकपर्यंतचे त्यांचे शिक्षण चिपळूणकर-टिळक-आगरकर या त्रयीने स्थापन केलेल्या पुण्याच्या शाळेत झाले. या त्रयीच्या आचार, विचार व चारित्र्यातून स्फूर्ती घेऊन शिक्षण प्रसाराच्या कार्याला वाहून घेण्याचा अक्षीकरांनी निश्‍चय केला व तो कार्यवाहीत आणण्यात कोणतीही कसर त्यांनी ठेवली नाही. मुंबईला येऊन त्यांनी शिक्षण क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ‘मराठा विद्यालय’ मध्ये शिक्षकाची नोकरी केली.

     अज्ञान, दारिद्य्र, निरक्षरता यात खितपत पडलेल्या व शिक्षणाविषयी उदासीन असलेल्या बहुजन समाजाला सुशिक्षित करण्यासाठी गवंडी, सुतार, कोळी व गिरणी कामगारांची वस्ती असलेल्या मुंबईतल्या दादर भागात अक्षीकर व त्यांच्या सहकार्‍यांनी झोपड्या-झोपड्यांमध्ये जाऊन विद्यार्थी गोळा केले आणि २ जून १८८९ रोजी मराठी शाळा व दादर इंग्लिश शाळेची स्थापना केली.

      नंतर कल्याणमध्ये २ जानेवारी १८९० रोजी कल्याण इंग्लिश शाळेची स्थापना केली. स्थापन केलेल्या शाळांचा व्यवस्थित व ध्येयानुरूप उत्कर्ष व्हावा यासाठी २४ एप्रिल १८९२ रोजी ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली. संस्थेची रीतसर घटना तयार झाली. अल्पावधीतच २ नोव्हेंबर १८९२ रोजी ठाणे येथे ठाणे इंग्लिश शाळेची स्थापना करण्यात आली. सरकारचा दृष्टिकोन मिशनरी शाळांना प्राधान्य देण्याचा असल्याने त्या काळात खाजगी शिक्षण संस्था चालविणे हे एक दिव्य होते. स्वावलंबनाचा हेतू असल्याने अक्षीकर, के. बी. ताम्हणे व गणेश रा. लेले आणि इतर सहकार्‍यांचा त्याग स्पृहणीय होता.

      अक्षीकर संस्थेचे व्यवस्थापक होते व दादर इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापकाचे कामही तेच करीत. सरकारी शाळांचा दबदबा असण्याचे कारण त्या शाळांत उच्चशिक्षित पुरेसा शिक्षकवर्ग व शालेय साहित्य होते. म्हणून त्या शाळांतून प्रवेश घेण्याची समाजाची साहजिक प्रवृत्ती होती. ज्यांना सरकारी शाळेत प्रवेश मिळत नसे अथवा राष्ट्रीय बाण्याच्या शाळेत शिक्षण घेण्याची ओढ असणारे विद्यार्थी खासगी शाळांकडे येत.

     एका अर्थाने अक्षीकरांनी काढलेल्या शाळा या गरिबांच्या शाळा होत्या. मुलांना स्वस्तात शिक्षण देणे हा चालकांचा उद्देश होता. यासाठी सरकारी शाळेपेक्षा खाजगी शाळेत शुल्क २/३ असे. अत्यंत गरीब मुलांना खास भत्ता, शालेय साहित्य दिले जाई. आर्थिक चणचण सहन करून सुमारे १५ टक्के विद्यार्थ्यांना शुल्क सवलत दिली जात असे. उद्देश एकच की गरिबांना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येऊ नये.  १८९७ च्या प्लेगच्या साथीने सुरुवातीला असलेली ३१६ ही विद्यार्थी संख्या २५१ पर्यंत रोडावली. परंतु कार्यकर्ते धैर्याने या परिस्थितीशी टक्कर देत राहिले.

      १९०६ मध्ये विद्यार्थी संख्या ५६१ झाली. यात ब्राह्मण, ब्राह्मणेतर, गुजराथी, मारवाडी, मराठा, मागासवर्गीय, मुसलमान, ज्यू, पारशी, ख्रिश्चन अशा सर्व जमातींचे विद्यार्थी होते. अक्षीकरांच्या या साहसी कार्यात निष्ठा, तळमळ व जबाबदारीने काम करणार्‍या केशव भगवंत ताम्हणे, वासुदेव काशिनाथ ओक, हरी विष्णू कोल्हटकर, नीळकंठ विष्णू कोल्हटकर, रामचंद्र काशिनाथ ओक, राजाराम केशव वैद्य यासारख्या उत्साही सहकार्‍यांची साथ मिळाली. शिक्षकांना निष्ठा व चांगल्या वागणुकीची हमी द्यावी लागे. शाळेचा तास ६० मिनिटांचा असे. शिक्षकांना आपल्या दैनिक कामाचा अहवाल द्यावा लागे.

     ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य होते. कार्यकर्त्यांना संस्थेच्या अडचणीमध्येही निराशा स्पर्श करीत नसे. औदार्य हे अक्षीकरांचे आवर्जून सांगण्यासारखे वैशिष्ट्य होते. सुरूवातीच्या काही वर्षांत शाळेला दरवर्षी तूट येत असे. या तुटीची भरपाई अक्षीकर आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिश्शातून भरत. शाळेत शिकविण्याचे काम करून संस्थेची आर्थिक जबाबदारी अक्षीकरांनीच स्विकारली होती. यापायी त्यांनी नि:स्वार्थपणे जवळजवळ २३ हजार रुपये त्या काळी खर्च केले.

     अविश्रांत श्रमाने १९०६ नंतर त्यांची तब्येत खालावली व संस्थेच्या दैनंदिन कार्यात लक्ष घालणे कठीण होऊ लागले. बहुजन समाजात शिक्षणाची आवड निर्माण करणार्‍या अक्षीकरांना ‘बहुजन समाजाच्या शिक्षणाचे जनक’ अशी यथार्थ पदवी लाभली.

      सन २००३ पर्यंत जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या ३८ शाखा स्थापन झाल्या. दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उरण येथपर्यंतच्या परिसरात शिक्षण प्रसाराचे काम करून समाजाची मोठी सेवा करण्याचे श्रेय मिळविले यात शंका नाही. संस्थेच्या ३ माध्यमिक शाळांचा शतक महोत्सव, एका शाळेचा अमृत महोत्सव, ६ शाळांचा हीरक महोत्सव, ३ कनिष्ठ महाविद्यालयांचा रौप्य महोत्सव तर एका प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव साजरा झाला आहे.

- वि. ग. जोशी

अक्षीकर, गोपाळ नारायण